Wednesday, 3 June 2020

अवलिया आईन्स्टाईन

                      विज्ञान जगताचा एक महत्त्वाचा शिलेदार, आपल्या बुध्दीसामर्थ्याच्या जोरावर विसाव्या शतकात आपल्या जादूचा अमिट असा ठसा उमटविणारा 'आईन्स्टाईन' विज्ञान क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने त्याला जाणावं, जवळून समजून घ्यावं, आपण त्याला खोलात वाचत गेलो की, नकळतपणे तो आपला दोस्त बनुन जातो. चला तर मग एक लेख या विनोदी अल्बर्ट साठी, त्याचा रोमांचक जीवनप्रवास अनुभवण्यासाठी, त्याच्याशी मैत्री पक्की करण्यासाठी. ***


         ... प्रत्येक माणसाच्या अंतरंगात विश्वाविषयीचे कुतुहल हे उपजतच असते. विश्वाची निर्मिती कशी झाली? कोणी केली? पहिला जीव कोणता असेल? जसं की आपण नेहमी एक प्रश्न चर्चितो ना, तो म्हणजे "अंडे आधी की कोंबडी आधी?" तसंच ही जैविक उत्क्रांती कशी झाली असेल? आपल्या सुर्यमालेचं परिभ्रमण कसे होते? गुरुत्वाकर्षण शक्ती कसे काम करते?, असे सारे प्रश्न आपल्या डोक्यात काही वेळा पिंगा घालत असतात. 

             विश्व प्रसरण पावत आहे, तारे आपल्यापासून अब्जावधी प्रकाशवर्षे दूर आहेत, अवकाशात कृष्णविवरे आहेत,.... .इत्यादी गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात. विज्ञानाच्या या अनेक घटकांना सर्वसमावेशक सिध्दांताच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करीत असतात. मुळात बालकांचे कुतुहल आणि प्रतिभावंतांची बुद्धिमत्ता ही शास्त्रज्ञांत उपजतच असते. 

               अल्बर्ट हार्मन आईनस्टाईन हे साहेब तर यात आघाडीवर होते. आईन्स्टाईन त्याच्या सर्व चाहत्यांमध्ये, त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये Genius Man म्हणून प्रचलित आहे. म्हणूनच तर १४ मार्च हा त्याचा जन्मदिन सर्वत्र Genius Day म्हणून साजरा करण्यात येतो. 

          विश्वाची उत्पत्ती समजून घेण्यासाठी व हे अनाकलनीय गुढ रहस्य जाणून घेण्यासाठी गणित महत्त्वाची भूमिका पार पाडतो. गणिताला भौतिकशास्त्राचा पथदर्शी ( Math is a tour of Physics) असे देखील संबोधण्यात येते. निसर्गाला गणितीय संरचनाने (Mathematical Structure)  समजून घेता येतं. हे एक वैश्विक सत्य आहे. 

            "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" ही उक्ती अल्बर्टच्या बाबतीत अगदी अचूक काम करुन गेली. गणितात Higher Math म्हणून ओळखले जाणारे Differentiation & Integration याची अल्बर्ट लहानपणापासूनच मोठमोठाली समीकरणं एखाद्या तज्ञाप्रमाणे सोडवत असे.  वय वर्ष १२ असतानाच अल्बर्टने पायथागोरस थेरम मधील स्वतः  ची स्वतंत्र Original Proof शोधून काढली. आपले  विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन चे (STEM) विद्यार्थी डिग्री पूर्ण होऊन जाते, तरी पायथागोरस आपल्या डोक्यात पूर्णपणे शिरलेला नसतो. रट्टा मारून पुढे जाण्याची प्रवृत्ती आपली निर्माण झाली आहे. आपलं एवढंच पाठ असतं  The right angle triangle equation =  a2 + b2 = c2 आणि पायथागोरस प्रमेयाचा उपयोग हा Construction & Navigation साठी होतो. बस्स झालं शिकून आपलं. 

