Monday, 9 August 2021

ऑगस्ट क्रांती दीन स्वातंत्र्याची बीजपेरणी


           'इंग्रजांच्या साम्राज्यावरील सुर्य कधी मावळत नाही.' अशी दर्पोक्ती ब्रिटिश  काळात केली जात असे. कोट्यवधी निशस्त्र आणि स्वयंप्रेरित भारतीयांनी सर्व शक्तिमान इंग्रजांचा हा लढा मोडीत काढला.  भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हा निर्णायक दिवस म्हणजेच ९ ऑगस्ट १९४२ याच दिवशी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानातुन सुरू झालेल्या " भारत छोडो " आंदोलनाने ब्रिटीशांची भारतावरील पकड खिळखिळी केली. जगाच्या इतिहासात नोंद झालेल्या रशियन क्रांतीत एक टक्का लोक सहभागी होते. मात्र  भारत छोडो आंदोलनात तब्बल वीस टक्के भारतीय सहभागी झाले होते.  

ऑगस्ट क्रांती' काय होती? या क्रांतीचं महत्व काय?

               ब्रिटिशांच्या सुमारे दीडशे वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रत्येक भारतीय आतुर होता. त्याच वेळी 'करो या मरो' या मंत्रासह महात्मा गांधींनी या स्वातंत्र्याच्या अंतिम संघर्षाची ठिणगी पेटवली. आयुष्यभर अहिंसेवर श्रद्धा असणाऱ्या गांधींनीच 'करो या मरो' हा मंत्र दिल्याने प्रत्येक भारतीयामध्ये एक उत्साह संचारला होता. कोट्यवधी भारतीय त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरले. ऑगस्ट क्रांती हे असं व्यापक जनआंदोलन होतं ज्याने ब्रिटिशांच्या सत्तेला हादरा दिला मुंबईतून सुरू झालेल्या या आंदोलानाचे पडसाद देशभर उमटू लागले.

भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी

           भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी ही 1942 च्या आधीच्या स्वातंत्र्य लढ्याशी म्हणजेच 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडली गेली आहे. पण खरं म्हणजे दुसऱ्या महायुद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या लढ्याला मोठं बळ मिळालं. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि जग दोन गटात विभागलं गेलं. अमेरिका, ब्रिटनच्या नेतृत्वाखालील दोस्त राष्ट्र आणि जर्मनी, जपानच्या नेतृत्वाखालील  राष्ट्र. आग्नेय आशियात ब्रिटिशांचा जपानच्या सैन्याने पराभव केला आणि सिंगापूर, मलाया आणि बर्मा म्हणजे आजचे म्यानमार जिंकून भारताच्या सीमेपर्यंत मुसंडी मारली. आता जपान कधीही भारतावर हल्ला करणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती

             भारतातही ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याची लढाई सुरु होती. अशा परिस्थितीत दोस्त राष्ट्रांसाठी भारताचा पाठिंबा हा अत्यंत महत्वाचा होता. त्यामुळे अमेरिका आणि फ्रान्सने ब्रिटनवर दबाव टाकायला सुरुवात केली. भारतीय गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनलिथगो यांनी भारतीय नेत्यांना न विचारता 3 सप्टेंबर 1939 साली भारत जर्मनीविरोधात या युद्धात सामिल होत असल्याची घोषणा केली.

                  काँग्रेसमध्ये या युद्धात ब्रिटिशांना पाठिंबा देण्यावरुन आपसी मतभेद होते. ब्रिटनला कोणत्याही परिस्थितीत भारताची साथ आवश्यक होती. पण या युद्धानंतर भारताला काय मिळणार यावर ब्रिटिशांनी चर्चा करावी अशी महत्त्वाची भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली होती.

