Sunday, 31 May 2020

TROLLING

                            TROLLING

            सध्या सोशल मीडियावर सोनु सुद व अजय देवगणला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. सोनु सुदला 'सुर्यवंशम' सिनेमातील बस सोबत दाखवून त्याची प्रतिमा Real Hero सारखी Present करण्यात येतेय, तर अजय देवगणला 'विमल व गुटख्यासोबत दाखवून त्यावर टीकाटिप्पणीचे ताशेरे ओढण्यात येत आहे. यात दोन्ही अभिनेते या कोरोना काळात जे  काम करताय त्यात त्यांचा हेतू समान आहे, आपल्या परीने शक्य ती मदत समाजाला करणे. यात अजयने 51 लाख रुपयांची मदत केली, तर सोनु सुद हा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अडकलेल्या लोकांना घरी जाण्यास सहाय्य करतोय. यात ते दोघं Real Life मध्ये त्यांचा Role Play करताय, कुठेही गाजावाजा न करता मात्र, तरी देखील ते ट्रोल केले जाताय. 
               "काय म्हणशील ज्ञानदा " म्हणत, ABP Maza Anchor ज्ञानदालाही सोशल मीडियात खूप ट्रोल केले गेले., फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना देखील माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. एवढेच नव्हे तर सध्या स्वतः  फडणवीसांनाच मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे, 
          यावरून आपल्या हे लक्षात येईल की, ट्रोल हे अगदी कुणालाही, चांगल्या - वाईट बाबींवरून सहज करता येतं मग काय असतं हो, हे "TROLLING" नेमकं?  जे राजकारण्यांपासून, सत्ताधारी - विरोधक असे होत, Celebrities,  साहित्यिक, लेखक, कार्यकर्ते, ते सर्वसामान्यांपर्यंत .... असे अगदी सहज कोणासही Troll केले जाते. या Trolling कडे जरा आपण एक कटाक्ष टाकुया. 
           Trolling हे शारिरिक व्यंग,  नाव, आडनाव, जात, धर्म, लिंग, पद ... यांसारख्या अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यातील लहान - सहान बाबींवरून देखील Troll केले जाते. वरील बाबींना अनुसरून जोक करणे, अश्लाघ्य शब्दांत Comments करणे, अपमानास्पद Joke Viral करणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, अश्लील बोलणं,  अगदी आपलं मनोधैर्य खच्ची होईल अशी टिप्पणी करणे,....म्हणजेच Trolling होय. 
              जाणकारांच्या मते, भारतात ट्रोलिंगची सुरुवात 2010 मध्ये झाली. व 2013 मध्ये सोशल मीडियावरिल संघटीत ट्रोलिंग सुरू झालं. तोपर्यंत ते Website वरील बातम्यांची Comment Section मध्ये अर्वाच्य भाषेत Comment करणं किंवा ती बातमी चुकीची ठरवण्याचे प्रयत्न करणे, किंवा स्वतः चा अजेंडा रेटण्यापर्यंत मर्यादित होतं. ट्रोलिंग हे डावे - उजवे कोणत्याही गटाकडून होत असते. मात्र,  माध्यमातील जाणकारांच्या मते, उजव्या विचारांची  (Right Wing) मंडळी यात पुढे आहे. संघटीत ट्रोल करणार्‍या लोकांना त्यांच्या - त्यांच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असतो. हे त्याशिवाय शक्य होत नाही. 
              लोकांवर ट्रोलिंग हे डेटानुसार होतं.  जर राजकीय पक्ष कुणाला त्याचं कंत्राट देत असतील , तर त्याची माहिती सार्वजनिक केली गेली पाहिजे. तसंच लोकांचा जो डेटा वेगवेगळ्या पद्धतीने गोळा केला जातो. तो Delete करण्याचा अधिकार त्यांना देणारा कायदा केला जाणं गरजेचं आहे. असे मत सोशल मीडिया जाणकार - निखील पाहावा नोंदवतात. 
           ट्रोलिंग हा सध्या सर्वसामान्यपणे उद्योग झालेला दिसतोय. ट्रोलिंगसाठी आता पैसे मिळतात., संघटीत ट्रोल्सला विकत घेतलं जातं.  साधारण एका Tweet साठी 10  ते  100 रूपये मोजले जातात. यामुळे ट्रोलिंग करणार्‍यांना अधिकच वाव मिळतोय. आणि म्हणूनच दिवसागणिक या ट्रोलधाऱ्यांच्या संख्येत भर पडत चाललीय. आता तर रीतसर Trolling च्या Agency आहेत.
