Friday, 19 June 2020

शिवाजी महाराज आणि स्त्री विषयक विचार


           "शिवाजी महाराज आणि स्त्री                                   विषयक विचार "


            आपल्या पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीत, अनेक संत - महंत, राजे - महाराजे, शासक - प्रशासक, समाजसुधारक होउन गेले. ज्यांनी स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी व उंचावण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. मात्र पावणेचारशे वर्षांपूर्वी सोळाव्या शतकात अख्ख्या स्वराज्याचे तारणहार ठरलेले राजे शिवछत्रपतींनी या दिशेने कृतिप्रवण कार्य केले. 

                शिवाजी राजे मध्ययुगीन काळातील पहिले असे राजे होते, ज्यांनी स्त्रियांच्या दैनावस्थेला आळा घालण्यासाठी पहिल्या प्रथम प्राधान्य दिले आणि याविरूद्ध कठोर पावले उचलली. महाराजांनी आपल्या मातोश्री, आउसाहेबांना सती जाण्यापासून परावृत्त केले व आपल्या कार्यातून स्त्रियांचे सामाजिक स्थान व सुरक्षा त्यांनी शाबूत ठेवली. ही त्या काळातील सामाजिक क्रांतीच होती. जिची पाळेमुळे अठराव्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळींचा उगवता शुक्रतारा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या 'राजाराम मोहन राॅय यांच्या कार्यात नजरेस पडते. आणि पुढेही अनेक स्त्री समाजसुधारकांनी महाराजांचा या कामी वसा घेत आपली वाटचाल चालू ठेवली. 
                मध्ययुगीन काळात स्त्रीयांना दास्यत्वासाठी गुलाम म्हणून वापरले जाई. त्यांची खरेदी - विक्री होई. आणि स्त्रियांची विटंबना केली जात असे. या सर्व गोष्टींवर महाराजांनी बंदी आणली होती. महाराजांविषयी बोलताना प्राच्यविद्यापंडित - शरद पाटील असे म्हणतात, शिवाजी महाराजांचे धोरण त्यांच्या समतावादी धोरणात आहे. त्यांनी आपल्या स्वराज्यात जातीभेद,  धर्मभेद, किंवा लिंगभेद अशा कोणत्याच गोष्टीला जराही थारा दिला नाही. महाराजांनी स्त्री - पुरुष असा भेदभाव  कधीही केला नाही. महिलांना नेहमीच आदर, सन्मान आणि त्यांना संधी देण्याचे काम राजांनी केलं. 
                  शिवचरित्राचे अभ्यासक लालजी पेंडसे आपलं मत नोंदवताना म्हणतात की, शिवाजी राजे गोरगरीब, उपेक्षित वर्गाबाबत अत्यंत कनवाळू होते. समाजातील शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, मजुर आणि विशेषतः सर्व जातिधर्मांतील महिला या कायमच उपेक्षित राहिल्या आहेत, या उपेक्षित वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात महाराज त्यांच्याबाबत फार सह्रदयी होते. 
             आपल्या स्वराज्याच्या भूमीत महाराजांनी महिलांवर अन्याय - अत्याचार करणाऱ्यांची कधीच गय केली नाही. महिलांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा, सुरक्षित राहण्याचा, व व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करणारा स्वकीय जरी असला तरी महाराज त्याला कठोर शिक्षा करत. आपल्या राज्यातील सैन्याला महाराजांचे सक्त आदेश होते, स्त्रियांना मोहिमेवर आणू नये. त्यांना युध्दात पकडू नये. स्त्रीसंबंधी गुन्हयाला क्षमा नव्हतीच. मग तो कुणीही असो. साधा शिपाई, असो वा वतनदार, जहांगीर, कुलकर्णी, किल्लेदार, असो कुणालाही माफी नव्हती. 
                ज्या काळात युद्धामध्ये हरल्यानंतर शत्रुपक्षाच्या स्त्रियांची विटंबना केली जाई. स्त्रियांना भेटवस्तू म्हणून दिले जाई. त्यांचे कल्पनेपलीकडे शोषण केले जाई. स्त्रियांना बळजबरीने जनानखान्यात कोंबले जाई. किंवा लग्न लावले जाई. तहामध्ये स्त्रियांची मागणी केली जाई. गावाशेजारी लष्करी छावणी पडली की, लोकानां आपल्या बायका - मुलींना घेउन जंगलात पळून जावं लागत असे. त्यांच्या अब्रू रक्षणासाठी ....ज्या काळात प्रजेचे रक्षकच स्त्री भक्षक बनले होते, त्यावेळी शिवाजी राजे हे स्त्री रक्षक बनले होते. 
                 छत्रपती शिवाजी महाराजांचा  दंडकच होता की, स्वराज्यातील असो, की परराज्यातील प्रत्येक स्त्रीचा आदर, सन्मान राखला पाहिजे. इतिहासकार डॉ. बाळकृष्ण म्हणतात, महाराजांच्या छावणीत नर्तकी, मद्यालये, आणि अमली पदार्थांवर कडक निर्बंध होते. त्यांच्या राज्यात स्त्रियांना कैद करायला बंदी होती. जनानखान्यांना प्रतिबंध होता. 
              दक्षिण दिग्विजयहून स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या महाराजांच्या विरुध्द लढल्या. त्यावेळी सावित्रीबाईंचा अवमान करणाऱ्या स्वकीय सरदारांना महाराजांनी शिक्षा केली. व सावित्रीबाईंना सन्मानाची वागणूक दिली. त्यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दूध पाजण्याचे शिल्प आजही यादवाडला पाहावयास मिळते. राजकीय संघर्षात देखील महिलांचा अवमान होणार नाही, याची पुरेपूर दक्षता शिवराय घेत असत. याचीच साक्ष देणारा दुसरा प्रसंग म्हणजे महाराजांनी पनवेल जवळचा प्रबळगड जिंकला. त्या लढाईत तेथील किल्लेदार केसरीसिंह धारातीर्थी पडला. त्याची आई, पत्नी, मुले यांना महाराजांसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी महाराजांनी त्यांना अभय दिले. व त्यांचा यथोचित सन्मान करुन त्यांना आपल्या मूळ गावी सुखरुप पोहचवण्यात आले. 
             मोगल इतिहासकार 'खाफिखान'  लिहितो  "जसा भाऊ बहिणीशी वागतो, किंवा मुलगा आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे." दुश्मनाच्याही स्त्रियांचा सन्मान करावा. अशी उच्च कोटीची नैतिकता महाराजांच्या ठायी होती. आपल्या राजकीय विरोधकांच्या कुटुंबाचे संरक्षण करण्याचे,  व त्यांचा आदर बाळगण्याचे महाराजांचे  धोरण होते. ज्याची ते काटेकोरपणे अंमलबजावणी करत असे. 
              शिवकाळातील निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात असे. महाराजांच्या महिलाविषयक धोरणांमुळेच नंतरच्या काळात संभाजी राजांच्या पत्नी येसुबाई, राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या. शिवरायांच्या सुनांनी हातात तलवार घेऊन, घोड्यावर बसून रणांगण गाजवलं. सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. हे सर्व शक्य झाले ते केवळ शिवबाच्या महिलाविषयक धोरणामुळेच. 
                   आजही महिलांचा अनादर करणे, तिच्यावर जोरजबरदस्ती करणे, तिच्या मतांना, व्यक्तिस्वातंत्र्याला लाथाडून लावणे. असे करण्यात अनेक महाभागांना शूरपणा वाटतो. याच्याने त्यांची मर्दुमकी गाजते असे वाटते, मात्र या मावळ्यांनी लक्षात घ्यावे, की स्त्रियांना आदराने, सन्मानाने वागवणे हेच खरे शिवकार्य आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, तिला संधी देणे, व तिला समान दर्जा देणे हीच खरी शिवभक्ती आहे. महाराजांच्या जीवनात अनेक युध्दप्रसंग आले, गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली,जीवघेणे प्रसंग उद्भवले. पण महाराजांनी आपली नैतिकता व मूल्यांना शेवटपर्यंत तडा जाऊ दिला नाही. महिलांविषयी महाराजांचे विचार उच्चकोटीचे होते. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र आपल्याला नेहमीच देत राहील. 
       