'क्रिप्स मिशन' भारतात

                 ब्रिटिशांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली मार्च 1942 साली 'क्रिप्स मिशन' भारतात पाठवलं. क्रिप्स मिशनने भारताला पूर्ण स्वराज्य नाकारुन डॉमिनियन स्टेटस देण्याचा प्रस्ताव मांडला. पण भारतीयांनी हा प्रस्ताव नाकारला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांकडून भारतीय स्त्रोतांचं शोषण करण्यात आलं, युद्धाच्या खर्चासाठी बंगाल प्रांतातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या होत्या, आणि त्यावेळी भारत उपासमार, गरिबी आणि दारिद्रयाच्या समस्यांनी भरडला गेला. भारतीयांचे शोषण सुरु होतं. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष उफाळून आला होता, साम्राज्यवादावर आता अंतिम प्रहार करण्याची वेळ आली होती.

इंग्रजांनी जेवढी मुस्कटदाबी केली, तेवढाच आंदोलकांचा कडवेपणा, चिवटपणा वाढत गेला. 

काही प्रमाणात हिंसा आणि प्रतिसरकारची स्थापना

                हे आंदोलन अहिंसक पद्धतीने करायचं असं ठरलं असताना प्रमुख नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलनाला काही प्रमाणात हिंसक वळण लागलं. त्यामुळे ठिक ठिकाणी रेल्वे पटऱ्या उखडण्यात आल्या, रेल्वे स्टेशन आणि पोलीस स्टेशनला आग लावण्यात आली, तारायंत्रे उखडण्यात आली. मुंबई, अहमदाबाद आणि जमशेदपूर या ठिकाणी कामगारांनी आंदोलनात भाग घेतला. सरकारी इमारतींवर तिरंगा फडकवण्यात आला. साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची स्थापना करण्यात आली. बलिया, बस्ती, मिदनापूर आणि इतरही काही भागात अशा प्रकारची प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अवघ्या एका आठवड्यात २५० रेल्वेस्थानक, ५०० टपाल कार्यालय आणि १५० पोलिस ठाण्यांवर हल्ले झाले. 

              हे स्वयंस्फूर्त आंदोलन म्हणजे एका बलाढ्य साम्राज्य वादाला सर्व सामान्यांनी दिलेले जबर आव्हान होते. याच आंदोलनात गांधीजींनी आता " कार्यकर्ता नाही तर नेता बना " असे तमाम भारतीय व स्वातंत्र्य सैनिकांना आवाहन केले. ९ ऑगस्टचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच बहुतांश प्रमुख नेत्यांना अटक झाली होती. पण त्या नंतर स्वातंत्र्याची लढाई लढणारा प्रत्येक कार्यकर्ता हा आंदोलनाचा नेता झाला. गावोगावी स्वातंत्र्य आंदोलने झाली. नेते, कार्यकर्ते, महिला, पुरुष, विद्यार्थी सर्वच वर्ग या आंदोलनात हिरीरीने सहभागी झाला.

 स्वातंत्र्य सौदामिनी, ब्रिटिशांच्या जुलमाला न जुमानता अरुणा असफअली या तरुणीने अखेर गोवालिया टँकवर तिरंगा फडकावला. व यातूनच प्रत्येक सामान्य महिला  या आंदोलनाशी जुळून आल्या. आणि मग येथुन एक महिला राजकीय क्रांती घडुन आली. ही घटना महिलांना भारतीय राजकारणात स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली.  भारत छोडो आंदोलनाचा इतिहास अज्ञात योध्यांच्या बलिदानाने भरुन गेला आहे. त्या काळातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, पत्रकार, कलाकार यांच्या अनेक साहसी गोष्टी आहेत. भारत छोडो हे केवळ ब्रिटिशांविरोधात आंदोलन नव्हतं तर ते भारतीय लोकांमध्ये एक नवीन चेतनेचा संचार होता. 

               या आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग ही विलक्षण होता. क्रांतीची ठिणगी मशाल होऊन पेटत होती. तमाम भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची आग धुमसत होती.  9 सप्टेंबर 1942 या दिनी नंदुरबारचा विद्यार्थी शिरीषकुमार मेहता याने आपल्या बालमित्रांना  सोबत घेत  ब्रिटिशांच्या विरोधात चले जाव चा नारा दिला. व यामुळे त्या चिमुकल्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले. या आहुतीत शिरीषकुमार सोबत धनसुखलाल मेहता, घनश्याम दास, शशीधर व लालदास या बालसैनिकांचाही समावेश होता. 