           लोकं ट्रोल का करतात?  हा एक महत्त्वाचा प्रश्न येथे डोकावतो. याची प्रामुख्याने तीन ते  चार कारणं निदर्शनास येतात. : 
- एखाद्याला हैराण करण्यासाठी 
- लक्ष वेधून घेण्यासाठी, म्हणजेच Publicity साठी 
- इतरांना त्रास देण्यासाठी 
- ट्रोलच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याची नशासुध्दा   लोकांमध्ये काहीवेळा असते. 
        Trollers समाजमाध्यमांना लागलेली कीड आहे. दुसर्‍याच्या जीवनावर शहानिशा करणे, खाजगी आयुष्यावर अतिक्रमण करण्याचं काम हे Trollers करतात. याचच एक ताजं उदाहरण म्हणजे : 'सफुरा जरगर' ही जामिया मिलीया इस्लामिया ची M - Phil ची विद्यार्थीनी, तिला ,CAA ( Citizen Amendment Act)  च्या विरोधात आंदोलक म्हणून उत्तर - पूर्व दिल्लीच्या जाफराबाद येथून UAPA (Anti Terror act - Unlawful Activity Prevention  Act) च्या अंतर्गत अटक करण्यात आली. तिला ज्या निदर्शनांखाली अटक केली गेली, ती निदर्शने फेब्रुवारी महिन्यात झाली होती. आणि तिला अटक ही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आले. म्हणजेच ,Lock Down  सुरू झाल्यानंतर. तिला दिल्लीच्या तिहार तुरुंगात Quarantine Prisons मध्ये ठेवण्यात आले आहे. Corona Quarantine Test करत असताना, ती गर्भवती आहे अशी अफवा उठवण्यात आली. व समाजमाध्यमांमध्ये तिला सर्वत्र ट्रोल करण्यात आले.यात महत्त्वाचे म्हणजे तिला Quarantine Period मध्ये अटक करण्यात आली,  दुसरं म्हणजे रमजानच्या पाक महिन्यातही तिला बेल दिली गेली नाही.,  किंवा मिळू शकली नाही. आणि आता तिच्यावर होणारं हे ट्रोलधाडीचं सत्र .. 
              खरेतर ट्रोल कुणीही होऊ शकतं. "Everybody is TROLL"  आता जे टोळधाड शेतकर्‍यांच्या जीवावर उठलंय. अगदी या टोळधाडीचंच काम हे Trollers करतात. Trollers हे कुणाचं सामाजिक, राजकीय चारित्र्य हननही करु शकतात. किंवा ज्याची त्यांनी सुपारी घेतलीय, त्याचे गुणगान, गोडवे गात, नसलेल्या गुणांचं अतिरिक्त प्रदर्शन करून त्यांना नेताही बनवलं जातं. ट्रोलिंगची Army वेगवेगळ्या विषयांवर सतत कार्यरत असते. व्यंगचित्रे, विविध Jokes, Comments, यांच्या माध्यमातून  सामान्यपणे Troll केलं जातं. 
           या ट्रोलिंगवर काय उपाय असू शकतात तर, ते म्हणजे : ट्रोल करणार्‍यांना प्रत्युत्तर न देणे व दुर्लक्ष करणे. शक्य झाल्यास त्यांना Block करणे, आपण Target होऊ अशा पोस्ट शक्य असल्यास टाळणे. मात्र, जर Trollers चा अतिरेक वाढत असेल तर Social media platform आणि पोलिसांत त्यांची तक्रार दाखल करावी. 
          ट्रोल करणारी व्यक्ती ही स्वतःला तर्कशास्त्रात व वादविवादात तज्ञ समजून असतात. समालोचनात्मक टिका टिप्पणी करण्यात जणु त्यांना रसच असतो. ISTRO चं मंगळयान शेवटच्या टप्प्यावर असफल ठरलं तरी ट्रोलिंगचा विषय ठरतं, एखादं बिल पास झालं तरी ट्रोल होतं,  सिंधु - सायनाच्या यशापयशावर टीकाटिप्पणी, क्रिकेटच्या खेळाडूंवर - सामन्यांवर ट्रोलिंग, पद्मावत - पानिपत सारख्या चित्रपटांवर ट्रोलिंग, महिलेच्या कपड्यांवर - खाजगी आयुष्यावर ट्रोलिंग, सिनेक्षेत्र, नाटयक्षेत्र, संसद, प्रशासन, पत्रकार - मीडिया आंदोलने - कार्यकर्ते .... अगदी सर्वांना बेमालूमपणे ट्रोल केलं जातंय. यावर शासनाचा वचक असणे गरजेचे आहे. आपली मनोवृत्ती खच्चीकरण करणार्‍या Trollers विरुद्ध कायदा होणं आता आवश्यक झालंय. 

