"कबीर कहे कूच उद्दम कीजे।
आप खाये, और औरनको दीजे।।
- उद्योग करा, आपण खा व दुसर्यांनाही द्या. स्वार्थ व परार्थ दोन्ही साधा. घर प्रथम सांभाळा. मात्र समाजकार्यालाही मदत करा.
समाजकार्य म्हणजे शबनम बॅग लटकवलेले, कुर्ता - पायजमा घातलेले, साधे सुती कपडे परिधान करणारे कार्यकर्ते, अशी जी आपली पूर्वग्रहीत दृष्टी असते. ती आता बदलण्याची गरज आहे. समाजकार्यकर्त्याचे महत्त्वपूर्ण योगदान व उपयुक्तता पाहता समाजकार्य हे केवळ फावल्या वेळात आवड म्हणून किंवा सेवाभाव म्हणून करण्याचे कार्य नाही.
समाजविकासासाठी कार्य करणार्या विविध व्यावसायिकांपैकी एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक कार्य म्हणून समाजकार्य आता रूढ झालेले आहे. व्यावसायिक समाजकार्याच्या भारतात पाचशे पेक्षा अधिक मान्यताप्राप्त विद्यापीठ व शैक्षणिक संस्था आहेत. या संस्था विद्यार्थ्यांना समाजकार्याच्या दृष्टिने उच्च शिक्षित करण्याबरोबरच प्रशिक्षितही करतात.
"व्यावसायिक समाजकार्यकर्ते म्हणजे सामाजिक समस्यांचा शोध घेउन त्यांचे शास्त्रीय विश्लेषण करून त्यावर प्रभावी उपाययोजना करणारे प्रशिक्षित कार्यकर्ते होय." जे उच्च शिक्षित पदवीधर व मानव संसाधन असतात. ते त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत फक्त कागदरूपी डिग्री घेत नाही, तर ते जीवन जगण्याची कला येथे शिकतात. जीवनाला समृध्द करणार्या अनेकविध अनुभवांची शिदोरी त्यांच्यापाशी असते. समाजकार्याचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीचे वर्तन सामाजिक जीवन, सामाजिक सहसंबंध, समुदाय संघटन, याबाबतचे ना केवळ सैद्धांतिक ज्ञान, सोबतच प्रात्यक्षिक ज्ञान व अनुभव अभ्यासातून प्राप्त झालेले असते. समाजकार्य अभ्यासाचा भाग असणार्या क्षेत्रकार्यातुन या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्वास एक नवीन आयाम प्राप्त झालेला असतो. हे प्रशिक्षण त्यांना समाजाचे विविध कंगोरे समजण्यात सहाय्यभूत ठरते.
व्यावसायिक समाजकार्यकर्त्याला जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी प्राप्त झालेली असते. जात, धर्म, लिंग, प्रतिष्ठा यापलिकडे जाउन व्यक्तीला माणुस म्हणून गरजेनुसार मदत करण्याची प्रवृत्ती हे समाजकार्य त्याच्यात बिंबवत असतं. सामाजिक न्यायासाठी गरीब, दलित, वंचित व गरजु व्यक्तींच्या बाजुने कार्य करण्याचे धाडस व विपरीत परिस्थितीशी जुळवून आव्हानांना तोंड देण्याची क्षमता या प्रशिक्षणातून प्राप्त होते. आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या मग ती मानसिक असो वा सामाजिक तिला सामोरं जाण्याचं धाडस आणि कौशल्य आपण इथुन शिकतो.
वैश्विक मानवतेच्या कल्याणासाठी हे सामाजिक कार्यकर्ते झटत असतात. लोकांच्या मुलभूत आणि जटील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. व्यावसायिक समाजकार्य हे व्यक्ती - कुटुंब - गट - संघटना - समुदाय यांचे कल्याण साधण्यासाठी उद्देशपूर्ण प्रयत्न करते. "मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे ही या समाजकार्याची आधारशिला आहे." असुरक्षित, अत्याचारीत, मागासवर्गीय, वंचिंत, शोषित, गरजु, पिडीत आर्थिक व सामाजिक न्यायापासून वंचित असणारे समाजकार्याचा केंद्रबिंदू आहे. मानवी हितसंबंध - सामाजिक संबंध जोपासून व्यक्ती - व्यक्तींमधील संबंध मजबूत करण्याचे काम हे सामाजिक कार्यकर्ते करीत असतात. मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी ते नेहमी उभे ठाकलेले असतात. ज्या लोकांचे एकले जात नाही, त्यांच्यासाठी ते आवाज बनतात. लोकांना सामाजिक न्यायासाठी लढण्यात, सामाजिक अन्यायाला आव्हान देण्यासाठी व जीवन आणि समुदाय सुधारण्यात ते मदतगार म्हणून साबित होतात.