                                 -  निकीता चंद्रकला दादाभाई 

Thursday, 18 June 2020

ही केवळ पुरुषांची दुनिया नव्हे ;

ही केवळ पुरुषांची दुनिया नव्हे ;

            " मुलगी शिकली, प्रगती झाली " हे Slogan मी आमच्या जि. प. शाळेच्या भिंतीवर वाचलेलं होतं, आणि तेव्हापासून ते माझ्या डोक्यात एकदम फिट झालेलं आहे. कुठेच कानामात्रेचा फरक नाही. अगदी सेम टु सेम. त्यावेळी आम्ही सर्व विद्यार्थी प्रार्थनेच्या वेळी मोठ्याने नारा देत हे घोषवाक्य म्हणत असु. 
           पण याचा खरा अर्थ वास्तविक जीवन जगताना कळत असतो. खरंच मुलगी शिकुन प्रगती झाली का? शाळेतले हे  Slogan माझ्या डोक्यात असा प्रश्न म्हणून उभा राहिलं. कारण मी जे बघितलं, अनुभवलं यानेच माझ्या समोर प्रश्न उपस्थित केला. 
        आमच्या सोसायटीत एक उच्चविद्याविभूषित कुटुंब राहतं. आताच आलेय ते वास्तव्यास सहा ते आठ महिन्यांपूर्वी. कुटुंबात फक्त तीन लोकं आहेत. नवरा - बायको आणि सासुबाई. त्या घरातील सासुबाई या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहे, मुलगा बंँकेत  C. A. च्या पदावर कार्यरत आहे तर, सुनबाई या इंजीनिअरिंग च्या पदवीधर आहे. सासरेबुवांचं देहांत झालंय. "छोटा परिवार सुखी परिवार" हे आपण, पुस्तकात शासकीय योजनांत शिकलेलो असतो. आणि इथं तर परिवार लहान तर आहेच, सोबतच उच्चशिक्षितही. म्हणजेच सुखी - समाधानी असेल. यात शंकाच नाही. असं आपलं सर्वसामान्य गृहीतक.  पण गृहीतक हे मानुन चालत नाही तर ते  सिद्ध करावं लागतं. 
             या कुटुंबात घरातील सर्व हक्क सासुबाईंकडे आहे. नवरा रोज उठून आॅफिसात जातो. सासुबाई सेवानिवृत्त आहेत. सुनेला नोकरी करायची ईच्छा आहे, पण सासुपुढे जाता येत नाही. नवर्‍याला आपले मत पटत नाही. पटत असुनही तो आईपुढे जाणार नाही. मग त्या बाईने तिथेच आपल्या स्वप्नांना, मतांना तिलांजली द्यायची. ती पण नवर्‍याएवढा पगार कमावू शकते. ती पण घर चालवू शकते. मात्र नाही आपल्या समाजव्यवस्थेने तर तिला दुय्यम म्हणूनच स्वीकारलंय ना. मग कुठे आली तिची स्वप्ने, आणि ईच्छा, आकांक्षा ते तर बहुतेकवेळा  नसल्यातच जमा असतात.  
            ती पोरगी तिच्या बापाकडे चांगली हौसमौज पूर्ण करत वाढली. बापाने तिला इंजीनिअरिंग पर्यंत शिकवलं. सगळे लाड तिच्या गरजा पूर्ण केल्या. लग्नाचं वय होत आलं होतं, पोरगी पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती. आणि अचानक हे C. A. चं स्थळ आलं. चांगला उच्चशिक्षित परिवार आहे. पोरगा चांगल्या नोकरीला आहे. सुशिक्षित परिवारात आपली पोरगी गेली म्हणजे तिचं भविष्यही उजळ होईल.  अशी त्या भाबड्या आईवडीलांची धारणा. 
         दोन्ही कुटुंबाचं एकमत झालं आणि लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. सुनबाई म्हणून पोरीने आपल्या नव्या घरी प्रवेश केला. "नव्याचे नऊ दिवस" प्रमाणे घरात पाहुणे मंडळी होती तोपर्यंत छान दिवस जात होते. मात्र नंतर परिस्थिती बदलत गेली. सासुबाईंच वागणं कठोर होऊ लागलं. शब्द प्रहार करु लागले. नवर्‍याला सांगायची गय नव्हती. घरात त्याला आईपुढे मतस्वातंत्र्य नव्हते. पठ्ठ्या पूर्णपणे आईचं ऐकून होता. आणि बायकोपुढे तानाशाही गाजवायचा. 
            पोरीला प्रत्येक कामावरून चूक असो किंवा नसो टोमणे मात्र एकावेच लागत होते. भाजीत खडा निघाला, तरी त्याची तुलना शिक्षणाशी केली जाते. एवढं शिकली आणि साधा स्वयंपाक येत नाही. भांड्यांना बघ कसा साबण राहिलाय. कपड्यांवर कसे डाग दिसताय. त्या टेबलखाली बघ कशी धुळ जमा झालीय.  एवढं शिकली पण साधं घरकामं जमत नाही. आजकालच्या पोरी! ...असे उद्गार ऐकणं आता तिला नेहमीचच झालं होतं. 
            हळूहळू आता परिस्थिती गंभीर होत चालली होती. नवरा पण मारहाण करायला लागला होता. आणि या हिंसक मानसिकतेची पाळेमुळे हळुहळु त्याच्या डोक्यात आईच्या कृतीतुनच रुजलेली होती. एके काळी कॉलेज मध्ये टाॅप करणारी पोरगी आज घरात जायबंद झाली होती. यातून एक प्रश्न डोकावतो की "शाळा कॉलेजात हुशार असणार्‍या मुली, दहावी बारावीला प्रथम येणाऱ्या पोरी, वेगवेगळ्या परीक्षांत  टॉप करणार्‍या मुली, ज्या निकाल लागल्यावर वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर झळकतात त्या  काही वर्षांनंतर कुठे गायब होतात?"  अशी प्रकरणं पाहून मग लक्षात येतं की त्या लग्नाच्या बंधनात जेरबंद झालेल्या असतात. 
             लाॅकडाउन ही शब्दावलीच त्यात अडकून पडल्याची जाणीव करुन देते. लाॅकडाउन म्हणजे कैद होणे,  आपणा सर्व सामान्यांना कोरोनाने लाॅकडाउन केलंय मात्र, या व्यवस्थेतील महिला तर फार पूर्वीपासूनच लाॅकडाउन चा अनुभव घेऊन जीवन कंठतेय. या एकविसाव्या शतकात देखील समाजातील एक महिलावर्ग असा आहे, जो आजही सासू, सासरे, नवरा यांच्या नजरकैदेत राहून आयुष्य पुढे ढकलतोय. त्यांच लाॅकडाउन इथल्या पितृसत्ताक व्यवस्थेने, पुरुषी मानसिकतेने व प्रथा, परंपरांनी केव्हाच सुरू केलंय. ज्याचा शेवट करण्यात या बायकांची हिम्मत कमी पडतेय. कारण त्या वाढल्याच अशा वातावरणात आहे, की जेथे त्यांना सांगितलं जातं की, नवर्‍याचं घर हेच तुझं घर. म्हणून कितीही त्रास झाला तरी बाईने सर्व सहन करत संसार करायचा आणि याविरूद्ध ब्र जरी काढला तर समाज तयारच आहे, तिच्यातच काही खोट असेल म्हणून तर ती टिकली नाही, तिला संसार करता आला नाही.... वगैरे वगैरे.... विशेषणं द्यायला. 
           