                               निकीता चंद्रकला दादाभाई 

Saturday, 30 May 2020

लोकशाहीसाठी आजची पत्रकारिता

      "लोकशाहीसाठी आजची पत्रकारिता"


       निरोगी लोकशाही घडविण्यात माध्यमं महत्त्वाची भूमिका बजावतात. माध्यमं आपल्याला जगभरात होणार्‍या विविध आर्थिक, सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय क्रियाकलापांबद्दल जागरुक करण्याचं काम करतं. 1780 साली जेम्स आॅगस्ट  हिकीज यांच्या "हिकीज गॅझेट"  ने भारतात वृत्तपत्रांचा पाय रोवला. त्यावेळी पत्रकारिता हा धर्म होता, मात्र आजच्या पत्रकारितेचा उघडपणे धंदा झालेला दिसतोय. स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रं ही बहुतांशी 'मतपत्रे' होती. अग्रलेख हे पूर्वीच्या वृत्तपत्रांचे वैभव होते. आणि ते निपक्षपाती व तथ्यात्मक असत. मात्र आज माध्यमं विविध प्रकारच्या बातम्या मसालेदार आणि अधिक आकर्षक सादर करण्यावर भर देते. 

        आज माध्यमांत खूप बदल झालाय. माध्यमं ही उघड - उघड जातिकेंद्रित, पक्षकेंद्रित, व व्यक्तिकेंद्रित झाली आहे. पत्रकारितेच्या नीतीशास्त्रानुसार कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक बाबतींत माध्यमांचीं भूमिका Constant असली पाहिजे. मात्र, आजच्या माध्यमांना आपली नीतीमुल्य व तत्वांचा विसर पडलेला दिसतोय. सद्यच्या वास्तविक परिस्थितीत राजकारणी व उद्योगपतींनी माध्यमांवर कब्जा मिळवायला सुरू केलंय. ते आपली सत्ता आणि पैशाच्या बळावर मीडियाला खरेदी करु पाहताय, त्यावर आपला हक्क जमवताय.  आणि हे काम ते पद्धतशीरपणे हळूहळू पाठीमागून करताय. आजच्या स्थितीला राज्यसभेमध्ये अधिकतर लोक ही Industrialization मधून belong करतात. आणि या धनाढ्य लोकांनी मीडियाच ताब्यात घ्यायला सुरुवात केलीय. 

           प्रत्येक वृत्तसंस्था, माध्यमं यांना स्वतः ची काही विचारप्रणाली असते, आचारसंहिता असते.मात्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभच मोडकळीस पडण्याच्या वाट्याला आल्याने या माध्यमांची सापेक्ष भूमिका आज वास्तवात राहिलेली दिसत नाही.वृत्तपत्रे ही आधुनिकतेकडे तर वळाली, पण त्यामुळे त्यांचे व्यापारिकरणही झाले. घटनांचे विकृतीकरण, सनसनाटीकरण करण्याची प्रवृत्ती हळूहळू वाढत गेली. काही घटना प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा अधिक मोठ्या रंगवून व भपकेबाजी करुन दाखवण्यात येतात. आजच्या पत्रकारितेत अनामता व एकरूपता यांचे पालन कुठेही दिसत नाही.  माध्यमांत व्यक्तिगत पूर्वग्रहांना कुठेही जागा असु नये. मात्र गेल्या काही वर्षांत पत्रकारितेच्या उत्तरदायित्वाची अंगे पुसट झालेली दिसतात.

