Friday, 5 June 2020

लज्जा

  •                    तसलिमा नासरिन यांच्या "लज्जा" या  कादंबरीचा थोडक्यात गोषवारा.  :                        


                लाॅकडाउन काळात आता घरीच असताना सहज आमच्या मास्तरांकडून मला एक कादंबरी वाचायला मिळाली. 'लज्जा ' तसलिमा नासरिन या बांग्लादेशीय लेखिकेची ही कादंबरी बहुचर्चित व धर्माचा डंका वाजवणाऱ्यांसाठी वादविवादात्मक ठरली. ही कादंबरी धार्मिक कट्टरवाद व माणसानं माणसाला दिलेली अमानुष वागणूक या दोन्हींवर कोरडे ओढते. अत्यंत प्रखर वास्तववादावर आधारित ही कादंबरी धर्माचं राजकारण करणाऱ्या धर्ममार्तंडांची रक्तपिपासुवृत्ती आणि आधुनिक काळातील हिंसाचाराचं प्रत्ययकारी चित्रण करते. 
             धार्मिक मूलतत्ववादाचा रोग हा केवळ भारत - पाक मधील हिंदू - मुस्लीमांत नसून पूर्वीचा अखंड भारतातील हिस्सा असलेल्या बांग्लामध्येही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. समाजामध्ये धर्माचं प्रस्थ इतकं वाढत चाललय की तिसर्‍या जगामधल्या अर्धपोटी दुर्बल आणि पीडित लोकांना त्याच्या प्रभावाखालून बाहेर येणं फार कठीण झालं आहे. 
        1947 सालापासून ते 1971 सालापर्यंत बंगाली लोकांनी एकामागोमाग एक रक्तपात पाहिले. या सर्वांचं एकत्रित पर्यवसान 1971 सालच्या स्वातंत्र्यलढ्यात झालं. तीस लाख बंगाली आयुष्यांची आहुती पडल्यानंतर बांग्लावासीयांना पाकपासून स्वातंत्र्यप्राप्ती  मिळाली. 'माणसाची राष्ट्रीय भावना ही त्याच्या धर्मावर अवलंबून नसते' हे यावरून सिध्द झालं. 
              6 डिसेंबर 1992 रोजी भारतात काही धार्मिक मुलतत्ववाद्यांनी बाबरी मशिदीचा विनाश केला.  भारताच्या धार्मिक इतिहासातील सर्वांत विवादास्पद राहिलेल्या या घटनेचा साऱ्या जगानं  निषेध केला. पण या कृत्याचे पडसाद शेजारी राष्ट्र असलेल्या बांग्लादेशात मात्र फार तीव्रतेनं उमटले. या कृत्यामुळे भारतातच नव्हे तर, पूर्वी भारतीय उपखंडाचाच हिस्सा असलेल्या पाकिस्तान व बांग्लादेशात याच्या प्रतिक्रिया एका फार मोठ्या धर्मद्वेषाच्या रुपात उठल्यावाचून राहिल्या नाहीत. अखंड भारतवर्षाच्या भूतपूर्व हिस्सा राहिलेली थायलंड, मलेशिया, बलुचिस्तान, इंडोनेशिया, तिबेट, अफगाण, जावा, सुमात्रा, नेपाल, भूतान, अशा तमाम भारताच्या आसपासच्या  राष्ट्रांत हिंदू समुदाय वास्तव्यास आहे. भारतात होणार्‍या धार्मिक घटनांचा या नजीकच्या राष्ट्रांवर तीव्र - सौम्य  परिणाम झाल्यावाचून राहत नाही. 
          1992 साली भारतात मुस्लिमांचं धार्मिक स्थळ ( बाबरी मशीद) जमीनदोस्त केलं, म्हणून याच पद्धतीने बांग्लामध्ये देखील हिंदुंची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्यांची घरे जाळण्यात आली. भाजपच्या प्रेरणेमुळे कारसेवकांनी बाबरी मशीद फोडली; पण त्यांचे हे लक्षात आले नाही की, या धर्मांध भावनेच्या भरात केलेल्या कृत्याचे पडसाद फक्त भारताच्या चौकटीपुरताच कसे मर्यादित राहतील. खुद्द भारतातच या प्रकारानंतर जागोजागी जातीय दंगली उसळल्या. आपल्या जातीच्या व धर्माच्या हिताचे रक्षण करु पाहणाऱ्यांना, व अशा जातीय दंगली घडवून आणणार्‍यांना आपल्या उर्वरित बांधवांबद्दल कदाचित तमा नसते. भारतात भाजपला जे स्थान आहे, तेच बांग्लात जमात - ए - इस्लामला आहे. दोन्ही गटांचा हेतू एकच आहे ' मुलतत्ववादाची स्थापना' 
