" डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आणि वर्तमान वास्तविकता "
भारत हा विविध धर्म, पंथ, जाती, समुदाय अशा विविधतेत सामावलेला आहे. भारत आणि पाकिस्तान अशा दोन स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्रांच्या रूपात 15 आँगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे पहिले विधीमंत्री म्हणून आणि स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेत केंद्रस्थानी श्रेष्ठ शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब राहिले. आणि राज्यघटनेचे मसुदारूप तसेच राष्ट्राचे शिल्प घडण्यात गढून गेले .
स्वतंत्र होत असलेल्या हिंदुस्थानात स्पृश्यांच्या गुलामगिरीतून अल्पसंख्य अस्पृश्य मुक्त व स्वतंत्र असावेत; देशहितासाठी स्पृश्यास्पृश्य भेद मिटलेला असावा आणि अस्पृश्यांना सामाजिक, राजकीय , आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती करून घेता येईल, अशा सोयींची तरतुद स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतच असावी; अशी सकारात्मक, ऐक्यवादी आणि एकनिष्ठ देशभक्तीची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब हे दलित, शोषित व वंचितांचे हितरक्षणकर्ते होते. भारतातील जातीयवाद समाप्त व्हावा, सामाजिक समानतेच्या संधी मिळाव्यात, दलित, शोषित, वंचितांना हक्क मिळवून त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी "नवभारताची निर्मिती " हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. बाबांच्या स्वप्नातील भारत हा सक्षम, शिक्षित व प्रगत अशा दलित समाजाचा अंतर्भाव असलेला होता.
त्यांनी, समानता, स्वतंत्रता, समान काम - समान वेतन, महिलांना मातृत्व रजा प्रदान करणे, सर्वांना मतदानाचा " एक व्यक्ती - एक मत - एक मुल्य " याप्रमाणे मतदानाचा अधिकार या गोष्टींसाठी सतत पुढाकार घेतला. बाबासाहेबांची आंदोलने अधिकारासाठी होती. अधिकार कसा मिळवायचा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब होय. बाबासाहेबांचे विचार आजही तेवढेच आधुनिक व महत्त्वपूर्ण आहेत. जातीअंताचा प्रश्न राष्ट्रीय आहे. तो हाती घेण्याची गरज आहे. उच्चशिक्षण, मुलभूत गरजा, आवश्यक गोष्टी सर्वांपर्यंत पोहचाव्यात, सर्वांना आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय मिळावा यासाठी बाबासाहेब नेहमीच पुढारलेले असत.
समाजातील भेदभाव मग ते कुठल्याही स्वरूपातील असोत, ते भारताच्या प्रगतीतील अडथळा ठरतील. असे त्यांचे ठाम मत होते . विषमतामुलक, विज्ञाननिष्ठ, व विचारविवेकी भारताचे स्वप्न बाबांनी पाहिले होते. डॉ. बाबासाहेबांना राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणायचे होते. यासाठीच त्यांनी आपला 'स्वतंत्र मजुर पक्ष'१९३६ ला स्थापला. मात्र १९४२ मध्ये देशातील तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी स्वतंत्र मजुर पक्ष बरखास्त करून त्यांनी 'शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ' ची स्थापना केली.
मुळात घटनेमुळेच पक्ष, शासन बनते पण पक्ष घटना मानतात का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ ला इशारा दिला होता की, इथले लोक पक्षाच्या मतप्रणालीला मोठे मानतील की देशाला? जर ते देशापेक्षा पक्षाच्या मतप्रणालीला मोठे मानतील तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल आणि कदाचित ते कायमचं नष्ट होईल. असे म्हणतात की "भूल दिल्याशिवाय आॅपरेशन करता येत नाही, आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. भारतात सद्यस्थितीला याचा प्रत्यय अधिक जाणवतोय. जनतेची निव्वळ दिशाभूल आज सरकार करत आहे. मग ते कोणाचंही असो. नुसता आश्वासनांचा पाऊस आणि गोड शब्दांचा मारा करुन जनतेची फसगत केली जातेय.
सध्या भारतातील धार्मिक असहिष्णुता वाढीस लागली आहे ही धर्मांधता वाढून समाजात अराजकता माजलीय.जागतिकीकरणात दलित समाजाचा रोजी - रोटीचा प्रश्न उग्र झालेला असताना आणि दुसरीकडे दलितांची हत्याकांडे होत असताना गोहत्येच्या नावाखाली अनेकांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचा छळ केला जातोय, त्यांच्यावर हल्ले केले जातात, माॅब लिचिंगच्या वाढत्या घटनांनी अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतलाय...
यामुळे समाजात पराकोटीची सामाजिक विषमता निर्माण झाली, बाबासाहेबांना समतामुलक भारत अभिप्रेत होता. ना की जातीय, धार्मिक आधारावर दुही माजलेला समाज.