           आता मागील महिन्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच दिल्लीत तबलिगींची जी घटना घडली,त्यात माध्यमं तबलिगींवर जे भार टाकत होतं, ते सर्व ठरवून होत होतं. जमातवाल्यांना Target करण्याची संधी अंध धर्मांधांना चांगलीच मिळाली होती.माध्यमं सारखी तीच ती बातमी दाखवत होते, त्यामुळे समाजात विषमता व द्वेषमुलक भावना पसरली गेली. त्यानंतर थोड्याच दिवसांत घडलेली पालघरची घटना - तेथे एका साधुवर Mob lynching चा प्रसंग ओढवला. मात्र या घटनेला देखील धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला गेला. जमावाला रोखणं किंवा थांबवणं हे प्रत्यक्षात मुश्किलीचंच आहे. खरेतर पालघरच्या त्या गावात एकही मुस्लिम घर नव्हतं. दुसर्‍या बाजूला उत्तर प्रदेशात गोहत्येच्या नावाखाली अनेक दलित व अल्पसंख्याकांवर Mob Lynching च्या घटना झाल्या, मात्र त्याविषयी माध्यमांमध्ये एवढे बोलले गेले नाही. एक Super fast Bulletin News दोन - पाच मिनिटं दाखवून विषय बंद करण्यात आला .येथे पालघर आणि युपीमधील घटना सारखीच आहे, मात्र त्याचं Presentation कसं वेगळ्या पद्धतीने केलं जातंय हे आपण लक्षात घ्यायला हवं. 

        पत्रकाराची भूमिका समाजातल्या शेवटच्या तळाच्या माणसाशी असायला हवी. पत्रकारांच्या भूमिकेचं Parameter म्हणजेच आचारसंहिता हे संविधान आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये  जातीयवाद, धार्मिकवाद यांसारख्या मागासलेल्या विचारांशी लढा देण्यासाठी व दारिद्र्य आणि इतर सामाजिक दुष्परिणामांबद्दल लोकांना मदत करण्याची माध्यमांची मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच पत्रकारितेचे नीतिशास्त्र जागोजागी असणे फार महत्त्वाचे आहे. माध्यमांशिवाय लोकशाही म्हणजे चाकं नसलेल्या वाहनासारखं आहे. मात्र आजच्या लोकशाहीत या चाकांनाच नियंत्रित करण्याचं काम केलं जातंय. सत्य, प्रामाणिकपणा, अचूकता, पारदर्शकता, स्वातंत्र्य, निपक्षपातीपणा आणि जबाबदारी या मूलभूत तत्वांवर माध्यमांनी चिकटणे महत्त्वाचे आहे. 

        एक सजग व कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपली स्वतंत्र भूमिका या लोकशाहीत असणं तेवढंच गरजेचं आहे ."Medium is the Message " हे सुत्र संवादशास्त्राचे महापंडित 'मॅकलुहान' यांनी मांडले होते. त्यांचे मत होते की, वातावरणात होणारे बदल हे माध्यमांमुळे होतात. माध्यमं ही आता सर्व सामान्य माणसाच्या जीवनातील अपरिहार्य भाग झाली आहे. आणि त्यांचं Controlling ही सर्व सामान्यांनीच करायला हवं. 
                   
निकिता चंद्रकला दादाभाई

Friday, 29 May 2020

International menstrual hygiene Day

            Happy And Healthy Periods 


         आपली मासिक पाळी आपल्या चेहऱ्यावरील हास्याविषयी व आरोग्याबद्दल बरेच काही सांगु शकते. 
मासिक धर्म ही सर्व पौगंडावस्थेतील महिला आणि स्त्रियांना अनुभवणारी एक नैसर्गिक आणि सामान्य जैविक प्रक्रिया आहे. परंतु अनावश्यक पेच आणि लज्जास्पद कारणांनी याबद्दल बोलले जात नाही. 

