Thursday, 18 June 2020

ही केवळ पुरुषांची दुनिया नव्हे ;

ही केवळ पुरुषांची दुनिया नव्हे ;

            " मुलगी शिकली, प्रगती झाली " हे Slogan मी आमच्या जि. प. शाळेच्या भिंतीवर वाचलेलं होतं, आणि तेव्हापासून ते माझ्या डोक्यात एकदम फिट झालेलं आहे. कुठेच कानामात्रेचा फरक नाही. अगदी सेम टु सेम. त्यावेळी आम्ही सर्व विद्यार्थी प्रार्थनेच्या वेळी मोठ्याने नारा देत हे घोषवाक्य म्हणत असु. 
           पण याचा खरा अर्थ वास्तविक जीवन जगताना कळत असतो. खरंच मुलगी शिकुन प्रगती झाली का? शाळेतले हे  Slogan माझ्या डोक्यात असा प्रश्न म्हणून उभा राहिलं. कारण मी जे बघितलं, अनुभवलं यानेच माझ्या समोर प्रश्न उपस्थित केला. 
        आमच्या सोसायटीत एक उच्चविद्याविभूषित कुटुंब राहतं. आताच आलेय ते वास्तव्यास सहा ते आठ महिन्यांपूर्वी. कुटुंबात फक्त तीन लोकं आहेत. नवरा - बायको आणि सासुबाई. त्या घरातील सासुबाई या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहे, मुलगा बंँकेत  C. A. च्या पदावर कार्यरत आहे तर, सुनबाई या इंजीनिअरिंग च्या पदवीधर आहे. सासरेबुवांचं देहांत झालंय. "छोटा परिवार सुखी परिवार" हे आपण, पुस्तकात शासकीय योजनांत शिकलेलो असतो. आणि इथं तर परिवार लहान तर आहेच, सोबतच उच्चशिक्षितही. म्हणजेच सुखी - समाधानी असेल. यात शंकाच नाही. असं आपलं सर्वसामान्य गृहीतक.  पण गृहीतक हे मानुन चालत नाही तर ते  सिद्ध करावं लागतं. 
             या कुटुंबात घरातील सर्व हक्क सासुबाईंकडे आहे. नवरा रोज उठून आॅफिसात जातो. सासुबाई सेवानिवृत्त आहेत. सुनेला नोकरी करायची ईच्छा आहे, पण सासुपुढे जाता येत नाही. नवर्‍याला आपले मत पटत नाही. पटत असुनही तो आईपुढे जाणार नाही. मग त्या बाईने तिथेच आपल्या स्वप्नांना, मतांना तिलांजली द्यायची. ती पण नवर्‍याएवढा पगार कमावू शकते. ती पण घर चालवू शकते. मात्र नाही आपल्या समाजव्यवस्थेने तर तिला दुय्यम म्हणूनच स्वीकारलंय ना. मग कुठे आली तिची स्वप्ने, आणि ईच्छा, आकांक्षा ते तर बहुतेकवेळा  नसल्यातच जमा असतात.  
            ती पोरगी तिच्या बापाकडे चांगली हौसमौज पूर्ण करत वाढली. बापाने तिला इंजीनिअरिंग पर्यंत शिकवलं. सगळे लाड तिच्या गरजा पूर्ण केल्या. लग्नाचं वय होत आलं होतं, पोरगी पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती. आणि अचानक हे C. A. चं स्थळ आलं. चांगला उच्चशिक्षित परिवार आहे. पोरगा चांगल्या नोकरीला आहे. सुशिक्षित परिवारात आपली पोरगी गेली म्हणजे तिचं भविष्यही उजळ होईल.  अशी त्या भाबड्या आईवडीलांची धारणा. 