              अल्बर्टचं शिक्षण फेडरल पॉलिटेक्निक स्कूल झुरीच येथे झाले. तेथे त्याने १९०० साली टिचींग डिप्लोमा पूर्ण केला. आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ झुरीच मध्ये Ph. D पूर्ण केली. अल्बर्टचे वडील हार्मन आईनस्टाईन हे पेशाने एक इंजिनिअर होते. आणि त्याचे काका जॅकाॅब सोबत त्यांचा एक उद्योगही होता. अल्बर्टचे वडील त्याला म्हणत की तु, भौतिकशास्त्रात आणि गणितात तरबेज आहे, म्हणून तु इंजीनिअरिंग करावं, पण अल्बर्टला ते मान्य नव्हतं,  इंजिनिअर बनुन रोज रोज यंत्रासारखं त्याला तेच ते काम नको होतं.  त्याला प्राध्यापक व्हायचं होतं. ब्रह्मांडातील नवीन रहस्यांचा शोध घ्यायचा होता. त्याच्या शोधासाठी त्याला या पेशात वेळ राखून ठेवता आला असता. शिवाय शिक्षणाच्या प्रक्रियेशी नातं जुळवून ठेवत तो सतत शिकत राहिला असता.

              जसं लोहाला बघून चुंबक त्याच्याकडे आकर्षिलं जातं तसंच एक जिनियस हा जीनियस कडेच धाव घेतो. आणि हा नियम अल्बर्टच्या आयुष्यात बिनचूक लागु पडला. अल्बर्ट हा स्वतःला गणितात खूप पारंगत समजत असे. त्याला वाटे की गणितात माझा हातखंडा कुणी घेऊ शकत नाही. पण एका प्रसंगाने त्याचं हे कॅलक्युलेशन खोटं साबित केलं. १९०५ साली झुरीच युनिव्हर्सिटीत Ph.D करत असताना त्याला तेथील मास्तरांनी एक प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर अल्बर्टला देता आले नाही. तेच उत्तर मिलेवा मारिक या विदुषीने दिले. तिचं ते उत्तर ऐकून व तिच्या ज्ञानाने अल्बर्ट विलक्षण प्रभावी झाला. व पुढे थोड्याच दिवसात मिलेवा सोबत त्याची लग्नगाठ पडली. 

                    अल्बर्ट हा पुढे प्रिन्सटन युनिव्हर्सिटीत प्राध्यापक म्हणून कार्यरत झाला. तो खूप प्रसिद्ध व विद्वान प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होता. तो वर्गात शिकवताना खूप गमतीजमतीने शिकवत असे. आपल्या वेगवेगळ्या प्रयोगांनी विद्यार्थ्यांना खूप हसवी. आपल्या विनोदी आणि चमकदार शैली यांच्या मनोहर मिश्रणातून तो विश्वरचना आणि संबंधित भौतिकशास्त्राचे गहनगुढतेचे प्रभावी विश्लेषण करत असे. त्याचं व्यक्तिमत्व हे एखाद्या विदुषकासारखं भासे. त्याचे केस हे नेहमी वरती विस्कटलेले असत. आणि त्याची देहबोली ही खूप मनोरंजक होती. आईन्स्टाईनची अध्यापन पध्दत ही वैश्विक सत्य व कल्पनेवर आधारलेली असे. तो आपल्या मेंदुला त्याची प्रयोगशाळा समजत असे. व आपल्या फाउंटन पेनला त्या प्रयोगशाळेतील उपकरण. अल्बर्टचं आपणा सर्वांना परिचित असलेले एक प्रसिद्ध वाक्य आहे, "ज्ञानाला परिसीमा आहेत, मात्र त्या कल्पनेला नाही." ( Knowledge is limited but imagination it's not limited) म्हणून कल्पना करणं कधी थांबवू नका. असे तो नेहमी म्हणत असे. त्याच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना, तो कल्पनेच्या जगात त्यांची सफर घडवून आणत असे. विद्यार्थ्यांना डोळे बंद करण्यास सांगुन, तो विश्वाच्या प्रमेय व समीकरणांविषयी त्यांना कल्पना करण्यास सांगतअसे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीस व उत्सुकतेस विशेष वाव मिळत असे. त्यांच्या मनात विश्व, खगोल, ग्रह - तारे यांविषयी आपसुकच कुतूहल निर्माण होत असे. 

