"शिवाजी महाराज आणि स्त्री विषयक विचार "
आपल्या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीत, अनेक संत - महंत, राजे - महाराजे, शासक - प्रशासक, समाजसुधारक होउन गेले. ज्यांनी स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी व उंचावण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. मात्र पावणेचारशे वर्षांपूर्वी सोळाव्या शतकात अख्ख्या स्वराज्याचे तारणहार ठरलेले राजे शिवछत्रपतींनी या दिशेने कृतिप्रवण कार्य केले.
शिवाजी राजे मध्ययुगीन काळातील पहिले असे राजे होते, ज्यांनी स्त्रियांच्या दैनावस्थेला आळा घालण्यासाठी पहिल्या प्रथम प्राधान्य दिले आणि याविरूद्ध कठोर पावले उचलली. महाराजांनी आपल्या मातोश्री, आउसाहेबांना सती जाण्यापासून परावृत्त केले व आपल्या कार्यातून स्त्रियांचे सामाजिक स्थान व सुरक्षा त्यांनी शाबूत ठेवली. ही त्या काळातील सामाजिक क्रांतीच होती. जिची पाळेमुळे अठराव्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळींचा उगवता शुक्रतारा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या 'राजाराम मोहन राॅय यांच्या कार्यात नजरेस पडते. आणि पुढेही अनेक स्त्री समाजसुधारकांनी महाराजांचा या कामी वसा घेत आपली वाटचाल चालू ठेवली.
मध्ययुगीन काळात स्त्रीयांना दास्यत्वासाठी गुलाम म्हणून वापरले जाई. त्यांची खरेदी - विक्री होई. आणि स्त्रियांची विटंबना केली जात असे. या सर्व गोष्टींवर महाराजांनी बंदी आणली होती. महाराजांविषयी बोलताना प्राच्यविद्यापंडित - शरद पाटील असे म्हणतात, शिवाजी महाराजांचे धोरण त्यांच्या समतावादी धोरणात आहे. त्यांनी आपल्या स्वराज्यात जातीभेद, धर्मभेद, किंवा लिंगभेद अशा कोणत्याच गोष्टीला जराही थारा दिला नाही. महाराजांनी स्त्री - पुरुष असा भेदभाव कधीही केला नाही. महिलांना नेहमीच आदर, सन्मान आणि त्यांना संधी देण्याचे काम राजांनी केलं.
शिवचरित्राचे अभ्यासक लालजी पेंडसे आपलं मत नोंदवताना म्हणतात की, शिवाजी राजे गोरगरीब, उपेक्षित वर्गाबाबत अत्यंत कनवाळू होते. समाजातील शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, मजुर आणि विशेषतः सर्व जातिधर्मांतील महिला या कायमच उपेक्षित राहिल्या आहेत, या उपेक्षित वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात महाराज त्यांच्याबाबत फार सह्रदयी होते.
आपल्या स्वराज्याच्या भूमीत महाराजांनी महिलांवर अन्याय - अत्याचार करणाऱ्यांची कधीच गय केली नाही. महिलांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा, सुरक्षित राहण्याचा, व व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करणारा स्वकीय जरी असला तरी महाराज त्याला कठोर शिक्षा करत. आपल्या राज्यातील सैन्याला महाराजांचे सक्त आदेश होते, स्त्रियांना मोहिमेवर आणू नये. त्यांना युध्दात पकडू नये. स्त्रीसंबंधी गुन्हयाला क्षमा नव्हतीच. मग तो कुणीही असो. साधा शिपाई, असो वा वतनदार, जहांगीर, कुलकर्णी, किल्लेदार, असो कुणालाही माफी नव्हती.