भूमिगत नेते आणि जनतेचे नेतृत्व

                या आंदोलनात महत्वाचे नेते अटकेत होते आणि इतर नेते भूमिगत झाल्याने या आंदोलनाला तसं नेतृत्व राहीलं नाही. त्यामुळे लोकांनीच हे आंदोलन हाती घेऊन त्याचे नेतृत्व केल्याने हे आंदोलन 'लिडरलेस मुव्हमेंट' ठरलं. जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन, राम मनोहर लोहिया, सुचेता कृपलानींसारख्या नेत्यांनी भूमिगत राहून या आंदोलनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. उषा मेहतांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत भूमिगत राहून 'काँग्रेस रेडिओ'चे प्रसारण केलं.

            या आंदोलनाने भारताच्या भावी राजकारणाचा पाया रचला. गांधींजीनी आपल्या भाषणात सांगितलं होतं की, ज्यावेळीही सत्ता मिळेल त्यावेळी ती भारतीयांनाच मिळेल. सत्ता कोणाकडे सोपवायची याचा निर्णयही भारतीयच घेतील. ब्रिटिशांनी भारत छोडा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी सत्तेत राहण्याची नैतिकता गमावली होती. ब्रिटिशांच्या सत्तेचा पाया असलेल्या पोलीस आणि लष्करी व्यवस्थेवरील त्यांचे नियंत्रण संपलं होतं. त्यामुळे आता ब्रिटिश भारतावर जास्त काळ सत्ता गाजवू शकणार नाहीत हे स्पष्ट झालं होतं.

जगभरात बदलाचे वारे

              भारत छोडो आंदोलन अशा वेळी सुरु करण्यात आलं होतं ज्यावेळी जग एका जबरदस्त बदलातून जात होतं. जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं गेलं होतं तर अनेक देशांमध्ये साम्राज्यवादाविरोधात शेवटची लढाई सुरु होती. भारतामध्ये एका बाजूला भारत छोडो आंदोलन सुरु होतं तर दुसऱ्या बाजूला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेनं ब्रिटिशांविरोधात लढा पुकारला होता.

              भारत छोडो आंदोलनामुळे ब्रिटिशांच्या सत्तेला पायउतार लागला. "ही लढाई अंतिम असेल आणि यानंतर केवळ स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यच मिळेल" असा आत्मविश्वास प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण झाला. तसेच ब्रिटिशांनाही आता आपली सत्ता सोडावी लागणार याची खात्री झाली. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आणि अज्ञात वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताच्या भावी पिढ्यांनी स्वातंत्र्याचा श्वास घ्यावा यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

ऑगस्ट क्रांती आंदोलन मानवी मूल्यांसाठी आणि हुकुमशाही विरुद्ध लढले गेले होते. हे आंदोलन तमाम भारतीयांचे होते आपल्या हक्कांसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी.


- निकीता चंद्रकला दादाभाई

4 comments:

अक्षतरंग said...

निकिता छान मांडणी आहे.
ऑगस्ट क्रांती दिनाच स्वातंत्र्याच्या दृष्टीने फारजास्त महत्व आहे. भारतमातेला पारतंत्र्यातुन मुक्त करण्यासाठी देशवाशीय पेटुन उठले ते याच क्रांती दिनामुळे; मुळात स्वातंत्र्याची मागणी याच क्रांतिदिनाने जास्त जोर धरू लागली असही पहायला मिळत.

Nikita Sonawane said...

क्रांतीचे विचार रुजवुया आपल्या लेखणीतून आपल्या संवादातून आणि आपल्या विचारांतून 🤝🌺

Unknown said...

Good Articulated keep going

Anonymous said...

खुपच छान लिहिलय....

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...