         अशाच काही कारणांमुळे हे नको असलेलं नातं जपण्यासाठी महिला झटत असतात. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करूनही महिला Confused किंवा आपल्या या नात्याबाबत संदिग्ध मनोअवस्थेत असतात. आपल्या सोबत होणारा त्रास आणि चुकीच्या वागण्याला किंवा परिस्थितीला ते स्वतःलाच जबाबदार धरत असतात. किंवा स्वतःलाच दोषी मानतात. यामुळे त्यांच्यातील आत्मसन्मान कुठेतरी हरवून जातो. आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या जगण्याला काही अर्थच नाही. यामुळे त्यांच्या अंर्तमनाची घुसमट ही सतत वाढत असते. 
            अनेकदा महिला समाजाच्या भीतीने किंवा लोक काय म्हणतील याचा विचार करून हे नातं संपवत नाही. कितीही त्रास झाला तरी शेवटपर्यंत ते नात टिकवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. बहुतेक वेळा तर आपल्या सोबत घडलेल्या बाबी ते कोणाला सांगत देखील नाही. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत, ते या नात्यात स्वतःला बांधून घेतात. Single Parent बनून मुलांना वाढवणं हे त्यांना रुचत  नाही, आपल्या पाल्यांचे भविष्य  सुरक्षित करायची त्यांची  तळमळ असते. बाप नाही म्हणून पोरांना कुणी हिनवु नये, किंवा बापाच्या प्रेमापासून पोरांची ताटातूट न व्हावी यासाठी स्वतःला या नात्यात Adjust त्या करत  असतात. 
                आपला असा, समज असतो की, कमी शिकलेल्या पोरीच अशा नात्यामध्ये अडकत असतील. पण आपला हा समज खोटा आहे. उच्चशिक्षित आणि नोकरदार महिलाही  हे नातं अशाच पध्दतीने निभावत असतात. आणि त्यांची संख्याही काही कमी नाही. 
          जगात 50% पुरुष असे आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या पत्नीवर हात उचलतात. 2019 मध्ये आलेला थप्पड सिनेमा हा इथे समर्पक उदाहरण म्हणून देता येईल.  तुम्हाला राग आला आणि तुम्ही सहज कानात वाजवून दिली. आणि  एक चापटच तर मारली म्हणून बाईने लगेच विसरून जायचं. अशी त्यांची मानसिकता असते. मात्र  ही हिंसा असते. मग ते हात उगारणं असु द्या किंवा इतर मारहाण. हिंसेची सुरुवात छोट्या गोष्टीपासुनच होते. म्हणून पहिल्या वेळीच नाही म्हणायला, प्रतिकार करायला शिकलं पाहिजे. यात पुरुषांच्या मनात Inferior आणि Superior ही भावना भिनलेली असते. म्हणजेच आपण Superior वरिष्ठ, वरचढ  आहोत. आणि आपली बायको दुय्यम, कनिष्ठ आहे. आणि हेच इथली पितृसत्ताक व्यवस्था रुजवत आलीय. 
                महिलांना दुय्यम वागणूक देऊन,  तिच्या स्वप्नांना चिरडून  बहुतेक वेळा तिला घरातच नव्हे तर, मित्रमंडळीत, नातेवाईकांसमोर अपमानित करून तिची चेष्टा  केल्याने  महिला या मानसिक तणावाखाली जगत असतात. त्यांच्या विचारांना वाट मोकळी करून देणं गरजेचं आहे. त्यांना खुलेपणाने व्यक्त होता आलं पाहिजे, आपली मतं मांडता आली पाहिजे. एक व्यक्ती म्हणून तिलाही समान महत्त्व घरात द्या. तिच्या निर्णयांचा आदर करा. तरच घरात आनंद, सुख आणि लोकशाही नांदेल. 
                   आपला समाज कितीही शिक्षित होउ द्या, मात्र जोपर्यंत तो मानवी मुल्ये अंगीकारत नाही. आणि समता, ममता व बंधुता हा त्रिगुणी मानवी डोस कृतीत उतरवुन विषमता, भेदभाव, हिंसा... यांसारख्या तुच्छ गुणांपासून फारकत घेत नाही , तोपर्यंत तो सुशिक्षित म्हणून गणला जाणार नाही. 

        मानवी हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या इथल्या  समाज व्यवस्थेत  येणार्‍या प्रत्येक दिनी वाढणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या घटना कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, शारिरीक - मानसिक मानहानी, हुंडाबळी,... यांसारख्या अनेक घटना  संविधानिक व मानवी मूल्यांना काळिमा फासणाऱ्या  आहेत. __ज्यांच्याविषयी बोललं जाणं, लिहिलं जाणं,  व वेगवेगळ्या माध्यमातून त्या उघडकीस आणणं गरजेचं आहे. 

"पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी तो माणुसकी विसरतो।
अन् स्वतःच्या अस्तित्वासाठी ती स्त्री म्हणून जगते।।

                              -  निकीता चंद्रकला दादाभाई 

Sperm Donor


          Sperm Donor ...



                     शुक्राणुंची देणगी ही एक अशी प्रक्रिया आहे, जी वीर्यदान करते. शुक्राणू म्हणजेच उत्सर्जनाच्या वेळी निघणारा द्रवपदार्थ. (Jelly Like Substance ) या शुक्राणुंच्या देणगीदारास ' शुक्राणुदाता किंवा स्पर्म डोनर म्हणून ओळखले जाते. 


                आजच्या काळात Sperm donor ची गरज किंवा भूमिका यासंबंधी विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, ज्या जोडप्याला आपल्यातील शारिरिक कमतरतेमुळे वंध्यत्वाला सामोरे जावे लागते. त्यांचं कुटुंब पूर्ण करण्यात व त्यांच्या जीवनात रंगीबेरंगी क्षणांची झालर लावण्यात स्पर्म डोनरची महत्त्वाची भूमिका  ठरते.  

            जागतिक आरोग्य  संघटनेच्या (WHO) च्या 2019 च्या Report नुसार जगातील 60 ते 80 दशलक्ष पुरुष ही Infertile म्हणजेच पुनरुत्पादनास अक्षम आहेत.  अशा लोकांच्या जीवनात सुख ,आनंद आणि नवचैतन्य पेरण्याचे काम हा स्पर्म डोनर करत असतो. मात्र  "National Infertility Association" यांच्या म्हणण्यानुसार यात Success Rate हा जवळपास 60 ते 80 % इतका असतो. 

              भारतातही अजूनही  स्पर्म डोनर ही संकल्पना फारशी Liberal स्वरुपात समोर आली नाही. तिला खुल्या विचारांनी स्वीकारणारा वर्ग आजही दिसत नाही. Metro Cities मध्ये देखील हीच परिस्थिती आहे. ग्रामीण भारतात तर एक मोठा भाग याबद्दल अनभिज्ञ आहे. विज्ञानाची ही प्रगती बहुतेकांना माहितही नाही. 

            यात मुख्य घटक असणार्‍या स्पर्म डोनरला  मोठ्या अडथळ्यांचा सामना करत हे काम करावे लागतं. त्याला मानसिक, भावनिक ,कायदेशीर समस्यांवर मात करून हे कार्य करावं लागतं. समाजाचा अपमान, घरच्यांची, समाजाची अस्वीकृती,  याविषयी असणारी नकारात्मकता...या सर्व बाबी ध्यानात घेऊन तो आपली तयारी दाखवत हे काम करत असतो. 

          Sperm Donate करण्यासाठी Donor ला काही Rules,  Regulations Follow करावे लागतात. डोनरच्या वयोमर्यादेचा निकष यासाठी 18 ते 39 च्या वयोगटाआतील ठरवलेला आहे. तसेच त्याला वेगवेगळ्या चाचण्यांतून जात स्वतःला डोनर म्हणून सक्षम असल्याचे सिद्ध कराव लागतं. स्वतःला Mentally & Physically State मध्ये Healthy & Fit असल्याचं Proof करावं लागतं.                                      
             यासाठी डोनरला Screening या प्रक्रियेतून जावं लागतं. 'स्क्रीनिंग' हा शब्द आता लाॅकडाउन मध्ये आपण खूप वेळा एकला असेल. किंवा ऐकतोय. तर याचा मुळ अर्थ असा की,  - "विशिष्ट कामासाठी एखादी व्यक्ती किंवा साधन हे योग्य आहे किंवा नाही याचे मुल्यमापन करण्यासाठी केलेली चाचणी. किंवा तपासणी म्हणजे स्क्रीनिंग होय."  

  • या स्क्रीनिंग टेस्टींगमध्ये त्याला शारिरिक परीक्षा द्यावी लागते .
  • आनुवंशिक चाचणी करावी लागते .
  • परिवाराच्या Medical History मध्ये कुणाला काही आजार वगैरे नाही याची चाचपणी करावी लागते. 
  • मानसशास्त्रीय मुल्यांकन करावं लागतं. 
  • डोनरचा वैयक्तिक आणि लैंगिक इतिहास जाणून घ्यावा लागतो. 
  • डोनरला कोणत्याही प्रकारचा लैंगिक आजार नाही याची खात्री करावी लागते. 
  • डोनरला सर्व प्रकारचे व्यसन वर्ज्य असतं. 
      
         एवढ्या सर्व चाचण्यांतून तरून जाउन तो स्पर्म डोनर म्हणून सक्षम ठरतो. यात त्याच्या शरीराची तंदुरुस्ती खूप महत्त्वाची ठरते. Regular Sperm Donor ला दर सहा महिन्यांनी शारिरिक तपासणी करावी लागते. यात मानसिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे. डोनरला मन प्रसन्न व आनंदी असण्यावर भर द्यावा लागतो. 

         भारतात तर डोनरकडून वेगवेगळ्या अपेक्षा ठेवण्यात येतात. चांगल्या परिवारातुन असला पाहिजे., गुण चांगले असावेत, उत्तम शरीरयष्टी, गोरा रंग , उंचपूर्ण, हुशार, चपळ, देखणा.... असं Multitasking / All rounder व्यक्तिमत्वाची मागणी ही आघाडीवर असते. त्यातच अजून विशेष म्हणजे इंग्रजी येत असलं तर उत्तमच. इंग्रजी अवगत असणार्‍या डोनरला अधिक पैसे मिळण्याची खात्री असते. किंवा ही Demand नेहमी केली जाते. भारतात स्पर्म डोनरला एका वेळी 5  ते 10 हजारांचा मोबदला मिळत असतो. 