       "अंडपेशीचे फलन न झाल्यास, ही अफलित अंडपेशी, रक्त व म्युकससहित स्त्रावाच्या स्वरुपात गर्भाशयाबाहेर टाकली जाते, यास मासिक पाळी असे म्हणतात." प्रत्येक महिलेने हे दिवस आनंदी आणि आरोग्यमय घालावे, यासाठी सर्वप्रथम आपल्याला तिचे आपल्यासोबतचे अस्तित्व स्वीकारावे लागेल. तिला समस्या न समजता मासिक धर्म म्हणून स्वीकारुया. आजही बहुतेक महिला - मुली पाळीला Problem  किंवा Periods Problem म्हणतात. म्हणजेच नकळतपणे शब्दांद्वारेच ते ठरवून टाकतात की, पाळी म्हणजे एक समस्याच आहे. आणि या नकारात्मक शब्दांतूनच तिच्याविषयीची नकारात्मकता अधिक वाढत असते. म्हणून पाळीविषयी आनंदी राहुया व सकारात्मक मन ठेवुया ती दर महिन्याला न चुकता आपल्याला भेटायला येणारी आपली मैत्रीण आहे .तिच्यामुळेच आपले स्त्री म्हणून अस्तित्व आहे. 

           महिलांसाठी बऱ्याच काळासाठी महिन्याचा काळ अगदी सुखद नसतो. दिवसभराच्या कामाच्या व्यापाने बाई शरीर आणि मनाने थकलेली असते. मात्र महिन्याच्या या काळात आपण कटाक्षाने स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आहारापासुन मनोवृत्तीपर्यंत आपण आपला कालावधी आनंदी आणि आरोग्यमयी बनवला पाहिजे .बऱ्याच महिला पुढच्या मासिक पाळीच्या विचारानेच घाबरून जातात. एक स्त्री म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात जास्त कालावधीत मासिक पाळीला सामोरे जावे लागेल, म्हणून आपण त्यांना आलिंगन देण्यास शिकुया. 

        मासिक पाळी सूचित करते की, आपण निरोगी आहोत. नियमित पाळी आपल्या मेंदूतून महत्त्वपूर्ण सिग्नल देते की Female Sex Harmones ची मालिका अंडाशयासह यशस्वीरित्या समन्वय साधत आहे. दुसरे, म्हणजे पीरियड असण्याचा अर्थ देखील असा होतो की, आपण Ovulated आहात, म्हणजे तुम्हाला ईच्छा असल्यास गर्भवती होता येईल. या मानवजातीच्या अस्तित्व निर्माणाची व वाढवायची दोरी एका स्त्रीच्या हाती असते. जिला बहुतेक वेळा समाजात दुय्यमत्वाचे स्थान असते, ती स्त्री नवीन जीवाला जन्म देते.व वाढवते. हे सौभाग्य तिला नियमित पाळीने लाभते. 
        
आपल्या या दिवसांना आनंदी आणि आरोग्यमय घालवण्यासाठी प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याला विशेष जपले पाहिजे. 
1)योगा :  या दिवसांत आपण योगा करायला, हवा .जेणेकरून शरीर लवचिक बनते, व मन प्रसन्न राहते. 
2) नियमित व्यायाम : नियमित व्यायामाने वजन नियंत्रित राहते, यामुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. व पीरियड्स कालावधीआधी आणि दरम्यान वेदनादेखील कमी होतात. 
 3) कोमट पाणी : कोमट पाणी घेतल्याने कमरेचा व ओटीपोटातील त्रास कमी होतो .व ब्लीडींगही व्यवस्थित होते. 
4) गरम पदार्थ घेणे टाळावे : मसाल्याचे पदार्थ, चहा, लोणचे, पपई....यांसारखे पदार्थांचे सेवन या काळात टाळावे. 
5) विश्रांती घेणे : या दिवसांमध्ये थोडा वेळ का असेना आराम जरुर करावा, यामुळे शारिरिक थकवा व होणारा त्रास कमी होतो. 
6) सॅनिटरी नॅपकीनचा वापर :  24 तासांत 3 पॅड वापरावी. पॅड ऐवजी आता बाजारात Menstrual Cup आलीय. ती पर्यावरणपूरक असून माफक दरात उपलब्ध आहेत. या दिवसांत सकाळ - संध्याकाळ अशी दोन वेळा अंघोळ करावी .

