नाळ
नाळ, गर्भातली ती नाळ, जी गर्भाच्या सुरुवातीपासूनच मायलेकराचं नात घट्ट करते, त्याला वृद्धिंगत करते, या नात्याला भक्कमपणे जोडून ठेवते. आईचं आणि मुलांचं नातं हे त्या गर्भात जुळलेल्या नाळेचं असतं, जी नाळ गर्भातल्या बाळाचं भरणपोषण करते, त्याला वाढवते, एका नवजात शिशूचा आकार, रंग-रुप-चेहरा त्याला बहाल करते,आणि गर्भाबाहेर पडल्यावर ती नाळ होते "आई".
आई बाळाला भरवते, वाढवते, त्याचं शी-शु काढते, त्याच्या प्रत्येक लहानलहान गोष्टींची काळजी घेते, बाळ जसजसं मोठं होतं, त्याप्रमाणे आई त्याला समजून घेते, कधी ती त्याप्रमाणे लहान होऊन वागते, तर कधी समजावून सांगत मोठं होत, ती आपल्या मुलांच्या काही चुका टाळून दुर्लक्ष करते, तर कधी खबरदारीने रागवून त्याला सजग करते,
आई हे फक्त एक नाव नसून, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असते, प्रत्येकाच्या भावना समजून घेणारं ते प्रवेशद्वार असतं, जेव्हा ती आपल्यात असते, तेव्हा तिची किंमत कळत नाही, तिच्या असण्याचं महत्त्व सहसा कुणाला जाणवत नाही... पण जेव्हा आपण घरातून बाहेर गेलो, अथवा ती जर घरात नसली तेव्हा मात्र तिची उणीव चटकन जाणवते.
घराला एकसंध जोडून ठेवण्याचं काम आई करते, कोणत्याही विपरीत परिस्थितीत ठामपणे उभं राहून त्याला सामोरं आई जाते, आई ही आपल्याला त्या गर्भातल्या नाळेतूनच मिळालेली जन्माची शिदोरी असते, जी सरतही नाही आणि उरतही नाही.
आईसाठी आपली मुलच तीचं जग असतं तीची फक्त एकच माफक अपेक्षा असते, मुलांनी शिकुन चांगलं घडावं ,व आयुष्यात काही चांगलं काम करावं चांगल्या पदी पोहचावं.... लेकरांच्या हसण्याने दु:खातही जी हसते, आणि लेकरांच्या रडण्याने सुखातही जी रडते ती आई असते....तिच्या जीवनाच्या साऱ्या काही भावना जणु आपल्या लेकरांपाशी कवटाळलेल्या असतात. लेकरांच्या सर्व भावना ती जवळीकतेने जपते, स्वतःच्या भावना,ईच्छा,आकांक्षा यांना दुय्यम ठेवून आपल्या लेकरांची स्वप्न, त्यांच्या ईच्छा, गरजा यांना महत्त्व देते, आणि त्यासाठी नेहमी झटते.
लेकरांच्या डोळ्यातील भाव जाणणारी ती मायमाउली असते, आपण कितीही तिच्याशी रुसलो, भांडलो, रागावलो, तरीही आपल्याला जवळ घेत आपले आसु पुसणारी तीच असते. आई आपल्या मुलांप्रती खूप संवेदनशील असते. तिला चटकन त्यांच्या मनातील भाव हेरता येतात. त्यांच्या प्रत्येक यशापयशात, सुखदुःखात तिची महत्त्वाची भूमिका असते.
जी काही न सांगता सर्व जाणते, ती आई असते.
वात्सल्य, प्रेम, करुणा, ममता या साऱ्या निरागस, प्रामाणिक भावभावनांचा संगम / सागर म्हणजे आई
निकीता चंद्रकला दादाभाई
No comments:
Post a Comment