             डोनरने दान केलेले शुक्राणु Sperm Bank त Store केले जातात. डोनरने दिलेला वीर्यनमुना निर्जंतुक कपमध्ये गोठवला जातो. ( Crayopreserve)  आणि कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत अलग ठेवण्यात येतो. त्यानंतर  पुन्हा HIV सारख्या संसर्गजन्य रोगांची तपासणी करण्यात येते.   जर सर्व चाचणी  निकाल Negative आले तर  वीर्यनमुना वितळवून त्याचे प्रमाण, गुणवत्ता आणि हालचाली यांचे पुन्हा मुल्यमापन करण्यात येते. केलेल्या शुक्राणुंची तपासणी एखाद्या महिलेच्या पुनरुत्पादक अवयवांमध्ये Intra - Uterine Insemination ( IUI)  केली जातात.  किंवा लॅबमध्ये In - Vitro Fertilization (IVF)  परिपक्व अंडी पुनरुत्पादनासाठी वापरली जातात. IUI आणि IVF या प्रक्रियेतून आईच्या अंडाशयातुन अंडी काढली जातात. आणि ते लॅब आधारित डिशमध्ये शुक्राणूंमध्ये मिसळले जातात. गर्भाशयाच्या बाहेरील हे गर्भाधान यास इन व्हिट्रो असे म्हणतात. वीर्यनमुना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी Depository Semen bank किंवा Crayobank ही सुविधा किंवा हा उपक्रम राबवला जातो. जे मानवी वीर्य खरेदी - संचयित  आणि विक्री करतात.
        एकविसाव्या शतकात चंगळवादी स्ंस्कृतीचं निर्माण झालेलं वलय, बदलते खाद्यपदार्थ जे निकस व निकृष्ट दर्जाचे असतात. बदलते पर्यावरण, हवामान, वाढतं प्रदुषण.....,  या काही कारणांमुळे मानवाच्या जननक्षमतेत दोष निर्माण होतात. व ते पुनरुत्पादनात अक्षम ठरतात. त्यांचं सांसारिक जीवन त्यांना मुलबाळाशिवाय अपूर्ण वाटु लागते. आपले स्वतःचे अपत्ये जन्मास घालावे. ही सर्वसामान्य पालकांची ईच्छा पूर्णत्वास आणण्यात स्पर्म डोनरची खरी प्रकर्षाने गरज जाणवते. यात आधुनिक विज्ञानाचा व शास्त्रज्ञांचाही खारीचा वाटा आहे. 

        ##"व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजेच पालकत्व "  एका जोडप्याला पालकत्व लाभणे म्हणजे जीवनाचं खरं सुख मिळणं होय. ***
                            
                               - निकीता चंद्रकला दादाभाई 


Thursday, 11 June 2020

Social Engineers

       
           "कबीर कहे कूच उद्दम कीजे। 
             आप खाये, और औरनको दीजे।। 

  -         उद्योग करा, आपण खा व दुसर्‍यांनाही द्या. स्वार्थ व परार्थ दोन्ही साधा. घर प्रथम सांभाळा. मात्र समाजकार्यालाही मदत करा. 

          समाजकार्य म्हणजे  शबनम बॅग लटकवलेले, कुर्ता - पायजमा घातलेले, साधे सुती कपडे परिधान करणारे कार्यकर्ते, अशी जी आपली पूर्वग्रहीत दृष्टी असते. ती आता बदलण्याची गरज आहे. समाजकार्यकर्त्याचे महत्त्वपूर्ण योगदान व उपयुक्तता पाहता समाजकार्य हे केवळ फावल्या वेळात आवड म्हणून किंवा सेवाभाव म्हणून करण्याचे कार्य नाही. 
           समाजविकासासाठी कार्य करणार्‍या विविध व्यावसायिकांपैकी एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक कार्य म्हणून समाजकार्य आता रूढ झालेले आहे. व्यावसायिक समाजकार्याच्या भारतात पाचशे पेक्षा अधिक मान्यताप्राप्त विद्यापीठ व शैक्षणिक संस्था आहेत. या संस्था विद्यार्थ्यांना समाजकार्याच्या दृष्टिने उच्च शिक्षित करण्याबरोबरच प्रशिक्षितही करतात. 
         "व्यावसायिक समाजकार्यकर्ते म्हणजे सामाजिक समस्यांचा शोध घेउन त्यांचे शास्त्रीय विश्लेषण करून त्यावर प्रभावी उपाययोजना करणारे प्रशिक्षित कार्यकर्ते होय." जे उच्च शिक्षित पदवीधर व मानव संसाधन असतात. ते त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत फक्त कागदरूपी डिग्री घेत नाही, तर ते जीवन जगण्याची कला येथे शिकतात. जीवनाला समृध्द करणार्‍या अनेकविध अनुभवांची शिदोरी त्यांच्यापाशी असते. समाजकार्याचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीचे वर्तन सामाजिक जीवन, सामाजिक सहसंबंध, समुदाय संघटन, याबाबतचे ना केवळ सैद्धांतिक ज्ञान, सोबतच प्रात्यक्षिक ज्ञान व अनुभव  अभ्यासातून प्राप्त झालेले असते. समाजकार्य अभ्यासाचा भाग असणार्‍या क्षेत्रकार्यातुन या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्वास एक नवीन आयाम प्राप्त झालेला असतो. हे प्रशिक्षण त्यांना समाजाचे विविध कंगोरे समजण्यात सहाय्यभूत ठरते. 
             व्यावसायिक समाजकार्यकर्त्याला जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी प्राप्त झालेली असते. जात, धर्म, लिंग, प्रतिष्ठा यापलिकडे जाउन व्यक्तीला माणुस म्हणून गरजेनुसार मदत करण्याची प्रवृत्ती हे समाजकार्य त्याच्यात बिंबवत असतं. सामाजिक न्यायासाठी गरीब, दलित, वंचित व गरजु व्यक्तींच्या बाजुने कार्य करण्याचे धाडस व विपरीत परिस्थितीशी जुळवून आव्हानांना तोंड देण्याची क्षमता या प्रशिक्षणातून प्राप्त होते. आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या मग ती मानसिक असो वा सामाजिक तिला सामोरं जाण्याचं धाडस आणि कौशल्य आपण इथुन शिकतो. 
         वैश्विक मानवतेच्या कल्याणासाठी हे सामाजिक कार्यकर्ते झटत असतात. लोकांच्या मुलभूत आणि जटील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. व्यावसायिक समाजकार्य हे व्यक्ती - कुटुंब - गट - संघटना - समुदाय  यांचे कल्याण साधण्यासाठी उद्देशपूर्ण प्रयत्न करते. "मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे ही या समाजकार्याची आधारशिला आहे." असुरक्षित, अत्याचारीत, मागासवर्गीय, वंचिंत, शोषित, गरजु, पिडीत आर्थिक व सामाजिक न्यायापासून वंचित असणारे समाजकार्याचा केंद्रबिंदू आहे. मानवी हितसंबंध - सामाजिक संबंध जोपासून व्यक्ती - व्यक्तींमधील संबंध मजबूत करण्याचे काम हे सामाजिक कार्यकर्ते करीत असतात. मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी ते नेहमी उभे ठाकलेले असतात. ज्या लोकांचे एकले जात नाही, त्यांच्यासाठी ते आवाज बनतात. लोकांना सामाजिक न्यायासाठी लढण्यात, सामाजिक अन्यायाला आव्हान देण्यासाठी व जीवन आणि समुदाय सुधारण्यात ते मदतगार म्हणून साबित होतात. 
        व्यक्ती - गटाला प्रभावीपणे समायोजन करता यावे म्हणून व्यक्ती - समुह व  समुदाय यांच्यासोबत कार्य करण्यासाठी लागणारे कौशल्य या समाज कार्यकर्त्यांनी मिळवलेले असते. समाजाविषयी संवेदनशीलता, जीवनाविषयी सकारात्मकता, समस्याग्रस्त व्यक्तीविषयी करुणा, समस्या सोडवण्याची क्षमता, समाजकार्यासाठी वचनबद्धता, आणि मानवी सहसंबंध बळकट करण्यासाठीचे कौशल्य असणारी प्रशिक्षित व्यक्ती म्हणजे हे व्यावसायिक समाजकार्यकर्ते होय.  
         आजच्या आधुनिक परिस्थितीत व्यक्तींचा वाढता मानसिक तणाव, कुटुंब व समूहातील दुभंगलेले संबंध, चंगळवादाने घातलेले थैमान, पर्यावरणातील असमतोल, समाजातील  संघर्ष बघता प्रशिक्षित समाजकार्यकर्ते 'जगाच्या नवनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात. 
        रूढार्थाने या क्षेत्रात ग्लॅमर नाही, कदाचित यामुळेच समाजातील तळाच्या माणसापर्यंत पोहचून त्याला मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देण्यात समाजकार्यकर्त्याची निरपेक्ष भूमिका असते. राज्य व केंद्र शासनाचा समाजकल्याण विभाग ( प्रशासन), महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, शाळा, दवाखाने, कारागृह, अनाथालय, वृद्धाश्रम, कुटुंब कल्याण विभाग.... असे स्त्रीशिक्षणापासुन ते आरोग्यापर्यंत व राजकारणापासून ते सामाजिक, आर्थिक धोरणांपर्यंत ...जीवनाच्या अशा सर्वच क्षेत्रांत समाजकार्य विस्तारलेलं आहे. 
              व्यावसायिक समाजकार्य क्षेत्रात अधिक व्यापकतेने, सखोलतेने, व प्रगल्भतेने प्रत्यक्ष सेवा कार्य करण्याचा दृष्टिकोन विकसित होतो.  या क्षेत्रात तुम्ही पदवी संपादनाबरोबरच, एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून विकसित झालेले असतात. याठिकाणी तुमचा चिकित्सक दृष्टिकोन तयार होतो. 'समानानुभुती ' ("दुसर्‍याच्या भुमिकेत शिरुन" त्यांची समस्या आपली म्हणून सोडवण्यासाठी उपयुक्त) हे तत्त्व तुम्ही येथे शिकता. सर्जनशील विचारसरणी, निर्णय क्षमता, समस्या निराकरण, चिकित्सक वृत्ती, तर्कशुध्द विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन  ....असे अनेकविध गुणकौशल्यांचा विकास साधत ते टोकदार बनवण्याचे काम हे क्षेत्र करत असते. 
              जिथे शासन - प्रशासन पोहचण्यास असफल ठरते, तिथपर्यंत पोहचून समाज बदल घडवण्याचे, व त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम समाज कार्यकर्ते करीत असतात. समाजकार्यकर्ते समाजाचे अस्तित्व टिकविण्यासाठी उपयुक्त व कार्यक्षम व्यावसायिक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. समाजाची मजबूत बांधणी करण्यात व सामाजिकस्वास्थ्य जोपासणारे हे सामाजिक अभियंते आहेत. ज्यांची काळानुरूप या बदलत्या समाजव्यवस्थेत व नातेसंबंधात अधिक तीव्रतेने गरज आहे. 