        हुशार व्यक्तींचे हस्ताक्षर हे खूप खराब असते, असा एक सर्वसामान्य समज आहे. आणि कदाचित तो बरोबरही असेल. कारण त्यांची विचारप्रक्रिया ही जलदगत्या काम करत असते. अल्बर्ट यात पिछाडीवर कसा बरं राहील. अल्बर्टला अशी कोणतीही गोष्ट लक्षात राहत नसे, जी पुस्तकात शोधल्यावर दोन मिनिटांत सापडेल. गंमत म्हणजे त्याला स्वतः चा टेलिफोन नंबर देखील लक्षात राहत नसे. तर इतरांचे वाढदिवस, महत्त्वाचे सणप्रसंग दुरापास्तच समजा. 

           आईन्स्टाईन आणि मिलेवा दोघंही जन्मजात उच्च प्रतिभा आणि बुध्दीवैभव घेऊन आले होते. आईन्स्टाईनचे संशोधन पेपर तयार करण्यात मिलेवाची त्याला चांगलीच मदत होई. यावर मिलेवाचं मत होतं की, संशोधन पेपर प्रकाशनात तिचंही नाव सोबत असावं, मात्र आईन्स्टाईनने ते कधीही मान्य केलं नाही. आईन्स्टाईनने त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे शोध लावले. 

- Photoelectric effect

- Brownion Motion

- General Theory of relativity 

- Special Theory of relativity 

- E = Mc2 

- Einstein field equations

- Bose Einstein Statistics 

- Bose Einstein Condensate 

- Gravitational wave

- Cosmological Constant 

- Unified field theory 

- EPR Paradox 

- Ensemble Interpretation 

              आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धान्त (Photoelectric effect)  व त्याच्या भौतिकशास्त्रातील निरपेक्ष सेवेबद्दल त्याला 1921 साली नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला. त्याने शोध लावलेल्या E = Mc2 या समीकरणाने अणुऊर्जा आणि अणुबॉम्बच्या विकासाचे पूर्वचित्रण केले. एखाद्या शरीराची उर्जा (E) त्या भागातील द्रव्यमानच्या (M)  बरोबरीने प्रकाश चौरस(C2)  च्या वेळेपेक्षा जास्त असते. या समीकरणाने असे सूचित केले की, पदार्थाचे छोटे कण प्रचंड प्रमाणात उर्जेमध्ये रूपांतरित होऊ शकतात. या आधारावर अणुऊर्जा निर्मितीची कवाडे खुली झाली. त्याच वेळी दुसऱ्या महायुद्धाचा अगदी धामधुमीचा काळ होता. हिटलरची हुकूमशाही सत्तापटलावर विराजमान झालेली होती. आईन्स्टाईन हा ज्यु परिवारात वाढलेला होता. आणि ज्यु लोकांचा जर्मनीत यथेच्छ शिरच्छेद करण्यात येत होते. साऱ्या ज्यु लोकांना हिटलरने देश सोडून जाण्यास ठणकावून सांगितले. त्यात आईन्स्टाईनलाही जर्मनी सोडणे भाग होतं. पण त्याला हा देश सोडणं रुचत नव्हते, शेवटी आपल्या पत्नीच्या आग्रहाखातर त्याने जर्मन नागरिकत्वाचा त्याग करून वैश्विक नागरिकतेचा (World Citizenship)  स्वीकार केला. व नंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. 

         आईन्स्टाईन हा मानवतावादी होता. अणुबॉम्बच्या राजकारणाशी असलेला त्याचा संबंध सुपरिचित आहे. प्रेसिडेंट फ्रॅन्कलिन रुझवेल्टला लिहिलेल्या प्रसिद्ध पत्रावर त्याची सही होती. त्या पत्रानंच अमेरिकेला अणुबॉम्बच्या कल्पनेचा पाठपुरावा करायला उद्युक्त केलं. मात्र प्रत्यक्षात आईन्स्टाईन अणुबॉम्ब बनवण्याच्या विरोधात होता. होणार्‍या नरसंहाराची त्याला कल्पना होती. मात्र नकळतपणे तो या राजकारणाच्या परिपेचात ओढला गेला. 

