लोकशाहीच्या नावाने गळा,
मानवी हक्कांचा लळा,
आणि वंचितांचा कळवळा।
ग्रामीण विकास समजून घेणे त्यामागील कारणे, समस्या व त्यावरील उपाय या सर्व बाबींचा ताळमेळ बसवून निरीक्षणातून उहापोह करणे यासाठी गुजरात येथील ग्रामीण भागात आमचा एक आठ दिवसीय अभ्यास दौरा "शाश्वत ग्रामीण विकास पुनर्निर्माण" या कोर्सच्या माध्यमातून झाला. या अभ्यास दौ-याच्या निमित्ताने खुपशा गोष्टी जवळून समजून घेता आल्या. प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेता आला. विकासाच्या नावामागची सत्यपरिस्थितीचे आकलन करता आले.
या भेटीदरम्यान मुख्यतः गुजरात राज्यातील भौगोलिकदृष्ट्या सातपुडा पर्वत भागातील काही जिल्ह्यांमध्ये आम्ही वास्तव्यास राहिलो. येथे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना भेटी देणे, तिथे एक - दोन दिवस राहून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणे तेथील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व भौगोलिक परिस्थिती समजून घेणे व त्या समुदायाचा अभ्यास करणे या उद्देशाधारित आमचा हा दौरा नियोजित होता.
या आठ दिवसांच्या दौऱ्यातील अनेक बाबी लिहिण्यासारख्या आहेत, बोलण्यासारख्या आहे, नोंदवण्याजोग्या आहे. प्रत्येक छोटी बाब उजेडात यावी इतक्या महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक संवेदनशील मानवी मनाला बोचतील, काळजात जाऊन टोचतील असेही काही प्रसंग इथे अनुभवयास आले. आणि खरे गुजरात माॅडेल प्रत्यक्षदर्शी बघता आले.
गुजरातच्याा नर्मदा जिल्ह्यातील माथावाडी या गावात एक - दोन दिवस मुक्कामी राहिल्यावर तेथील आदिवासी समुदायाला जवळून समजून घेता आले. त्यांचे रोजचे जगण्याचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, मुलभूत हक्कांचे प्रश्न, मानव अधिकारांचे प्रश्न, इ..... असे अनेकविध प्रश्न व समुदायाच्या समस्या जाणून घेण्यात व ओळखण्यास मदत झाली.
माथावाडी हे गाव नावाप्रमाणेच अगदी उंच उंच डोंगररांगांच्या माथ्यावर वसलेलं आहे. या गावाजळून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर देशाचे पहिले गृहमंत्री व ऐक्याचे प्रतिक असलेल्या सरदार भाईंचा गगनचुंबी पुतळा विकासाच्या नावाखाली उभा करण्यात आला. व १९७० च्या दशकापासून प्रस्तावित असलेले सरदार सरोवरची निर्मिती करण्यात आली.
येथील समुदायातील लोकांशी बोलल्यावर समजले की, ही लोकही पुतळा उभारणीच्या कामात ३०० ते ४०० रुपये मजुरीवर रोजंदारीवर कामाला जात होती. बांबुंच्या साहाय्याने उंचावर जोखीम पत्करून त्यांनी हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मदत केली. मात्र पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यावर या लोकांसाठी तेथे साध्या कर्मचारी ची नोकरीचीही तरतूद नाही. येथे रोजगाराची समस्या ही डोके वर काढत होती. येथे पोट्यापाण्याचा प्रश्न हा शेती या एकच साधनाने सोडवला जातो. रोजगाराच्या शोधार्थ हा समुदाय जवळच्या केवडीया, राजपिपला, नर्मदा या शहरांमध्ये स्थलांतर करतो. उंचच उंच डोंगररांगांवर पारंपरिक पद्धतीने याठिकाणी शेती केली जाते.
विकासाच्याा बाता ठोकणाऱ्या बडे मंडळींनी समृद्ध अशी जैवविविधता लाभलेल्या या परिसराला व येथील समुदायाचे जनजीवन विकासाच्या नावाखाली अस्ताव्यस्त व विस्कळीत करून सोडले आहे. या विस्थापित झालेल्या समुदायांचा आजही आपल्या मुलभूत हक्कांसाठी व सामान्य सोयी सुविधांसाठी रोजचा लढा व संघर्ष आहे. आपल्या अनेक पिढ्यांपासून या निसर्गाच्या सान्निध्यात या डोंगररांगा, मायमातीला, येथील पशुपक्षी, वन्यजीव, पाणी, या पर्यावरणाला सांभाळत, पर्यावरणाचे संरक्षण करत ही लोकं जीवन जगत होती. मात्र सरदार सरोवरामुळे या भागातील अनेक गावं, वस्त्या व समुदाय यांना विस्थापित व्हावे लागले. आपली शेत जमीन,घरदार, जमीन जुमला, सर्व नर्मदेच्या डोहात बुडवली गेली. अगदी तुकोबांच्या ग्रंथाप्रमाणे.
