Friday, 21 May 2021

शब्दांचे ऋतू अनंत


 


  शब्द रंग, शब्द गंध

शब्द तवंग, शब्द सवंग

डोकावूया जरा शब्दांच्या 

      अंतरंग ! 



             शब्दांचे अर्थ गळून पडतात तेव्हा आवाज शिल्लक उरतात. नाद याचे वेगळे ते अर्थाच्याही आधी असतात‌. शब्द हे हुंकारात असतात, हुंदक्यात असतात, हंबरड्यात असतात, कर्कश्श किरट्याकिनऱ्या किंकाळीत असतात. अबोल्यात देखील त्यांचा वसा असतो. आणि वास असतो तो एखाद्याच्या डोळ्यात. संगीतातील प्रत्येक रीदम म्हणजे जसं संगीत होय. तसंच आर्जव होणारा प्रत्येक ध्वनी म्हणजे वाचाच होय. आणि हेच जर आपलं शाब्दिक प्रयोजन असलं की, मग नादानादातून ऐकु येउ लागतात त्याचे अर्थ....!  

               किती  चमत्कारिक जादू असते शब्दांत. धारदार, वजनदार,  मुलायम, कणखर, सडेतोड, अशा रंगांनी तर काही शब्द प्रेमळ, काही लागट, काही मृदू, काही कठीण, काही लवचीक, काही ताठ, काही वाकडे, तर काही अनाकलनीय अशा कितीतरी  अंगांनी, ऋतुंनी हे शब्द नटलेले असतात. त्यांच्या स्वतःच्या असण्यातही एक शृंगारिक लेण असते.

               

 शब्द शब्दात मांडण्या बनविला शब्दकोश

 शब्दाशब्दांतून पुसे दोघामधला तो रोष

 अशी शब्दांची किमया, शब्द आहे एक कोडे

कधी सांगावया गोष्ट, एक शब्द ना सापडे.


            राजकुमार हिराणी दिग्दर्शित "थ्री इडियट्स" या चित्रपटात चमत्कार ला बलात्कार करणारा रॅंचो आठवला की, कळते शब्दांची किमया, 'चिंता' शब्दावरील अनुस्वार हटवला की होते त्याची 'चिता' बघा केवढी ही शाब्दिक चमत्कृती. 

            शब्दांमुळे विचार बदलतात, विचाराबरोबर आचरण. कळत नकळत शब्द संस्कार करतात मनावर आणि त्यावरून व्यक्तिमत्त्व स्पष्ट होते. या हृदयीचे त्या हृदयी तेही शब्दांच्याच माध्यमातून. शब्दांइतके प्रभावी माध्यम नाही. अगदी एकटी बसलेली व्यक्ती मनातल्या मनात शब्द गुंफतच असते. अशी विशाल  ताकद असते शब्दांमध्ये.

               संवादाची भूक ही जीवंतपणाची साक्ष आहे. मानव आणि पशू ह्यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच अवकाशातील शोधापेक्षा महान आहे.  शब्द म्हणा, संवाद म्हणा, यांच्यासारखा जादूगार दुसरं कुणी नाही. शत्रू नाही, तसेच मित्रही नाही. षङरिपूंना जे जे रंग असतील; माया, ममता, वात्सल्य, प्रेम, करुणा, मैत्रभाव ह्यांना ज्या ज्या छटा असतील, त्या आपण शब्दांना बहाल केल्या तर शब्द या छटांत स्वतः ला लपेटून घेतात. त्यांत ते मिटून जातात. 