         पहिल्या महायुद्धाच्या काळात बर्लिनला प्राध्यापक असताना, आईनस्टाईननं राजकारणातील पहिली कृती केली. मानवी जीवसंहार पाहवेनासा होऊन तो युध्दविरोधी निदर्शनात सामील झाला. त्यानं केलेला कायदेभंगाचा पुरस्कार आणि सैन्यात भरती होणं नाकारण्यासाठी लोकांना उघडपणे दिलेलं प्रोत्साहन यांमुळे तो सहकाऱ्यांत दुरावला गेला. 

            आईन्स्टाईनचं दुसरं थोर ध्येय होतं.  ज्यु राष्ट्राची  स्थापना.  जन्मानं ज्यु असला तरी त्याने बायबलमधील ईश्वराची संकल्पना नाकारली होती. तथापि, पहिल्या महायुद्धापूर्वी आणि नंतरही, ज्यु विरोधी तापमान जसजसं तापू लागलं तसतसा तो समाजाशी एकसंध जोडला गेला. आईन्स्टाईन हा निर्भीड होता. त्याच्या सिध्दांतांवर हल्ले झाले. तरी लोकांत अप्रिय होण्याच्या भीतीने त्यानं स्वतःच मन उघड करणं थांबवलं नव्हतं. शांततेसाठी त्याने आयुष्यभर प्रयत्न केले.  ज्यु राष्ट्रवादाला त्यानं दिलेल्या बोलक्या पाठिंब्याची १९५२ मध्ये सुयोग्य दखल घेतली जाऊन, त्याला ईस्त्रायलचं राष्ट्रपतीपद देऊ करण्यात आलं. पण आपण राजकारणात फारच भाबडे आहोत असं म्हणत त्याने ते नाकारलं.  खरेतर वास्तवात आईन्स्टाईनचं जीवन समीकरणं आणि राजकारणात विभागलेलं होतं. मग यावर आईन्स्टाईन म्हणत असे,  "मला समीकरणं जास्त महत्त्वाची वाटतात, कारण राजकारण आजच्या साठी असतं, मात्र समीकरणं ही शाश्वत काळासाठीची गोष्ट आहे."

               शास्त्र जगतातील आईन्स्टाईन हा कदाचित पहिलाच शास्त्रज्ञ म्हणावा, ज्याने राजकारणात सहभाग नोंदवला असेल. राजकीय - सामाजिक जीवनात त्याची स्वतःची स्वतंत्र तत्त्वप्रणाली होती. आणि त्यावर तो ठाम होता. आयुष्यभर फक्त प्रयोग करत न बसता, परिवार, समाज, राष्ट्र, यांत सहभागी होत, वैयक्तिक आयुष्यही तो छान जगला. आईन्स्टाईनला व्हायोलिन वादनाची विशेष आवड होती. कधी कधी तो खूप मिश्कील हावभाव चेहर्‍यावर आणत असे. व आपल्या प्रियजनांमध्ये नेहमी हास्याचे फवारे उडवत असे.

          आईन्स्टाईनचा मृत्यू 18 एप्रिल 1955 साली प्रिन्सटन न्यु जर्सीत (USA)  झाला. 76 वर्षाचं रंगतदार आयुष्य जगून हा विश्वातील चमकदार तारा अनंतात विलीन झाला. आईनस्टाईनच्या मृत्युनंतर त्याच्या परिवाराच्या संमतीविना त्याचा मेंदू डॉ. थॉमस स्टाॅल्त्झ हार्वे यांनी न्युरोसायन्सच्या भविष्यातील अभ्यासासाठी काढून घेण्यात आला. त्याचा मेंदू आता प्रिन्सटन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर अमेरिकेत ठेवण्यात आला आहे. आईन्स्टाईन हा बर्‍याच कादंबर्‍या, नाटकं, सिनेमा, आणि संगीतातील कामांचा विषय व प्रेरणास्थान राहिला आहे. एक यशस्वी शास्त्रज्ञ व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्याची कारकीर्द दैदिप्यमान ठरली. 


                         निकीता चंद्रकला दादाभाई

No comments:

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...