Friday, 28 May 2021

मासिक पाळी : पुरुषांचा दृष्टीकोन आणि जबाबदारी


जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा



 

जगातील बरयाच भागांमध्ये एक अकथनीय विषय म्हणून आजही मासिक पाळीकडे बघितले जाते. व हे अकथन मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या मार्गात एक मोठा अडथळा ठरत. आजही ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणातील महिलांना आपल्या मासिक पाळी विषयी बोलण्यास लाज वाटते. त्या अद्याप मासिक पाळी विषयीचे महत्त्व अधोरेखित करु इच्छित नाही. मात्र या विषयाकडे फक्त महिलांनी लक्ष वेधावे किंवा त्यांनीच याबद्दल बोलावे असे मुळीच नाही. तर याठिकाणी आपण पुरुषांना देखील ध्यानात घेतले पाहिजे.             

          सहसा मासिक पाळी विषयी महिलांमध्ये तरी काहीतरी कुजबुज चालते. मात्र पुरुष या विषयी बोलताना आढळत नाही. तस पुरुषांना सरळ दोष देणं हि चुकीचंच म्हणावं लागेल. कारण या आपल्या रचनात्मक समाज व्यवस्थेत जशी एक बाई घडवली जाते तसाच पुरुष देखील घडवला जातो. या व्यवस्थेत त्यांच्यासाठी Gender Norms तयार झालेले असतात. आणि याच व्यवस्थेच्या रूढी नियमांमुळे पाळी हा विषय तर अगदीच वर्ज्य ठरवला गेला. त्यामुळे सुरुवातीपासूनच मुली – महिलांना घडविले जाते , सांगीतले जाते की, पाळी हा एक गुपित विषय आहे, त्यावर उघडपणे बोलू नये. तो एक लज्जेचा विषय आहे. हा विषय घरातील आपल्या आई , ताई , काकू. आज्जी, मावशी या महिला वर्गामध्ये कधी मोकळेपणाने बोलला जात नाही तर पुरुषांनी या विषयी काही बोलणे दूरच. 

            शाळेत देखील हा विषय कधी स्पष्टपणे शिकवला जात नाही. शिक्षकांमध्ये या विषयी संकोचीत वृत्ती दिसून येते. मग  शाळेतील Life Cycle हा विषय शिक्षक वरवर शिकवून मोकळे होतात. दुसरं म्हणजे बऱ्याच ठिकाणी या विषयी बोलणं टाळलं जातं. यामुळे या विषयीचे अज्ञान हे आहे आहे तसेच राहते. व यातून तथ्य बाजूला राहून अंधश्रद्धा अफवा आणि गैरसमज यावरच मग चर्चा केली जाते. मात्र सध्याच्या या Digitalisation, Social Media, आणि Advertisement च्या काळात पुरुषांपर्यंत हा विषय पोहचतोय. व हळहळू का होईना हे पुरुषभान जागरूक होतंय. सद्या सोशल मिडीयावर मासिक पाळी विषयी वेगवेगळे अभियान, चळवळी व जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जाताय . व या माध्यमातून आजच्या शिक्षित व update तरुणांना हा विषय समजतोय व पटतोय देखील.

            मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असला तरी त्याबद्दलची कुजबुज पाळी जाईस्तोवर तशीच असते. आज कितीतरी sanitary pad हे दुकानातून कागदाच्या आवरणात गुंडाळून काळ्या पिशवीत pack करून आणले जातात. आणि या पद्धतीने तो मेडीकल किंवा दुकान वालाच तस व्यवस्थित pack करून देतो. यात देणारा व घेणारा यांच्यात निशब्दपणे खाली माना टाकून हा देवघेवीचा व्यवहार उरकला जातो. तसा हा विषय वरकरणी सगळ्यांना माहित असतो मात्र जाणीवपूर्वक या विषयावर बोलणं टाळलं जातं  महिलेला या मासिक पाळीच्या काळात कितीही त्रास होत असला, यातना होत असल्या तरी तिला हा त्रास हे दुख कुणापुढे सांगता येत नाही, बोलता येत नाही. या काळात तिला मानसिक आधाराची खूप गरज असते. Mood Swings मुळे तिची चिडचिड होत असते. कंबर दुखी, ओटी पोटातल्या शारीरिक त्रासामुळे ती हैराण झालेली असते. आणि यावेळी तिला गरज असते हा त्रास समजून घेणाऱ्या पार्टनर ची. यावेळी अशक्तपणा शरीरात जाणवत असतो. हातपाय गळून पडतात. यावेळी बाईचा हा त्रास समजून घेऊन जर तिचे हातपाय दाबून दिले. तिच्याशी प्रेमाचे चार शब्द बोलले व घरकामात तिला मदत केली. तर हे तिच्यासाठी या पाळीच्या काळातील शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खूप हितावह ठरेल. 