ज्या काळात युद्धामध्ये हरल्यानंतर शत्रुपक्षाच्या स्त्रियांची विटंबना केली जाई. स्त्रियांना भेटवस्तू म्हणून दिले जाई. त्यांचे कल्पनेपलीकडे शोषण केले जाई. स्त्रियांना बळजबरीने जनानखान्यात कोंबले जाई. किंवा लग्न लावले जाई. तहामध्ये स्त्रियांची मागणी केली जाई. गावाशेजारी लष्करी छावणी पडली की, लोकानां आपल्या बायका - मुलींना घेउन जंगलात पळून जावं लागत असे. त्यांच्या अब्रू रक्षणासाठी ....ज्या काळात प्रजेचे रक्षकच स्त्री भक्षक बनले होते, त्यावेळी शिवाजी राजे हे स्त्री रक्षक बनले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा दंडकच होता की, स्वराज्यातील असो, की परराज्यातील प्रत्येक स्त्रीचा आदर, सन्मान राखला पाहिजे. इतिहासकार डॉ. बाळकृष्ण म्हणतात, महाराजांच्या छावणीत नर्तकी, मद्यालये, आणि अमली पदार्थांवर कडक निर्बंध होते. त्यांच्या राज्यात स्त्रियांना कैद करायला बंदी होती. जनानखान्यांना प्रतिबंध होता.
दक्षिण दिग्विजयहून स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या महाराजांच्या विरुध्द लढल्या. त्यावेळी सावित्रीबाईंचा अवमान करणाऱ्या स्वकीय सरदारांना महाराजांनी शिक्षा केली. व सावित्रीबाईंना सन्मानाची वागणूक दिली. त्यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दूध पाजण्याचे शिल्प आजही यादवाडला पाहावयास मिळते. राजकीय संघर्षात देखील महिलांचा अवमान होणार नाही, याची पुरेपूर दक्षता शिवराय घेत असत. याचीच साक्ष देणारा दुसरा प्रसंग म्हणजे महाराजांनी पनवेल जवळचा प्रबळगड जिंकला. त्या लढाईत तेथील किल्लेदार केसरीसिंह धारातीर्थी पडला. त्याची आई, पत्नी, मुले यांना महाराजांसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी महाराजांनी त्यांना अभय दिले. व त्यांचा यथोचित सन्मान करुन त्यांना आपल्या मूळ गावी सुखरुप पोहचवण्यात आले.
मोगल इतिहासकार 'खाफिखान' लिहितो "जसा भाऊ बहिणीशी वागतो, किंवा मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे." दुश्मनाच्याही स्त्रियांचा सन्मान करावा. अशी उच्च कोटीची नैतिकता महाराजांच्या ठायी होती. आपल्या राजकीय विरोधकांच्या कुटुंबाचे संरक्षण करण्याचे, व त्यांचा आदर बाळगण्याचे महाराजांचे धोरण होते. ज्याची ते काटेकोरपणे अंमलबजावणी करत असे.
शिवकाळातील निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात असे. महाराजांच्या महिलाविषयक धोरणांमुळेच नंतरच्या काळात संभाजी राजांच्या पत्नी येसुबाई, राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या. शिवरायांच्या सुनांनी हातात तलवार घेऊन, घोड्यावर बसून रणांगण गाजवलं. सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. हे सर्व शक्य झाले ते केवळ शिवबाच्या महिलाविषयक धोरणामुळेच.
आजही महिलांचा अनादर करणे, तिच्यावर जोरजबरदस्ती करणे, तिच्या मतांना, व्यक्तिस्वातंत्र्याला लाथाडून लावणे. असे करण्यात अनेक महाभागांना शूरपणा वाटतो. याच्याने त्यांची मर्दुमकी गाजते असे वाटते, मात्र या मावळ्यांनी लक्षात घ्यावे, की स्त्रियांना आदराने, सन्मानाने वागवणे हेच खरे शिवकार्य आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, तिला संधी देणे, व तिला समान दर्जा देणे हीच खरी शिवभक्ती आहे. महाराजांच्या जीवनात अनेक युध्दप्रसंग आले, गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली,जीवघेणे प्रसंग उद्भवले. पण महाराजांनी आपली नैतिकता व मूल्यांना शेवटपर्यंत तडा जाऊ दिला नाही. महिलांविषयी महाराजांचे विचार उच्चकोटीचे होते. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र आपल्याला नेहमीच देत राहील.
- निकीता चंद्रकला दादाभाई
1 comment:
आपण लिहिलेल्या सर्वच लेख या महत्त्वाच्या विषयांना अधेरेखित करणारे आहेत. असचं लिहित रहा
Post a Comment