ज्या साधनवस्तुंना त्यांनी जीवानिशी जपले होते, ज्या घरात, ज्या मातीच्या कुशीत ते लहानाचे मोठे झाले, त्यांच्या अनेक पिढ्या वाढल्या ज्या निसर्गाने लाभलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करून ते आपलं पारंपरिक जीवन आपल्या समुदायासोबत आपली संस्कृतीचे जतन करत आपल्या शैलीने जगत होते. हे सर्व जीवनदायी मानणाऱ्या नर्मदा माईच्या पोटात जमा झाले. केवळ विकासाच्या नावाखाली. एवढं सगळं होऊनही शासन थांबत नाही, तर Eco - Sensitive Zone च्या नावाखाली इथल्या जमिनी ठेकेदारांना देऊन नैसर्गिक संपदा नष्ट करून तेथे मोठमोठ्या हाॅटेल्स, रेस्टॉरंट्स उभे करून त्या जागी सिमेंट काॅंक्रिटचे जंगल वाढवण्याचा कार्पोरेटस वाल्यांची विजिगीषाा आहे.
मेधाताई पाटकर व असे असंख्य कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांतून ज्या काही तरतुदी या विस्थापितांसाठी केल्या गेल्या. त्यांचा लाभ लाभार्थ्यांना मिळेपर्यंत त्यांची अख्खी हयात खर्ची पडली. आकाशातून पडणारी गार जमिनीपर्यंत पोहचेपर्यंत जशी लहान होत जाते. तसे या विस्थापितांसाठी असलेल्या तरतुदी व योजनांची गत झाली.
या सर्व निरीक्षणांतून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, गुजरातचा विकास खूप छान आहे, मात्र फक्त उच्च वर्गासाठी. सामान्य गरीब व मागासवर्गीय समाजाच्या वाट्याला तोच रोजच्या जगण्याचा संघर्ष आहे. छान छान रस्ते आहेत, महामार्ग आहे. मात्र फक्त शहरांपर्यंत सीमित. गावखेड्यात तेच आपले कच्चे रस्ते. गावांत आजही चांगल्या दर्जाचे शिक्षण, शाळा, अंगणवाडी, वीज, पाणी, दवाखाने या प्राथमिक सोयी-सुविधा आणि संविधानाने आखून दिलेल्या मुलभूत हक्कांसाठी वाणवा आहे.
आपण करीत असलेल्या विकासापासून मानवाला आनंद मिळाला पाहिजे. दुःख किंवा लाचारी नव्हे.वरच्या वर्गापासून समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत सर्वांचा एका दिशेने एकसंधपणे विकास व्हावा या दिशेने आपण सर्व एकतेने आग्रही असलो पाहिजे. सरदार सरोवर ज्या उद्देशांना घेऊन बांधले गेले, त्यातील निम्म्याहून कमी उद्देशांची पूर्तता होऊ शकली. एकतेचे प्रतिक म्हणून गुजरात मध्ये सरदार वल्लभभाईंचा भला मोठा पुतळा उभारण्यात आला. मात्र त्यातून कोणता विकास साधता आला? काय निष्पत्ती झाली यातून? तसा तर हा खूपच वादग्रस्त व संवेदनशील सामाजिक विषय आहे. मात्र त्याला राजरोसपणे राजकीय वळण देखील लाभले.
विकास म्हणजे केवळ आर्थिक संपन्नता, दळणवळणाची आधुनिक माध्यमे, बाजारपेठ, रुंद रस्ते असे समजले ; तर आपण स्वतःची फसवणूक करून घेऊ.माणसाचे आरोग्य, मन स्वास्थ्य, निसर्गाशी तोल राखुन त्याचा जरुरीपुरता वापर, समाजस्वास्थ्य, माणसाचे परस्परसंबंध, समाजातील विविध धर्मांच्या आणि वंशांच्या लोकांच्या ऐक्य, साहित्य, संगीतकला अशा सर्वसमावेशक प्रगतीमुळे मनास मिळणारा उल्हास. म्हणजेच विकास संबोधता येईल. आणि हीच विकासाची व्याख्या सर्वत्र रूढ व्हावी ही एक प्रामाणिक आशा.
- निकीता चंद्रकला दादाभाई
4 comments:
छान असा लेख.
वरून वरून दाखवलं जाणार गुजरात मॉडेल हे तिथल्या आदिवासी, कष्टकरी, कामगारांच्या नी शेतकऱ्यांच्या शोषणावर उभ आहे. हे सर्वश्रुत आहे. पण तू त्याला विशेष पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला यासाठी तुझे विशेष अभिनंदन. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आकाशात दिमाखात उभा आहे परंतु तेथे काम करणाऱ्या लोकांना विस्थापित करून, त्यांना जमिनीत गाडून. ह्या एका निरीक्षणाने तुझी लेखन क्षमता दिसून येते.
लिहित रहा!
Real situation .....
Nice✍️✍️👌👌👌
शब्दशैली छान आहे, वास्तविकता आहे हि गुजरातच्या विकासा मागची सत्य स्थिती अगदी हूबेहुब रेखाटली आहे.....छान लिहिलयं
Post a Comment