                              निकीता चंद्रकला दादाभाई 

Friday, 5 June 2020

लज्जा

  •                    तसलिमा नासरिन यांच्या "लज्जा" या  कादंबरीचा थोडक्यात गोषवारा.  :                        


                लाॅकडाउन काळात आता घरीच असताना सहज आमच्या मास्तरांकडून मला एक कादंबरी वाचायला मिळाली. 'लज्जा ' तसलिमा नासरिन या बांग्लादेशीय लेखिकेची ही कादंबरी बहुचर्चित व धर्माचा डंका वाजवणाऱ्यांसाठी वादविवादात्मक ठरली. ही कादंबरी धार्मिक कट्टरवाद व माणसानं माणसाला दिलेली अमानुष वागणूक या दोन्हींवर कोरडे ओढते. अत्यंत प्रखर वास्तववादावर आधारित ही कादंबरी धर्माचं राजकारण करणाऱ्या धर्ममार्तंडांची रक्तपिपासुवृत्ती आणि आधुनिक काळातील हिंसाचाराचं प्रत्ययकारी चित्रण करते. 
             धार्मिक मूलतत्ववादाचा रोग हा केवळ भारत - पाक मधील हिंदू - मुस्लीमांत नसून पूर्वीचा अखंड भारतातील हिस्सा असलेल्या बांग्लामध्येही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. समाजामध्ये धर्माचं प्रस्थ इतकं वाढत चाललय की तिसर्‍या जगामधल्या अर्धपोटी दुर्बल आणि पीडित लोकांना त्याच्या प्रभावाखालून बाहेर येणं फार कठीण झालं आहे. 
        1947 सालापासून ते 1971 सालापर्यंत बंगाली लोकांनी एकामागोमाग एक रक्तपात पाहिले. या सर्वांचं एकत्रित पर्यवसान 1971 सालच्या स्वातंत्र्यलढ्यात झालं. तीस लाख बंगाली आयुष्यांची आहुती पडल्यानंतर बांग्लावासीयांना पाकपासून स्वातंत्र्यप्राप्ती  मिळाली. 'माणसाची राष्ट्रीय भावना ही त्याच्या धर्मावर अवलंबून नसते' हे यावरून सिध्द झालं. 
              6 डिसेंबर 1992 रोजी भारतात काही धार्मिक मुलतत्ववाद्यांनी बाबरी मशिदीचा विनाश केला.  भारताच्या धार्मिक इतिहासातील सर्वांत विवादास्पद राहिलेल्या या घटनेचा साऱ्या जगानं  निषेध केला. पण या कृत्याचे पडसाद शेजारी राष्ट्र असलेल्या बांग्लादेशात मात्र फार तीव्रतेनं उमटले. या कृत्यामुळे भारतातच नव्हे तर, पूर्वी भारतीय उपखंडाचाच हिस्सा असलेल्या पाकिस्तान व बांग्लादेशात याच्या प्रतिक्रिया एका फार मोठ्या धर्मद्वेषाच्या रुपात उठल्यावाचून राहिल्या नाहीत. अखंड भारतवर्षाच्या भूतपूर्व हिस्सा राहिलेली थायलंड, मलेशिया, बलुचिस्तान, इंडोनेशिया, तिबेट, अफगाण, जावा, सुमात्रा, नेपाल, भूतान, अशा तमाम भारताच्या आसपासच्या  राष्ट्रांत हिंदू समुदाय वास्तव्यास आहे. भारतात होणार्‍या धार्मिक घटनांचा या नजीकच्या राष्ट्रांवर तीव्र - सौम्य  परिणाम झाल्यावाचून राहत नाही. 
          1992 साली भारतात मुस्लिमांचं धार्मिक स्थळ ( बाबरी मशीद) जमीनदोस्त केलं, म्हणून याच पद्धतीने बांग्लामध्ये देखील हिंदुंची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्यांची घरे जाळण्यात आली. भाजपच्या प्रेरणेमुळे कारसेवकांनी बाबरी मशीद फोडली; पण त्यांचे हे लक्षात आले नाही की, या धर्मांध भावनेच्या भरात केलेल्या कृत्याचे पडसाद फक्त भारताच्या चौकटीपुरताच कसे मर्यादित राहतील. खुद्द भारतातच या प्रकारानंतर जागोजागी जातीय दंगली उसळल्या. आपल्या जातीच्या व धर्माच्या हिताचे रक्षण करु पाहणाऱ्यांना, व अशा जातीय दंगली घडवून आणणार्‍यांना आपल्या उर्वरित बांधवांबद्दल कदाचित तमा नसते. भारतात भाजपला जे स्थान आहे, तेच बांग्लात जमात - ए - इस्लामला आहे. दोन्ही गटांचा हेतू एकच आहे ' मुलतत्ववादाची स्थापना' 
         1992 साली धर्माच्या नावाखाली ज्या दंगली उसळल्या त्या अत्यंत अमानुष व सामाजिक - धार्मिक द्वेष निर्माण करणार्‍या ठरल्या. 'दंगल ' हा काना - मात्रा नसलेला फक्त तीन अक्षरी शब्द, मात्र बघा समाजात तो केवढी दहशत निर्माण करतो. या शब्दाचा अर्थ एका जातीच्या लोकांनी दुसऱ्या जातीचा बळी घेणे असा होतो की, एका जातीने दुसर्‍या जातीचं पावित्र्य आणि  एकान्त यांचा अतीव निर्घृणपणे भंग करणे असा होतो. खरेतर दंगलींना कोणताही रंग -रूप -आकार नसतो. असतो फक्त द्वेष, तिरस्कार, मत्सर, हिंसक भावना एका गटाची दुसऱ्या गटाविरुध्द. मात्र, त्यांच्या कर्माची फळं निष्पाप जिवांना भोगावी लागतात. 1992 च्या दंगलीत बांग्लामध्ये अल्पसंख्याक हिंदू बळी पडले तर 2002 च्या गुजरात दंगलीत अल्पसंख्य मुस्लिम. कारण काय तर धर्मसत्ता, आपल्या धर्माचे वर्चस्व प्रस्थापित करणे. मोठमोठाली भव्यदिव्य मंदिरं- मस्जिदी उभारणे.  या धर्माचे प्रस्थ माजवणाऱ्या काही अंशी लोकांमुळे राष्ट्रीयत्वाची - ऐक्य - एकात्मतेची भावना लोप पावते. लोकशाही परंपरेची वाताहत होऊन, गटागटांत सामाजिक - धार्मिक अराजकता माजते. 
          बलवानांनी शक्तिहीनांचं, श्रीमंतांनी गरिबांचं शोषण करायचं हा पायंडाच या समाजव्यवस्थेत प्रस्थापित झाला आहे. तुम्ही जर श्रीमंत असाल, तर मग तुम्ही हिंदू आहात की मुसलमान, याला फारसं महत्त्व नाही. तुमचा छळ ठरलेला असेल. यापुढे तार्किक विचारसरणी व मानवी सद्सदविवेकबुध्दी ही गहाण पडली आहे. दुर्दैवाने कोणत्याही भांडवलशाही समाजव्यवस्थेचा हा नियम आहे. या सर्व घटना "बळी तो कान पिळी" या स्वरुपाच्या आहेत. तत्त्ववेत्त्या मार्क्सचं वाक्य येथे समर्पकरीत्या लागु पडते. " धर्म ही अफूची गोळी आहे." जेवढा नशा अफुचा होत नसेल,  त्याहून कैकपटीने हा धर्माचा नशा काम करतो. आणि त्यापुढे आपला आदर्शवाद हा फोल ठरू लागतो. 
                जगाचा इतिहास सांगतो की, अल्पसंख्य व गरिबांचे नेहमीच शोषण व छळ होत आला आहे. मग ते जगाच्या कोणत्याही भागातील असो. कधी धर्माच्या आधारावर तर कधी Minority - Majority च्या तत्वावर, कमी - अधिक प्रमाणात का असेना पण हा वर्ग अन्यायाला बळी पडतोच. सत्ताधारी व उच्च वर्ग त्यांना पिचून काढतो. मग ते जर्मन मधील ज्यु असो,  अमेरिकेतील कृष्णवर्णीय असो, अथवा भारत - बांग्ला - पाक मधील हिंदू - मुस्लिम अल्पसंख्याक वर्ग असो  
       द्विराष्ट्रीय सिध्दान्ताचे ( Two Nation Theory)  प्रत्यक्षात आचरण करणे व्यवहारात किती अशक्य आहे हे जीनांना ठाऊक होते. जेव्हा माउंटबॅटन पंजाब आणि बंगालचे तुकडे करण्याविषयी बोलत होते, तेव्हा ते स्वतःच म्हणाले होते, - 
   " माणूस हिंदू किंवा मुसलमान असण्याआधी तो पंजाबी किंवा बंगाली असतो. त्यांची संस्कृती खाद्यपदार्थ, इतिहास, भाषा आणि आर्थिक पार्श्वभूमी एक असते. तुमच्या या कृत्यामुळे नाहक रक्तपातच होईल."  राष्ट्राच्या उभारणीत दोन राष्ट्र किंवा दोन जातींचा प्रश्न  जीनांनी  दुर्लक्षित केला होता. त्यांनी म्हटलं होतं, आजपासून यापुढं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध इतर कोणत्याही लोकांना त्यांच्या धर्माने नव्हे तर पाकिस्तानी म्हणून ओळखले जाईल. 
       धर्म हा पीडितांचा आणि गांजलेल्यांचा सुस्कारा आहे, निष्ठुर जगाचं ह्रदय आहे. भारत - पाक फाळणी धर्माच्या आधारावर झाली. मात्र बांग्ला - पाक फाळणी Majority च्या बळावर झाली. यावरून आपल्या लक्षात येतं की, मानवी जीवनात धर्म अंतिम नाही. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ - " सर्व धर्मांबाबत एक प्रकारची समान सहिष्णुवृत्ती. धर्मनिरपेक्षतेमध्ये भेदभावाला जागाच नसते. याचा अर्थ हा, की धर्म आणि राजकारण यांची फारकत." मात्र मुलतत्ववादी यात जाणूनबुजून धर्म आणि राजकारणाचा मिलाप करून संविधानिक मुल्यांचा भंग करतात. आणि सध्याच्या परिस्थितीत तर राजकीय अस्त्र म्हणून धर्माला चपखलपणे वापरले जातेय. 
           बांग्लादेश राष्ट्राची उभारणी चार मुख्य तत्त्वांवर झाली होती: राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि समाजवाद. देश स्वातंत्र्यप्राप्तीसाठी फार काळ झगडला होता. या चळवळीची सुरुवात 1952 सालच्या भाषिक चळवळीपासुन झाली. त्या प्रक्रियेत जातीयवाद आणि धर्मांधतेसारख्या दुष्प्रवृत्तींची हार झाली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर प्रतिगामी शक्ती सत्तेवर आल्या व त्यांनी ताठर मूलतत्ववादाला पुन्हा उजाळा दिला. परिणामी जातीयवाद आणि पराकोटीचं धर्मवेड हे दोन्ही हाताबाहेर गेलं. आणि तेथे धार्मिक भेदाभेदाला विशेष चालना मिळाली. ज्याचा परिणाम 1992 च्या दंगलीत चांगलाच दृष्टीस पडतो. संख्येने कमी असणार्‍या हिंदूंची घरं जाळली गेली. दुकानांची तोडफोड झाली. मंदिरांची पाडझाड करण्यात आली. महिलांवर बलात्कार करण्यात आले. या नरसंहाराने तेथील हिंदू अल्पसंख्याकांना मोठ्या प्रमाणात भारतात निर्वासित म्हणून स्थलांतर करावे लागले. जेव्हा आपल्याच राष्ट्रांत आपल्या जीवावर उठणारी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी आपली राष्ट्रीय भावना मोडून पडलेली असते. आपली राष्ट्रभक्ती गळून पडते. आणि आपल्या मातृभुमीबद्दलचे प्रेम आटून जाते. या सर्व परिस्थितीला, आपल्या मानसिकतेला कारणीभूत ठरते आजुबाजुची जुलमी व्यवस्था, जातिधर्माचा प्रपोगंडा आणि अमानुषपणे होणारे अत्याचार. 
          मात्र या ठिकाणी एक मोठा प्रश्न अनुत्तरित राहतो,  तो म्हणजेच " जर तुम्ही स्वतः च्या राष्ट्रांत, स्वतःच्या घरात सुरक्षित राहू शकत नसाल, तर जगात इतरत्र कुठे तुम्हाला सुरक्षितता जाणवेल.?"
       