               मागील वर्षी मी मासिक पाळी आरोग्य या विषयी एक लेख लिहला होता. तो मी माझ्या एका MSW झालेल्या मित्राला share केला. त्याला तो आवडला. व तो त्याने कॉलेजच्या एका ग्रुप मध्ये share केला. त्यावर आलेल्या काही प्रतिक्रिया त्याने मला सांगितल्या. त्या अशा की, त्या ग्रुपमधील काही मुल त्याला वयैक्तिक मेसेज करून म्हणाली ग्रूपवर तू ते मासिक पाळीविषयी का share केल या ग्रुपमध्ये मुली देखील आहे. या पुढे असे काही मेसेज पाठवू नको म्हणून. आणि आहे तो मेसेज delete कर. यावरून एक लक्षात आलं ते अस की मासिक पाळी या विषयाला आजही अश्लील किंवा न बोलणारा विषय म्हणून टाळले जाते. व यामुळे पाळी संबधीचे अनेक गैरसमज व अंधश्रद्धा वाढीस चालना मिळते. तसे पाहता वरील प्रसंगातील मुलं ही उच्चशिक्षित आहे मात्र तरीही त्यांच्यात याविषयी अज्ञानाचा कळस गाठलेला दृष्टीस पडतो. 

                    याच्याच अगदी विरोधाभासातला दुसरा प्रसंग देखील याला जोडून नोंदवावासा वाटतोय. तो असा की, मागील काही महिन्यांत Internship च्या निमित्ताने मी बाहेरगावी होते. त्यात त्या ठिकाणी आम्ही सर्व सहकारी मित्र – मैत्रिणी सोबत राहून काम करत होतो. हा सहकारी वर्ग देशातील नामांकित संस्थांमधून शिक्षण घेणारा होता. त्या ठिकाणी जेव्हा मला व माझ्या एका मैत्रिणीला पाळी आली तर त्यावेळी ते सर्व मित्र आमच्याशी याविषयी अगदी मोकळ्यापणाने बोलत होती. स्वतः हून आम्हाला विचारपूस करीत होती , एका आई सारखं आमची काळजी करत होते. त्या दरम्यान त्यांनी आम्हांला काही कामही करू दिले नाही. एका मित्राने तर ते तीन ते चार दिवस सतत हात पाय दाबून दिले. डोकं दाबून दिल. आणि ते अगदी आग्रहाने सांगत होते काही त्रास होत असेल तर जरूर सांगा म्हणून. हे अनुभवून मला वाटले की, या काळातले प्रत्येक दिवस बाईचे जर अशा मायेच्या व आपुलकीच्या वागणुकीने गेले तर तिला होणारा त्रास कितीतरी पटीने या प्रेमाच्या – माणुसकीच्या वागणुकीनेेच कमी होईल. 

              आपली एक गोष्ट आहे “बाईला समजणं म्हणजे अवघडच“ मात्र या पूर्वग्रहामुळे आपण बाईला कधी समजून घ्यायचे की नाही? तिच्या समस्या, भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा की नाही? एक भाऊ , मुलगा, नवरा व एक मित्र म्हणून तुम्हाला ते समजून घ्यावे लागेल. तुमची बहीण तुम्हांला येऊन सांगणार नाही की दादा मला पाळी आलीय. तिचा प्रत्येक महिन्यातील हा पाच दिवसांचा काळ समजून घ्या . या दिवसांत तिला होणारा राग, चिडचिड व त्रास हे नैसर्गिक आहे. एक पुरुष म्हणून तिला या नाजूक काळात मायेचा आधार देत तुम्ही तिला होणारा त्रास नक्की कमी करु शकता. 

            समाजातील वास्तव परिस्थिती मासिक पाळी : पुरुषांचा दृष्टीकोन आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधतांना लक्षात येत की, ज्या पुरुषांकडे या विषयी सकारात्मक दृष्टीकोन आहे. ते न लाजता , न अडखळता आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. मात्र जो पुरुष वर्ग मासिक पाळीकडे नकारात्मक भावाने, बघतो जो याविषयी अनभिज्ञता दाखवतो त्याला शिक्षित करणे व मासिक पाळीविषयी वैज्ञानिक दृष्टीकोन देणे हि आपना सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. मात्र तत्पूर्वी त्या पुरुषाची देखील हि प्राथमिक जबाबदारी आहे की, त्याने या नियमित घडणाऱ्या नैसर्गिक बाबीविषयी सज्ञानी व्हावे. प्रगल्भ व्हावे. 


- निकीता चंद्रकला दादाभाई 






##Let's  Talk Periods

##Daag achhe hote he!

##Periods are nature gift

##Eradicate stereotypes thing's

##Menstrual health day





4 comments:

Anonymous said...

You are truly an inspiration

Nikita Sonawane said...

My pleasure 🤝

Anonymous said...

Wonderful writing on a most important topic...We see lot's of misunderstanding about this topics in our society we should speak on this topics and create awareness on this social issue.

Nikita Sonawane said...

Thank you very much for your appreciation! #Let's Find out #Let's be able #Let's be Aware #Let's cross the so called stereotype things

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...