         दोन्ही कुटुंबाचं एकमत झालं आणि लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. सुनबाई म्हणून पोरीने आपल्या नव्या घरी प्रवेश केला. "नव्याचे नऊ दिवस" प्रमाणे घरात पाहुणे मंडळी होती तोपर्यंत छान दिवस जात होते. मात्र नंतर परिस्थिती बदलत गेली. सासुबाईंच वागणं कठोर होऊ लागलं. शब्द प्रहार करु लागले. नवर्‍याला सांगायची गय नव्हती. घरात त्याला आईपुढे मतस्वातंत्र्य नव्हते. पठ्ठ्या पूर्णपणे आईचं ऐकून होता. आणि बायकोपुढे तानाशाही गाजवायचा. 
            पोरीला प्रत्येक कामावरून चूक असो किंवा नसो टोमणे मात्र एकावेच लागत होते. भाजीत खडा निघाला, तरी त्याची तुलना शिक्षणाशी केली जाते. एवढं शिकली आणि साधा स्वयंपाक येत नाही. भांड्यांना बघ कसा साबण राहिलाय. कपड्यांवर कसे डाग दिसताय. त्या टेबलखाली बघ कशी धुळ जमा झालीय.  एवढं शिकली पण साधं घरकामं जमत नाही. आजकालच्या पोरी! ...असे उद्गार ऐकणं आता तिला नेहमीचच झालं होतं. 
            हळूहळू आता परिस्थिती गंभीर होत चालली होती. नवरा पण मारहाण करायला लागला होता. आणि या हिंसक मानसिकतेची पाळेमुळे हळुहळु त्याच्या डोक्यात आईच्या कृतीतुनच रुजलेली होती. एके काळी कॉलेज मध्ये टाॅप करणारी पोरगी आज घरात जायबंद झाली होती. यातून एक प्रश्न डोकावतो की "शाळा कॉलेजात हुशार असणार्‍या मुली, दहावी बारावीला प्रथम येणाऱ्या पोरी, वेगवेगळ्या परीक्षांत  टॉप करणार्‍या मुली, ज्या निकाल लागल्यावर वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर झळकतात त्या  काही वर्षांनंतर कुठे गायब होतात?"  अशी प्रकरणं पाहून मग लक्षात येतं की त्या लग्नाच्या बंधनात जेरबंद झालेल्या असतात. 
             लाॅकडाउन ही शब्दावलीच त्यात अडकून पडल्याची जाणीव करुन देते. लाॅकडाउन म्हणजे कैद होणे,  आपणा सर्व सामान्यांना कोरोनाने लाॅकडाउन केलंय मात्र, या व्यवस्थेतील महिला तर फार पूर्वीपासूनच लाॅकडाउन चा अनुभव घेऊन जीवन कंठतेय. या एकविसाव्या शतकात देखील समाजातील एक महिलावर्ग असा आहे, जो आजही सासू, सासरे, नवरा यांच्या नजरकैदेत राहून आयुष्य पुढे ढकलतोय. त्यांच लाॅकडाउन इथल्या पितृसत्ताक व्यवस्थेने, पुरुषी मानसिकतेने व प्रथा, परंपरांनी केव्हाच सुरू केलंय. ज्याचा शेवट करण्यात या बायकांची हिम्मत कमी पडतेय. कारण त्या वाढल्याच अशा वातावरणात आहे, की जेथे त्यांना सांगितलं जातं की, नवर्‍याचं घर हेच तुझं घर. म्हणून कितीही त्रास झाला तरी बाईने सर्व सहन करत संसार करायचा आणि याविरूद्ध ब्र जरी काढला तर समाज तयारच आहे, तिच्यातच काही खोट असेल म्हणून तर ती टिकली नाही, तिला संसार करता आला नाही.... वगैरे वगैरे.... विशेषणं द्यायला. 
           