                                निकीता चंद्रकला दादाभाई 

Wednesday, 3 June 2020

अवलिया आईन्स्टाईन

                      विज्ञान जगताचा एक महत्त्वाचा शिलेदार, आपल्या बुध्दीसामर्थ्याच्या जोरावर विसाव्या शतकात आपल्या जादूचा अमिट असा ठसा उमटविणारा 'आईन्स्टाईन' विज्ञान क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने त्याला जाणावं, जवळून समजून घ्यावं, आपण त्याला खोलात वाचत गेलो की, नकळतपणे तो आपला दोस्त बनुन जातो. चला तर मग एक लेख या विनोदी अल्बर्ट साठी, त्याचा रोमांचक जीवनप्रवास अनुभवण्यासाठी, त्याच्याशी मैत्री पक्की करण्यासाठी. ***


         ... प्रत्येक माणसाच्या अंतरंगात विश्वाविषयीचे कुतुहल हे उपजतच असते. विश्वाची निर्मिती कशी झाली? कोणी केली? पहिला जीव कोणता असेल? जसं की आपण नेहमी एक प्रश्न चर्चितो ना, तो म्हणजे "अंडे आधी की कोंबडी आधी?" तसंच ही जैविक उत्क्रांती कशी झाली असेल? आपल्या सुर्यमालेचं परिभ्रमण कसे होते? गुरुत्वाकर्षण शक्ती कसे काम करते?, असे सारे प्रश्न आपल्या डोक्यात काही वेळा पिंगा घालत असतात. 

             विश्व प्रसरण पावत आहे, तारे आपल्यापासून अब्जावधी प्रकाशवर्षे दूर आहेत, अवकाशात कृष्णविवरे आहेत,.... .इत्यादी गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात. विज्ञानाच्या या अनेक घटकांना सर्वसमावेशक सिध्दांताच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करीत असतात. मुळात बालकांचे कुतुहल आणि प्रतिभावंतांची बुद्धिमत्ता ही शास्त्रज्ञांत उपजतच असते. 

               अल्बर्ट हार्मन आईनस्टाईन हे साहेब तर यात आघाडीवर होते. आईन्स्टाईन त्याच्या सर्व चाहत्यांमध्ये, त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये Genius Man म्हणून प्रचलित आहे. म्हणूनच तर १४ मार्च हा त्याचा जन्मदिन सर्वत्र Genius Day म्हणून साजरा करण्यात येतो. 

          विश्वाची उत्पत्ती समजून घेण्यासाठी व हे अनाकलनीय गुढ रहस्य जाणून घेण्यासाठी गणित महत्त्वाची भूमिका पार पाडतो. गणिताला भौतिकशास्त्राचा पथदर्शी ( Math is a tour of Physics) असे देखील संबोधण्यात येते. निसर्गाला गणितीय संरचनाने (Mathematical Structure)  समजून घेता येतं. हे एक वैश्विक सत्य आहे. 

