जे एक असतं, ते अमूल्य असतं, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं. इथे वन्स मोअर नाही. म्हणून हे अमूल्य आयुष्य आपण कशासाठी वापरणार? याचा ज्याने त्याने अगर यथोचित शोध करून बोध घेतला, तर निश्चितच हे कोडं उलगडण्या वाचून राहणार नाही.
जग कसं बदलावं? याचे खरेतर अनेक पर्याय आहेत :
सेवेची कृती, वैज्ञानिक संशोधनांची कृती, निषेधाची कृती, संघटनेची कृती, जागृतीची कृती, पर्यावरण संरक्षणाची कृती अजुन एक सुंदर पर्याय म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक बदलाची कृती. आपलं रोजचं जगणं म्हणजेच संस्कृती; आपण कसं जगतो, यातून जग घडतं. यातून समाज घडतो.
इतरांच्या जगण्यासोबत माझं जगणं जोडलं आहे. त्यांच्या अस्तित्वासोबत माझ्यातील स्व जोडलेला आहे.आपण सगळेच एकमेकांशी Connected,आहोत Interlink आहोत. आपल्या जीवनात Competition आणि Consumption आहे. हे सगळं आपल्याला नाकारता येणार नाही. पण यांची जागा जर हळूहळू Connection ने घेतली तर 'सोन्याहून पिवळे' म्हणायला हरकत नाही.
आपल्या जीवनात या आयुष्यातून तुम्हाला नेमके काय मिळवायचे आहे? याचा तपास करा. त्यावर बोला आणि कृती देखील अवलंबवा. व्यक्ती आणि समाज यांचा सम्यक समन्वय साधून व्यक्तिविकासास पूर्ण स्वातंत्र्य देऊन समाज सुसंस्कृत बनवणाऱ्या, नैतिकतेची आणि विज्ञाननिष्ठ विचारांची बैठक असणारं जग बदलण्यासाठी तुम्ही कार्यनिष्ठ रहा. तुम्ही शोषित, पीडित, वंचित, दुर्बल, सामाजिक व कायदेशीर न्याय, राजकीय प्रश्न - सामाजिक समस्या मागासलेल्यांचे हक्क - अधिकार , आर्थिक अवकाश, आणि राष्ट्राच्या विकासाविषयी बोलायला सुरुवात करा. आपल्या मानवी व राष्ट्रविषयक कर्तव्यांप्रती दक्ष रहा. व ते व्यवहारात आणा. "मुक्यांना आवाज देऊन, दुबळ्यांना शक्ती द्या."
कामं साठवून, कामाचा गुलाम होण्यापेक्षा कामाचा मालक बनून त्यावर स्वार होण्यात फार मोठे मानसिक समाधान लाभते. म्हणून जग बदलण्याच्या दृष्टीने आपले भविष्यवेधी आराखडे तयार करा. नियोजन आखा. आणि तुरंत आपल्या कामाला लागा. आपल्या विचारांचे बीज आपल्या कृतीत पेरा. मग बघा तुमचं हे लुसलुशीत पिकाचं खाद्य तुम्हाला कसं आयुष्य जगताना उपयोगी पडतं ते. आपले प्राधान्यक्रम आणि गतीनियम निश्चित करा. आणि झपाटून कामाला लागा.
भूतकाळ आपला कितीही ओबडधोबड, कष्टमय व संघर्षपूर्ण असला तरी भूतकाळ आठवून, त्याचा विचार करून, अथवा त्यात गुंतून काहीही साध्य होत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही. मग वर्तमान महत्त्वाचा आणि त्या आधारे आपण आपलं सुंदर असं भविष्य घडवू शकतो. आणि या दृष्टीनेच प्रत्येकाचे प्रयास आणि प्रयोजन असले की जग नक्की बदलाच्या, परीवर्तनाच्या दिशेने झेपावेल.
आपले प्राक्तन एक आहे हा जागतिकीकरणाचा मंत्र आहे. जगाच्या चांगुलपणावर तुम्ही विश्वास ठेवा; पण तो चांगुलपणा जागा करावा लागतो याचेही भान तुम्ही असु द्या. जसं जग तुला हवं आहे, तसं स्वतः जगायला सुरुवात कर, त्यासाठी अगोदर स्वतः ला घडव. जग बदलण्याच्या दिशेने काम करण्या अगोदर स्वतः वर काम कर. मग बघ तुझ्या मनगटांत आणि बाहुंत नक्कीच ती ताकद स्फुरेल. ज्या बळावर तुझा प्रवास बदलाच्या दिशेने मार्गक्रमण करेल.
नुसती श्वासोच्छ्वासांची संख्या वाढवणे गरजेचे म्हणजे जीवन नव्हे! जीवन हे वाहण्यात असते, जीवन रोज नव्याचा शोध घेण्यात असते, जीवन हे रोज अनोळखी मार्गांचा मागोवा घेण्यात असते. तुझ्या जगण्याचे हेतू कुणाच्या तरी समस्या सोडवण्यामध्ये गुंतवून ठेव. म्हणजे या चंगळवादी भौतिक जगात मी कुणासाठी व कशासाठी जगावं ? आणि कशासाठी मरावं ?असले निरर्थक प्रश्न तुझ्या मस्तकात डोकावणार नाही. तुझं जगणं अर्थपूर्ण बनव. सिध्दार्थाने सांगितलेल्या "अत्त दीप भव" च्या उपदेशानुसार स्वयंप्रकाशित हो आणि जग बदलण्याच्या वाटचालीतील मुसाफिर हो.
- निकीता चंद्रकला दादाभाई
2 comments:
Nice niki
जगण्याच्या विविध वाटा अन त्या वाटेतून ळणार्या वेगवेगळ्या बोलण्यातून लिहिण्यातून वागण्यातून विचारातून संधीतून आत्मनिरीक्षण आतून जग बदलू शकत हे अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले आहे आनंदी जगण्यासाठी जग कसं बदलावं ....... अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी केली अप्रतिम
Post a Comment