         1992 साली धर्माच्या नावाखाली ज्या दंगली उसळल्या त्या अत्यंत अमानुष व सामाजिक - धार्मिक द्वेष निर्माण करणार्‍या ठरल्या. 'दंगल ' हा काना - मात्रा नसलेला फक्त तीन अक्षरी शब्द, मात्र बघा समाजात तो केवढी दहशत निर्माण करतो. या शब्दाचा अर्थ एका जातीच्या लोकांनी दुसऱ्या जातीचा बळी घेणे असा होतो की, एका जातीने दुसर्‍या जातीचं पावित्र्य आणि  एकान्त यांचा अतीव निर्घृणपणे भंग करणे असा होतो. खरेतर दंगलींना कोणताही रंग -रूप -आकार नसतो. असतो फक्त द्वेष, तिरस्कार, मत्सर, हिंसक भावना एका गटाची दुसऱ्या गटाविरुध्द. मात्र, त्यांच्या कर्माची फळं निष्पाप जिवांना भोगावी लागतात. 1992 च्या दंगलीत बांग्लामध्ये अल्पसंख्याक हिंदू बळी पडले तर 2002 च्या गुजरात दंगलीत अल्पसंख्य मुस्लिम. कारण काय तर धर्मसत्ता, आपल्या धर्माचे वर्चस्व प्रस्थापित करणे. मोठमोठाली भव्यदिव्य मंदिरं- मस्जिदी उभारणे.  या धर्माचे प्रस्थ माजवणाऱ्या काही अंशी लोकांमुळे राष्ट्रीयत्वाची - ऐक्य - एकात्मतेची भावना लोप पावते. लोकशाही परंपरेची वाताहत होऊन, गटागटांत सामाजिक - धार्मिक अराजकता माजते. 
          बलवानांनी शक्तिहीनांचं, श्रीमंतांनी गरिबांचं शोषण करायचं हा पायंडाच या समाजव्यवस्थेत प्रस्थापित झाला आहे. तुम्ही जर श्रीमंत असाल, तर मग तुम्ही हिंदू आहात की मुसलमान, याला फारसं महत्त्व नाही. तुमचा छळ ठरलेला असेल. यापुढे तार्किक विचारसरणी व मानवी सद्सदविवेकबुध्दी ही गहाण पडली आहे. दुर्दैवाने कोणत्याही भांडवलशाही समाजव्यवस्थेचा हा नियम आहे. या सर्व घटना "बळी तो कान पिळी" या स्वरुपाच्या आहेत. तत्त्ववेत्त्या मार्क्सचं वाक्य येथे समर्पकरीत्या लागु पडते. " धर्म ही अफूची गोळी आहे." जेवढा नशा अफुचा होत नसेल,  त्याहून कैकपटीने हा धर्माचा नशा काम करतो. आणि त्यापुढे आपला आदर्शवाद हा फोल ठरू लागतो. 
                जगाचा इतिहास सांगतो की, अल्पसंख्य व गरिबांचे नेहमीच शोषण व छळ होत आला आहे. मग ते जगाच्या कोणत्याही भागातील असो. कधी धर्माच्या आधारावर तर कधी Minority - Majority च्या तत्वावर, कमी - अधिक प्रमाणात का असेना पण हा वर्ग अन्यायाला बळी पडतोच. सत्ताधारी व उच्च वर्ग त्यांना पिचून काढतो. मग ते जर्मन मधील ज्यु असो,  अमेरिकेतील कृष्णवर्णीय असो, अथवा भारत - बांग्ला - पाक मधील हिंदू - मुस्लिम अल्पसंख्याक वर्ग असो  
       द्विराष्ट्रीय सिध्दान्ताचे ( Two Nation Theory)  प्रत्यक्षात आचरण करणे व्यवहारात किती अशक्य आहे हे जीनांना ठाऊक होते. जेव्हा माउंटबॅटन पंजाब आणि बंगालचे तुकडे करण्याविषयी बोलत होते, तेव्हा ते स्वतःच म्हणाले होते, - 
   " माणूस हिंदू किंवा मुसलमान असण्याआधी तो पंजाबी किंवा बंगाली असतो. त्यांची संस्कृती खाद्यपदार्थ, इतिहास, भाषा आणि आर्थिक पार्श्वभूमी एक असते. तुमच्या या कृत्यामुळे नाहक रक्तपातच होईल."  राष्ट्राच्या उभारणीत दोन राष्ट्र किंवा दोन जातींचा प्रश्न  जीनांनी  दुर्लक्षित केला होता. त्यांनी म्हटलं होतं, आजपासून यापुढं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध इतर कोणत्याही लोकांना त्यांच्या धर्माने नव्हे तर पाकिस्तानी म्हणून ओळखले जाईल. 