            "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" ही उक्ती अल्बर्टच्या बाबतीत अगदी अचूक काम करुन गेली. गणितात Higher Math म्हणून ओळखले जाणारे Differentiation & Integration याची अल्बर्ट लहानपणापासूनच मोठमोठाली समीकरणं एखाद्या तज्ञाप्रमाणे सोडवत असे.  वय वर्ष १२ असतानाच अल्बर्टने पायथागोरस थेरम मधील स्वतः  ची स्वतंत्र Original Proof शोधून काढली. आपले  विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन चे (STEM) विद्यार्थी डिग्री पूर्ण होऊन जाते, तरी पायथागोरस आपल्या डोक्यात पूर्णपणे शिरलेला नसतो. रट्टा मारून पुढे जाण्याची प्रवृत्ती आपली निर्माण झाली आहे. आपलं एवढंच पाठ असतं  The right angle triangle equation =  a2 + b2 = c2 आणि पायथागोरस प्रमेयाचा उपयोग हा Construction & Navigation साठी होतो. बस्स झालं शिकून आपलं. 

              अल्बर्टचं शिक्षण फेडरल पॉलिटेक्निक स्कूल झुरीच येथे झाले. तेथे त्याने १९०० साली टिचींग डिप्लोमा पूर्ण केला. आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ झुरीच मध्ये Ph. D पूर्ण केली. अल्बर्टचे वडील हार्मन आईनस्टाईन हे पेशाने एक इंजिनिअर होते. आणि त्याचे काका जॅकाॅब सोबत त्यांचा एक उद्योगही होता. अल्बर्टचे वडील त्याला म्हणत की तु, भौतिकशास्त्रात आणि गणितात तरबेज आहे, म्हणून तु इंजीनिअरिंग करावं, पण अल्बर्टला ते मान्य नव्हतं,  इंजिनिअर बनुन रोज रोज यंत्रासारखं त्याला तेच ते काम नको होतं.  त्याला प्राध्यापक व्हायचं होतं. ब्रह्मांडातील नवीन रहस्यांचा शोध घ्यायचा होता. त्याच्या शोधासाठी त्याला या पेशात वेळ राखून ठेवता आला असता. शिवाय शिक्षणाच्या प्रक्रियेशी नातं जुळवून ठेवत तो सतत शिकत राहिला असता.

              जसं लोहाला बघून चुंबक त्याच्याकडे आकर्षिलं जातं तसंच एक जिनियस हा जीनियस कडेच धाव घेतो. आणि हा नियम अल्बर्टच्या आयुष्यात बिनचूक लागु पडला. अल्बर्ट हा स्वतःला गणितात खूप पारंगत समजत असे. त्याला वाटे की गणितात माझा हातखंडा कुणी घेऊ शकत नाही. पण एका प्रसंगाने त्याचं हे कॅलक्युलेशन खोटं साबित केलं. १९०५ साली झुरीच युनिव्हर्सिटीत Ph.D करत असताना त्याला तेथील मास्तरांनी एक प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर अल्बर्टला देता आले नाही. तेच उत्तर मिलेवा मारिक या विदुषीने दिले. तिचं ते उत्तर ऐकून व तिच्या ज्ञानाने अल्बर्ट विलक्षण प्रभावी झाला. व पुढे थोड्याच दिवसात मिलेवा सोबत त्याची लग्नगाठ पडली. 

                    अल्बर्ट हा पुढे प्रिन्सटन युनिव्हर्सिटीत प्राध्यापक म्हणून कार्यरत झाला. तो खूप प्रसिद्ध व विद्वान प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होता. तो वर्गात शिकवताना खूप गमतीजमतीने शिकवत असे. आपल्या वेगवेगळ्या प्रयोगांनी विद्यार्थ्यांना खूप हसवी. आपल्या विनोदी आणि चमकदार शैली यांच्या मनोहर मिश्रणातून तो विश्वरचना आणि संबंधित भौतिकशास्त्राचे गहनगुढतेचे प्रभावी विश्लेषण करत असे. त्याचं व्यक्तिमत्व हे एखाद्या विदुषकासारखं भासे. त्याचे केस हे नेहमी वरती विस्कटलेले असत. आणि त्याची देहबोली ही खूप मनोरंजक होती. आईन्स्टाईनची अध्यापन पध्दत ही वैश्विक सत्य व कल्पनेवर आधारलेली असे. तो आपल्या मेंदुला त्याची प्रयोगशाळा समजत असे. व आपल्या फाउंटन पेनला त्या प्रयोगशाळेतील उपकरण. अल्बर्टचं आपणा सर्वांना परिचित असलेले एक प्रसिद्ध वाक्य आहे, "ज्ञानाला परिसीमा आहेत, मात्र त्या कल्पनेला नाही." ( Knowledge is limited but imagination it's not limited) म्हणून कल्पना करणं कधी थांबवू नका. असे तो नेहमी म्हणत असे. त्याच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना, तो कल्पनेच्या जगात त्यांची सफर घडवून आणत असे. विद्यार्थ्यांना डोळे बंद करण्यास सांगुन, तो विश्वाच्या प्रमेय व समीकरणांविषयी त्यांना कल्पना करण्यास सांगतअसे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीस व उत्सुकतेस विशेष वाव मिळत असे. त्यांच्या मनात विश्व, खगोल, ग्रह - तारे यांविषयी आपसुकच कुतूहल निर्माण होत असे. 

        हुशार व्यक्तींचे हस्ताक्षर हे खूप खराब असते, असा एक सर्वसामान्य समज आहे. आणि कदाचित तो बरोबरही असेल. कारण त्यांची विचारप्रक्रिया ही जलदगत्या काम करत असते. अल्बर्ट यात पिछाडीवर कसा बरं राहील. अल्बर्टला अशी कोणतीही गोष्ट लक्षात राहत नसे, जी पुस्तकात शोधल्यावर दोन मिनिटांत सापडेल. गंमत म्हणजे त्याला स्वतः चा टेलिफोन नंबर देखील लक्षात राहत नसे. तर इतरांचे वाढदिवस, महत्त्वाचे सणप्रसंग दुरापास्तच समजा. 

           आईन्स्टाईन आणि मिलेवा दोघंही जन्मजात उच्च प्रतिभा आणि बुध्दीवैभव घेऊन आले होते. आईन्स्टाईनचे संशोधन पेपर तयार करण्यात मिलेवाची त्याला चांगलीच मदत होई. यावर मिलेवाचं मत होतं की, संशोधन पेपर प्रकाशनात तिचंही नाव सोबत असावं, मात्र आईन्स्टाईनने ते कधीही मान्य केलं नाही. आईन्स्टाईनने त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे शोध लावले. 

- Photoelectric effect

- Brownion Motion

- General Theory of relativity 

- Special Theory of relativity 

- E = Mc2 

- Einstein field equations

- Bose Einstein Statistics 

- Bose Einstein Condensate 

- Gravitational wave

- Cosmological Constant 

- Unified field theory 

- EPR Paradox 

- Ensemble Interpretation 

              आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धान्त (Photoelectric effect)  व त्याच्या भौतिकशास्त्रातील निरपेक्ष सेवेबद्दल त्याला 1921 साली नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला. त्याने शोध लावलेल्या E = Mc2 या समीकरणाने अणुऊर्जा आणि अणुबॉम्बच्या विकासाचे पूर्वचित्रण केले. एखाद्या शरीराची उर्जा (E) त्या भागातील द्रव्यमानच्या (M)  बरोबरीने प्रकाश चौरस(C2)  च्या वेळेपेक्षा जास्त असते. या समीकरणाने असे सूचित केले की, पदार्थाचे छोटे कण प्रचंड प्रमाणात उर्जेमध्ये रूपांतरित होऊ शकतात. या आधारावर अणुऊर्जा निर्मितीची कवाडे खुली झाली. त्याच वेळी दुसऱ्या महायुद्धाचा अगदी धामधुमीचा काळ होता. हिटलरची हुकूमशाही सत्तापटलावर विराजमान झालेली होती. आईन्स्टाईन हा ज्यु परिवारात वाढलेला होता. आणि ज्यु लोकांचा जर्मनीत यथेच्छ शिरच्छेद करण्यात येत होते. साऱ्या ज्यु लोकांना हिटलरने देश सोडून जाण्यास ठणकावून सांगितले. त्यात आईन्स्टाईनलाही जर्मनी सोडणे भाग होतं. पण त्याला हा देश सोडणं रुचत नव्हते, शेवटी आपल्या पत्नीच्या आग्रहाखातर त्याने जर्मन नागरिकत्वाचा त्याग करून वैश्विक नागरिकतेचा (World Citizenship)  स्वीकार केला. व नंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. 