बाबासाहेब अभिव्यक्ती स्वातंत्र्याला खूप महत्त्व देत. भारत हा कोणामुळे भारत आहे, तर तो बाबांनी दिलेल्या संविधानामुळे . भारत - पाक एकाच वेळी स्वतंत्र झाले. स्वतंत्र झाले. मात्र, पाकमध्ये धर्माच्या नावाखाली आतंकवाद, लष्कर यांचे पूर्ण थैमान आहे. तर भारत हा लोकशाही मार्गाने चालणारा प्रगतीच्या वाटेवर आहे. समाजात सर्वांना समान संधी, समान हक्क, व समान न्याय मिळावा यासाठी बाबासाहेब लोकशाहीचे बळकटीकरणावर भर देतात.
डॉ.बाबासाहेबांचं एक गाजलेलं व तेवढच महत्त्वाचं वाक्य आहे, " माणुस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे." कोणताही धर्म माणसापेक्षा मोठा नाही. कारण तो माणसाने माणसासाठी निर्माण केलेला असतो. बाबासाहेबांनी आपणांस शिका, संघटीत व्हा, व संघर्ष करा! असा संदेश दिला. प्रत्येकाने अन्याय - अत्याचाराविरोधी आवाज उठवला पाहिजे, आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे. ते मिळवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे बाबासाहेब म्हणतात की, " जर अन्यायाशी लढता लढता तुम्हाला मरण आलं तर, तुमची येणारी पिढी त्याचा जरूर बदला घेईन, मात्र जर तुम्ही अन्याय, सहन करता करता मरण पावले, तर तुमची येणारी पिढी ही गुलाम होईल" सध्या देशात आभासी आणि प्रलोभनपूर्ण वातावरण राजकीय पक्षांनी निर्माण केलंय. एखाद्या गोष्टीबद्दल कोणी व्यक्त होऊ नये अशी आज परिस्थिती निर्माण झालीय. बाबासाहेबांच्या मते, " एखाद शासन टिकण्यापेक्षा लोकांचे अधिकार टिकणे अधिक जरूरी असते." आणि यासाठी आपण सर्वांनी विचारविवेकी असणं जरूरी असतं.
बाबासाहेबांचे विचार वास्तव परिस्थितीला धरून व दूरदृष्टीचे होते. म्हणूनच आजही त्यांचे विचार तेवढेच आधुनिक आहेत. बाबासाहेबांनी सांगितलंय " जेव्हा देवळात जाणार्या रांगा ग्रंथालयात जातील तेव्हा भारत जगावर अधिराज्य गाजवेल . ते म्हणतात "पुस्तकाने माणसाचे मस्तक सशक्त होते, आणि सशक्त झालेलं मस्तक कोणाचंही हस्तक होत नाही, आणि हस्तक झालेलं मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही " याचा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे.
समाजपरिवर्तनासाठी बाबा तरुणांबाबत आग्रही होते. मात्र आजची पिढी ही स्वार्थवृत्ती अंगिकारताना दिसतेय. वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून, प्रस्थापित भांडवलदार धार्जिण्या, जात्यंध नि धर्मांध पक्षांना मतदान करू लागली आहे. बाबासाहेबांना ज्ञानी, संवेदनशील, निर्भीड व अन्यायाविरुद्ध परखड टीका करणारा, समाज हवा होता. बाबासाहेबांना भारत जातिनिष्ठ विषमतेपासून,अन्याय अत्याचारापासुन,शोषण आणि उच्च - नीच दर्जापासुन मुक्त करून सुसंघटीत व सामर्थ्यवान करायचा होता. संविधानाचा गाभा असलेले स्वातंत्रय, समता, बंधुता तसेच सामाजिक व आर्थिक न्याय भारतीयांच्या कृतीत त्यांना अपेक्षित होता. बाबासाहेब आंबेडकरांना अंधश्रद्धा निर्मूलक, विज्ञाननिष्ठ, जातीविरहीत - समतावादी विवेकशील बंधुभाव जोपासणारा, अन्यायाबद्दल बंड पुकारणारा सजग व एकात्म भारत अभिप्रेत आहे.
बाबांना मानवी मुल्ये जपणारा, भेदाभेदविरहीत समतेचा पुरस्कार करणारा भारत अपेक्षित आहे. समाजात सर्वांना समतानिष्ठ दर्जा, समतानिष्ठ अर्थव्यवस्था, स्वोध्दाराची समान संधी असणारा भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातीत होता. बाबासाहेबांची जयंती ही फक्त फटाक्यांच्या आतिषबाजीत व नाचगाण्याच्या जल्लोषात न साजरी करता, बाबासाहेबांना डोक्यावर नाही तर त्यांना डोक्यात घालून त्यांची जयंती साजरी करुया. त्यांचे विचार आचरणात आणून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताला सार्थ ठरवुया.
निकिता चंद्रकला दादाभाई
No comments:
Post a Comment