       धर्म हा पीडितांचा आणि गांजलेल्यांचा सुस्कारा आहे, निष्ठुर जगाचं ह्रदय आहे. भारत - पाक फाळणी धर्माच्या आधारावर झाली. मात्र बांग्ला - पाक फाळणी Majority च्या बळावर झाली. यावरून आपल्या लक्षात येतं की, मानवी जीवनात धर्म अंतिम नाही. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ - " सर्व धर्मांबाबत एक प्रकारची समान सहिष्णुवृत्ती. धर्मनिरपेक्षतेमध्ये भेदभावाला जागाच नसते. याचा अर्थ हा, की धर्म आणि राजकारण यांची फारकत." मात्र मुलतत्ववादी यात जाणूनबुजून धर्म आणि राजकारणाचा मिलाप करून संविधानिक मुल्यांचा भंग करतात. आणि सध्याच्या परिस्थितीत तर राजकीय अस्त्र म्हणून धर्माला चपखलपणे वापरले जातेय. 
           बांग्लादेश राष्ट्राची उभारणी चार मुख्य तत्त्वांवर झाली होती: राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि समाजवाद. देश स्वातंत्र्यप्राप्तीसाठी फार काळ झगडला होता. या चळवळीची सुरुवात 1952 सालच्या भाषिक चळवळीपासुन झाली. त्या प्रक्रियेत जातीयवाद आणि धर्मांधतेसारख्या दुष्प्रवृत्तींची हार झाली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर प्रतिगामी शक्ती सत्तेवर आल्या व त्यांनी ताठर मूलतत्ववादाला पुन्हा उजाळा दिला. परिणामी जातीयवाद आणि पराकोटीचं धर्मवेड हे दोन्ही हाताबाहेर गेलं. आणि तेथे धार्मिक भेदाभेदाला विशेष चालना मिळाली. ज्याचा परिणाम 1992 च्या दंगलीत चांगलाच दृष्टीस पडतो. संख्येने कमी असणार्‍या हिंदूंची घरं जाळली गेली. दुकानांची तोडफोड झाली. मंदिरांची पाडझाड करण्यात आली. महिलांवर बलात्कार करण्यात आले. या नरसंहाराने तेथील हिंदू अल्पसंख्याकांना मोठ्या प्रमाणात भारतात निर्वासित म्हणून स्थलांतर करावे लागले. जेव्हा आपल्याच राष्ट्रांत आपल्या जीवावर उठणारी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी आपली राष्ट्रीय भावना मोडून पडलेली असते. आपली राष्ट्रभक्ती गळून पडते. आणि आपल्या मातृभुमीबद्दलचे प्रेम आटून जाते. या सर्व परिस्थितीला, आपल्या मानसिकतेला कारणीभूत ठरते आजुबाजुची जुलमी व्यवस्था, जातिधर्माचा प्रपोगंडा आणि अमानुषपणे होणारे अत्याचार. 
          मात्र या ठिकाणी एक मोठा प्रश्न अनुत्तरित राहतो,  तो म्हणजेच " जर तुम्ही स्वतः च्या राष्ट्रांत, स्वतःच्या घरात सुरक्षित राहू शकत नसाल, तर जगात इतरत्र कुठे तुम्हाला सुरक्षितता जाणवेल.?"
       

                                निकीता चंद्रकला दादाभाई 

12 comments:

Unknown said...

लेख खुप अप्रतिम आहे

Unknown said...

Sundar......

Unknown said...

Khup apratim lekh Aani bhashashaili 😍

Nikita Sonawane said...

Thank you

Nikita Sonawane said...

Thanks

Nikita Sonawane said...

वाचकांच्या प्रतिक्रिया नवीन लिखाणास प्रोत्साहित करतात., धन्यवाद 🙌

Unknown said...

Keep it up Nikita. awesome

Unknown said...

Keep it up Nikita awesome

Anonymous said...

��

Unknown said...

Khup chan.... Sundar

Unknown said...

Nice 👌nikii

Ravindra pawar "Neer said...
This comment has been removed by the author.

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...