               शब्द आणि संवाद विलक्षण जादू करतात. अहंकार, संकोच, अबोला, तामस, कपट...... अशी एकेक वस्त्रं उतरवली जातात. स्पर्श न‌ करताही भक्कम आधार दिला जातो ही फक्त शब्दांचीच किमया म्हणावी. काही शब्दांची भीती वाटते. गाळण उडते, बोबडी वळते, दातखीळ बसते. शब्द बाहेर पडत नाहीत. काही शब्द इतके कडवट, बोचरे असतात, की कडाक्याच्या थंडीतही कापरं भरावं.एखाद्याची शाब्दिक चपराक रडायला लावते. कोणी तरी शब्दांनी चीतपट करतो. कटय़ार घुसावी आणि कोथळा बाहेर काढावा इतके प्रभावी विष शब्दच देऊ शकतात. शस्त्राविना खून करायला शब्द हेच शस्त्र असते. शब्द हेच शस्त्र, अस्त्र, मंत्र, तंत्र. आणि हे साध्य करिती ते आपले स्वर यंत्र. 

               संगीताप्रमाणे शब्दांना - संवादाला पण विस्ताराचे, रंगतीचे टप्पे असतात, चढ - उताराचे आरोह - अवरोह असतात. स्वरांप्रमाणेच शब्दांनाही एक क्रम असतो. रागदरीत जसे काही स्वर वर्ज्य असतात. त्याप्रमाणे संवादातही काही शब्द वर्ज्य असतात. काय, विलंबित, द्रुत अशा क्रमाने गाणं जसं फुलत जातं तशाच क्रमाने संवादालाही फुलण्याचा सोस हवा. तंबोऱ्याच्या दोन षङजांप्रमाणे संवादातही दोन तारा एकजीव व्हाव्या लागतात. शेवटी हा भौतिक संसार व ही दुनिया सारी शब्दांचीच. फरक इतकाच की, बोलाचाली निराळी आणि संवादाची मैफल निराळी! 

               बोलून दुखावण्यापेक्षा अबोला धरण्याने माणूस जास्त खच्ची होतो. त्याचप्रमाणे काही - काही शब्द, वाक्यं - विधानं फार भयंकर असतात. ती मोघम असतात. पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद साथीचा रोग पसरवणाऱ्या व्हायरस पेक्षा अफाट असते. आणि मग नेमक्या जागी बोट न ठेवणारी हीच वाक्यं आपल्या सगळ्या शरीराला दंश करीत सुटतात. तीव्र धारेने वार करीत सुटतात. शब्द कधी बंदुकीची गोळी होतात. तर कधी रणांगणात चालणारी तळपती तलवार. 

               शब्दांचा व्याकरणातील अर्थ आणि स्थान हे परीक्षेच्या बाकावर असताना समजतं आणि शब्दांचं जीवनाशी काय नातं आहे याचा अर्थ जीवन जगताना उमगतं. परीक्षेचा बाक सोडून हॉल बाहेर पडलो की, शब्द आणि व्याकरणाचं ओझं सहजी झटकता येतं. मात्र जीवन  जगताना जेव्हा शब्दांची झालर झटकता येत नाही, तेव्हाच त्यांचा खरा अर्थ समजतो. शब्दांचा मूळी रंग कोणता? की नुसता अभिलाषेचा तवंग, आणि भावनांचे सवंग! मुळाक्षरे, बाराखडी किंवा वर्णमाला सगळेच शिकतात. मात्र या वर्णमालेत जर सुसंवादाला 'सु' मिसळला तर त्याचीच सुंदर सुवर्णामाला गुंफता येईल. 

               

               

वारेमाप उधळावा कोमल शब्दांचा सडा. अन् शोषून घ्यावी जीवनातील तल्खली ।

सुरेल शब्दांच्या धारा बरसावून करावे सुरेल समृध्द जीवनगाणी. ।।


 - निकीता चंद्रकला दादाभाई



4 comments:

Unknown said...

मस्तं,आवडलंय

Anonymous said...

You are not only a great writer but you also have the potential to be a great poet.
And really can't think of a word capable of praising your work.

Nikita Sonawane said...

Thank you for your positive responces,
Thanks For Encouraging me to write more great.

Unknown said...

खूप अप्रतिम लिखाण मांडलाय निकी तु.....शब्दांचा अर्थ समजावून सांगणाऱ्या ह्या लिखाणाच्या कौतुकासाठी शब्द च सुचत नाहीये...������खुप् सुंदर विचार मांडलेले आहेत...पुढील लिखानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा...��

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...