         आईन्स्टाईन हा मानवतावादी होता. अणुबॉम्बच्या राजकारणाशी असलेला त्याचा संबंध सुपरिचित आहे. प्रेसिडेंट फ्रॅन्कलिन रुझवेल्टला लिहिलेल्या प्रसिद्ध पत्रावर त्याची सही होती. त्या पत्रानंच अमेरिकेला अणुबॉम्बच्या कल्पनेचा पाठपुरावा करायला उद्युक्त केलं. मात्र प्रत्यक्षात आईन्स्टाईन अणुबॉम्ब बनवण्याच्या विरोधात होता. होणार्‍या नरसंहाराची त्याला कल्पना होती. मात्र नकळतपणे तो या राजकारणाच्या परिपेचात ओढला गेला. 

         पहिल्या महायुद्धाच्या काळात बर्लिनला प्राध्यापक असताना, आईनस्टाईननं राजकारणातील पहिली कृती केली. मानवी जीवसंहार पाहवेनासा होऊन तो युध्दविरोधी निदर्शनात सामील झाला. त्यानं केलेला कायदेभंगाचा पुरस्कार आणि सैन्यात भरती होणं नाकारण्यासाठी लोकांना उघडपणे दिलेलं प्रोत्साहन यांमुळे तो सहकाऱ्यांत दुरावला गेला. 

            आईन्स्टाईनचं दुसरं थोर ध्येय होतं.  ज्यु राष्ट्राची  स्थापना.  जन्मानं ज्यु असला तरी त्याने बायबलमधील ईश्वराची संकल्पना नाकारली होती. तथापि, पहिल्या महायुद्धापूर्वी आणि नंतरही, ज्यु विरोधी तापमान जसजसं तापू लागलं तसतसा तो समाजाशी एकसंध जोडला गेला. आईन्स्टाईन हा निर्भीड होता. त्याच्या सिध्दांतांवर हल्ले झाले. तरी लोकांत अप्रिय होण्याच्या भीतीने त्यानं स्वतःच मन उघड करणं थांबवलं नव्हतं. शांततेसाठी त्याने आयुष्यभर प्रयत्न केले.  ज्यु राष्ट्रवादाला त्यानं दिलेल्या बोलक्या पाठिंब्याची १९५२ मध्ये सुयोग्य दखल घेतली जाऊन, त्याला ईस्त्रायलचं राष्ट्रपतीपद देऊ करण्यात आलं. पण आपण राजकारणात फारच भाबडे आहोत असं म्हणत त्याने ते नाकारलं.  खरेतर वास्तवात आईन्स्टाईनचं जीवन समीकरणं आणि राजकारणात विभागलेलं होतं. मग यावर आईन्स्टाईन म्हणत असे,  "मला समीकरणं जास्त महत्त्वाची वाटतात, कारण राजकारण आजच्या साठी असतं, मात्र समीकरणं ही शाश्वत काळासाठीची गोष्ट आहे."

               शास्त्र जगतातील आईन्स्टाईन हा कदाचित पहिलाच शास्त्रज्ञ म्हणावा, ज्याने राजकारणात सहभाग नोंदवला असेल. राजकीय - सामाजिक जीवनात त्याची स्वतःची स्वतंत्र तत्त्वप्रणाली होती. आणि त्यावर तो ठाम होता. आयुष्यभर फक्त प्रयोग करत न बसता, परिवार, समाज, राष्ट्र, यांत सहभागी होत, वैयक्तिक आयुष्यही तो छान जगला. आईन्स्टाईनला व्हायोलिन वादनाची विशेष आवड होती. कधी कधी तो खूप मिश्कील हावभाव चेहर्‍यावर आणत असे. व आपल्या प्रियजनांमध्ये नेहमी हास्याचे फवारे उडवत असे.

          आईन्स्टाईनचा मृत्यू 18 एप्रिल 1955 साली प्रिन्सटन न्यु जर्सीत (USA)  झाला. 76 वर्षाचं रंगतदार आयुष्य जगून हा विश्वातील चमकदार तारा अनंतात विलीन झाला. आईनस्टाईनच्या मृत्युनंतर त्याच्या परिवाराच्या संमतीविना त्याचा मेंदू डॉ. थॉमस स्टाॅल्त्झ हार्वे यांनी न्युरोसायन्सच्या भविष्यातील अभ्यासासाठी काढून घेण्यात आला. त्याचा मेंदू आता प्रिन्सटन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर अमेरिकेत ठेवण्यात आला आहे. आईन्स्टाईन हा बर्‍याच कादंबर्‍या, नाटकं, सिनेमा, आणि संगीतातील कामांचा विषय व प्रेरणास्थान राहिला आहे. एक यशस्वी शास्त्रज्ञ व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्याची कारकीर्द दैदिप्यमान ठरली. 


                         निकीता चंद्रकला दादाभाई

Tuesday, 2 June 2020

Social Change

           Social Change 

    I alone cannot change society for the better. But I can radically transform my own Consciousness, overturning the conditioning that limits my potential. We can all do this,  one by one. Over time we can change ourselves to the degree that society changes from the inside out. Giving birth to a new way of being. Manifesting our birthright of living in a peaceful & abundant world. Have no fear. Trust yourself. Live your full potential..... 

Monday, 1 June 2020

नाळ

                       नाळ 


       नाळ, गर्भातली ती नाळ, जी गर्भाच्या सुरुवातीपासूनच मायलेकराचं नात घट्ट करते, त्याला वृद्धिंगत करते, या नात्याला भक्कमपणे जोडून ठेवते. आईचं आणि मुलांचं नातं हे त्या गर्भात जुळलेल्या नाळेचं असतं, जी नाळ  गर्भातल्या बाळाचं भरणपोषण करते, त्याला वाढवते, एका नवजात शिशूचा आकार, रंग-रुप-चेहरा त्याला बहाल करते,आणि गर्भाबाहेर पडल्यावर ती नाळ होते "आई". 
     आई बाळाला भरवते,  वाढवते, त्याचं शी-शु काढते, त्याच्या प्रत्येक लहानलहान गोष्टींची काळजी घेते, बाळ जसजसं मोठं होतं, त्याप्रमाणे आई त्याला समजून घेते, कधी ती त्याप्रमाणे लहान होऊन वागते, तर कधी समजावून सांगत मोठं होत, ती आपल्या मुलांच्या काही चुका टाळून दुर्लक्ष करते, तर कधी खबरदारीने रागवून त्याला सजग करते, 
     आई हे फक्त एक नाव नसून, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असते, प्रत्येकाच्या भावना समजून घेणारं ते प्रवेशद्वार असतं, जेव्हा ती आपल्यात असते, तेव्हा तिची किंमत कळत नाही, तिच्या असण्याचं महत्त्व सहसा कुणाला जाणवत नाही... पण जेव्हा आपण घरातून बाहेर गेलो, अथवा ती जर घरात नसली तेव्हा मात्र तिची उणीव चटकन जाणवते. 
     घराला एकसंध जोडून ठेवण्याचं काम आई करते, कोणत्याही विपरीत परिस्थितीत ठामपणे उभं राहून त्याला सामोरं आई जाते, आई ही आपल्याला त्या गर्भातल्या नाळेतूनच मिळालेली जन्माची शिदोरी असते, जी सरतही नाही आणि उरतही नाही. 
      आईसाठी आपली मुलच तीचं जग असतं तीची फक्त एकच माफक अपेक्षा असते, मुलांनी शिकुन चांगलं घडावं ,व आयुष्यात काही चांगलं काम करावं चांगल्या पदी पोहचावं.... लेकरांच्या हसण्याने दु:खातही जी हसते, आणि लेकरांच्या रडण्याने सुखातही जी रडते ती आई असते....तिच्या जीवनाच्या साऱ्या काही भावना जणु आपल्या लेकरांपाशी कवटाळलेल्या असतात. लेकरांच्या सर्व भावना ती जवळीकतेने जपते, स्वतःच्या भावना,ईच्छा,आकांक्षा यांना दुय्यम ठेवून आपल्या लेकरांची स्वप्न, त्यांच्या ईच्छा, गरजा यांना महत्त्व देते, आणि त्यासाठी नेहमी झटते. 
     लेकरांच्या डोळ्यातील भाव जाणणारी ती मायमाउली असते, आपण कितीही तिच्याशी रुसलो, भांडलो, रागावलो, तरीही आपल्याला जवळ घेत आपले आसु पुसणारी तीच असते. आई आपल्या मुलांप्रती खूप संवेदनशील असते. तिला चटकन त्यांच्या मनातील भाव हेरता येतात. त्यांच्या प्रत्येक यशापयशात, सुखदुःखात तिची महत्त्वाची भूमिका असते. 
        जी काही न सांगता सर्व जाणते, ती आई असते. 
        वात्सल्य, प्रेम, करुणा, ममता या साऱ्या निरागस,          प्रामाणिक भावभावनांचा संगम / सागर म्हणजे आई
                      निकीता चंद्रकला दादाभाई 

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...