व्यक्ती - गटाला प्रभावीपणे समायोजन करता यावे म्हणून व्यक्ती - समुह व समुदाय यांच्यासोबत कार्य करण्यासाठी लागणारे कौशल्य या समाज कार्यकर्त्यांनी मिळवलेले असते. समाजाविषयी संवेदनशीलता, जीवनाविषयी सकारात्मकता, समस्याग्रस्त व्यक्तीविषयी करुणा, समस्या सोडवण्याची क्षमता, समाजकार्यासाठी वचनबद्धता, आणि मानवी सहसंबंध बळकट करण्यासाठीचे कौशल्य असणारी प्रशिक्षित व्यक्ती म्हणजे हे व्यावसायिक समाजकार्यकर्ते होय.
आजच्या आधुनिक परिस्थितीत व्यक्तींचा वाढता मानसिक तणाव, कुटुंब व समूहातील दुभंगलेले संबंध, चंगळवादाने घातलेले थैमान, पर्यावरणातील असमतोल, समाजातील संघर्ष बघता प्रशिक्षित समाजकार्यकर्ते 'जगाच्या नवनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात.
रूढार्थाने या क्षेत्रात ग्लॅमर नाही, कदाचित यामुळेच समाजातील तळाच्या माणसापर्यंत पोहचून त्याला मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देण्यात समाजकार्यकर्त्याची निरपेक्ष भूमिका असते. राज्य व केंद्र शासनाचा समाजकल्याण विभाग ( प्रशासन), महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, शाळा, दवाखाने, कारागृह, अनाथालय, वृद्धाश्रम, कुटुंब कल्याण विभाग.... असे स्त्रीशिक्षणापासुन ते आरोग्यापर्यंत व राजकारणापासून ते सामाजिक, आर्थिक धोरणांपर्यंत ...जीवनाच्या अशा सर्वच क्षेत्रांत समाजकार्य विस्तारलेलं आहे.
व्यावसायिक समाजकार्य क्षेत्रात अधिक व्यापकतेने, सखोलतेने, व प्रगल्भतेने प्रत्यक्ष सेवा कार्य करण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. या क्षेत्रात तुम्ही पदवी संपादनाबरोबरच, एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून विकसित झालेले असतात. याठिकाणी तुमचा चिकित्सक दृष्टिकोन तयार होतो. 'समानानुभुती ' ("दुसर्याच्या भुमिकेत शिरुन" त्यांची समस्या आपली म्हणून सोडवण्यासाठी उपयुक्त) हे तत्त्व तुम्ही येथे शिकता. सर्जनशील विचारसरणी, निर्णय क्षमता, समस्या निराकरण, चिकित्सक वृत्ती, तर्कशुध्द विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन ....असे अनेकविध गुणकौशल्यांचा विकास साधत ते टोकदार बनवण्याचे काम हे क्षेत्र करत असते.
जिथे शासन - प्रशासन पोहचण्यास असफल ठरते, तिथपर्यंत पोहचून समाज बदल घडवण्याचे, व त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम समाज कार्यकर्ते करीत असतात. समाजकार्यकर्ते समाजाचे अस्तित्व टिकविण्यासाठी उपयुक्त व कार्यक्षम व्यावसायिक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. समाजाची मजबूत बांधणी करण्यात व सामाजिकस्वास्थ्य जोपासणारे हे सामाजिक अभियंते आहेत. ज्यांची काळानुरूप या बदलत्या समाजव्यवस्थेत व नातेसंबंधात अधिक तीव्रतेने गरज आहे.
निकीता चंद्रकला दादाभाई
2 comments:
Dil chhu liya tune to😍👌👍👍
Thanq 🌺
Post a Comment