         अशाच काही कारणांमुळे हे नको असलेलं नातं जपण्यासाठी महिला झटत असतात. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करूनही महिला Confused किंवा आपल्या या नात्याबाबत संदिग्ध मनोअवस्थेत असतात. आपल्या सोबत होणारा त्रास आणि चुकीच्या वागण्याला किंवा परिस्थितीला ते स्वतःलाच जबाबदार धरत असतात. किंवा स्वतःलाच दोषी मानतात. यामुळे त्यांच्यातील आत्मसन्मान कुठेतरी हरवून जातो. आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या जगण्याला काही अर्थच नाही. यामुळे त्यांच्या अंर्तमनाची घुसमट ही सतत वाढत असते. 
            अनेकदा महिला समाजाच्या भीतीने किंवा लोक काय म्हणतील याचा विचार करून हे नातं संपवत नाही. कितीही त्रास झाला तरी शेवटपर्यंत ते नात टिकवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. बहुतेक वेळा तर आपल्या सोबत घडलेल्या बाबी ते कोणाला सांगत देखील नाही. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत, ते या नात्यात स्वतःला बांधून घेतात. Single Parent बनून मुलांना वाढवणं हे त्यांना रुचत  नाही, आपल्या पाल्यांचे भविष्य  सुरक्षित करायची त्यांची  तळमळ असते. बाप नाही म्हणून पोरांना कुणी हिनवु नये, किंवा बापाच्या प्रेमापासून पोरांची ताटातूट न व्हावी यासाठी स्वतःला या नात्यात Adjust त्या करत  असतात. 
                आपला असा, समज असतो की, कमी शिकलेल्या पोरीच अशा नात्यामध्ये अडकत असतील. पण आपला हा समज खोटा आहे. उच्चशिक्षित आणि नोकरदार महिलाही  हे नातं अशाच पध्दतीने निभावत असतात. आणि त्यांची संख्याही काही कमी नाही. 
          जगात 50% पुरुष असे आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या पत्नीवर हात उचलतात. 2019 मध्ये आलेला थप्पड सिनेमा हा इथे समर्पक उदाहरण म्हणून देता येईल.  तुम्हाला राग आला आणि तुम्ही सहज कानात वाजवून दिली. आणि  एक चापटच तर मारली म्हणून बाईने लगेच विसरून जायचं. अशी त्यांची मानसिकता असते. मात्र  ही हिंसा असते. मग ते हात उगारणं असु द्या किंवा इतर मारहाण. हिंसेची सुरुवात छोट्या गोष्टीपासुनच होते. म्हणून पहिल्या वेळीच नाही म्हणायला, प्रतिकार करायला शिकलं पाहिजे. यात पुरुषांच्या मनात Inferior आणि Superior ही भावना भिनलेली असते. म्हणजेच आपण Superior वरिष्ठ, वरचढ  आहोत. आणि आपली बायको दुय्यम, कनिष्ठ आहे. आणि हेच इथली पितृसत्ताक व्यवस्था रुजवत आलीय. 
                महिलांना दुय्यम वागणूक देऊन,  तिच्या स्वप्नांना चिरडून  बहुतेक वेळा तिला घरातच नव्हे तर, मित्रमंडळीत, नातेवाईकांसमोर अपमानित करून तिची चेष्टा  केल्याने  महिला या मानसिक तणावाखाली जगत असतात. त्यांच्या विचारांना वाट मोकळी करून देणं गरजेचं आहे. त्यांना खुलेपणाने व्यक्त होता आलं पाहिजे, आपली मतं मांडता आली पाहिजे. एक व्यक्ती म्हणून तिलाही समान महत्त्व घरात द्या. तिच्या निर्णयांचा आदर करा. तरच घरात आनंद, सुख आणि लोकशाही नांदेल. 
                   आपला समाज कितीही शिक्षित होउ द्या, मात्र जोपर्यंत तो मानवी मुल्ये अंगीकारत नाही. आणि समता, ममता व बंधुता हा त्रिगुणी मानवी डोस कृतीत उतरवुन विषमता, भेदभाव, हिंसा... यांसारख्या तुच्छ गुणांपासून फारकत घेत नाही , तोपर्यंत तो सुशिक्षित म्हणून गणला जाणार नाही. 

        मानवी हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या इथल्या  समाज व्यवस्थेत  येणार्‍या प्रत्येक दिनी वाढणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या घटना कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, शारिरीक - मानसिक मानहानी, हुंडाबळी,... यांसारख्या अनेक घटना  संविधानिक व मानवी मूल्यांना काळिमा फासणाऱ्या  आहेत. __ज्यांच्याविषयी बोललं जाणं, लिहिलं जाणं,  व वेगवेगळ्या माध्यमातून त्या उघडकीस आणणं गरजेचं आहे. 

"पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी तो माणुसकी विसरतो।
अन् स्वतःच्या अस्तित्वासाठी ती स्त्री म्हणून जगते।।

                              -  निकीता चंद्रकला दादाभाई 

3 comments:

Ravindra pawar "Neer said...
This comment has been removed by the author.
Ravindra pawar "Neer said...

खुपचं छान, सत्य आहे... पुरूषी मानसिकता अगदी बरोबर मांडली आहे,

Anonymous said...

अगदी बरोबर खुपच छान लेख मुळात स्त्री हिच पुरुषाला जगात आणते. हि दुनिया दाखविते.

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...