       मासिक पाळीमुळे स्त्रीची प्रजनन संस्था सुरळीत कार्यरत असते. नियमित मासिक पाळीने तिचे आरोग्य नियंत्रणात राहण्यास मदत होते. एका महिलेच्या संसारात नवचैतन्य फुलवण्याचे काम आपली मासिक पाळी करते. मासिक पाळी ही आपल्याला निसर्गाने दिलेली विशेष भेट आहे. म्हणून दर महिन्याला आपल्याला या भेटायला येणाऱ्या मैत्रिणीसोबत आपण भीती, चिडचिड, असुरक्षितता यांसोबत न राहता आपण हा कालावधी आनंदी आणि आरोग्यमयी राहुन घालवुया. व मासिक पाळी ही नैसर्गिक आहे, म्हणून तिच्याविषयी आपण सर्वांसमोर हसुन बोलूया. मोकळं होत संवाद साधुया....
                                          
                                                                                                    निकीता चंद्रकला दादाभाई 

डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आणि वर्तमान वास्तविकता

     " डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आणि   वर्तमान वास्तविकता "


        भारत हा विविध धर्म, पंथ, जाती, समुदाय अशा विविधतेत सामावलेला आहे. भारत आणि पाकिस्तान अशा दोन स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्रांच्या रूपात 15 आँगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे पहिले विधीमंत्री म्हणून आणि स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेत केंद्रस्थानी श्रेष्ठ शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब राहिले. आणि राज्यघटनेचे मसुदारूप तसेच राष्ट्राचे शिल्प घडण्यात गढून गेले . 

      स्वतंत्र होत असलेल्या हिंदुस्थानात स्पृश्यांच्या गुलामगिरीतून अल्पसंख्य अस्पृश्य मुक्त व स्वतंत्र असावेत; देशहितासाठी स्पृश्यास्पृश्य भेद मिटलेला असावा आणि अस्पृश्यांना सामाजिक, राजकीय , आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती करून घेता येईल, अशा सोयींची तरतुद स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतच असावी; अशी सकारात्मक, ऐक्यवादी आणि एकनिष्ठ देशभक्तीची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब हे दलित, शोषित व वंचितांचे हितरक्षणकर्ते होते. भारतातील जातीयवाद समाप्त व्हावा, सामाजिक समानतेच्या संधी मिळाव्यात, दलित, शोषित, वंचितांना हक्क मिळवून त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी "नवभारताची निर्मिती " हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. बाबांच्या स्वप्नातील भारत हा सक्षम, शिक्षित व प्रगत अशा दलित समाजाचा अंतर्भाव असलेला  होता. 

          त्यांनी, समानता, स्वतंत्रता, समान काम - समान वेतन, महिलांना मातृत्व रजा प्रदान करणे, सर्वांना मतदानाचा " एक व्यक्ती - एक मत - एक मुल्य " याप्रमाणे मतदानाचा अधिकार या गोष्टींसाठी सतत पुढाकार घेतला. बाबासाहेबांची आंदोलने अधिकारासाठी होती. अधिकार कसा मिळवायचा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब होय. बाबासाहेबांचे विचार आजही तेवढेच आधुनिक व महत्त्वपूर्ण आहेत.  जातीअंताचा प्रश्न राष्ट्रीय आहे. तो हाती घेण्याची गरज आहे. उच्चशिक्षण, मुलभूत गरजा, आवश्यक गोष्टी सर्वांपर्यंत पोहचाव्यात, सर्वांना आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय मिळावा यासाठी बाबासाहेब नेहमीच पुढारलेले असत. 

        समाजातील भेदभाव मग ते कुठल्याही स्वरूपातील असोत,  ते भारताच्या प्रगतीतील अडथळा ठरतील.  असे त्यांचे ठाम मत होते . विषमतामुलक, विज्ञाननिष्ठ, व विचारविवेकी भारताचे स्वप्न बाबांनी पाहिले होते. डॉ. बाबासाहेबांना राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणायचे होते.  यासाठीच त्यांनी आपला 'स्वतंत्र मजुर पक्ष'१९३६ ला स्थापला. मात्र १९४२ मध्ये देशातील तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी स्वतंत्र मजुर पक्ष बरखास्त करून त्यांनी 'शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ' ची स्थापना केली. 

         मुळात घटनेमुळेच पक्ष, शासन बनते पण पक्ष घटना मानतात का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ ला इशारा दिला होता की, इथले लोक पक्षाच्या मतप्रणालीला मोठे मानतील की देशाला? जर ते देशापेक्षा पक्षाच्या मतप्रणालीला मोठे मानतील तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल आणि कदाचित ते कायमचं नष्ट होईल. असे म्हणतात की "भूल दिल्याशिवाय आॅपरेशन करता येत नाही, आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही. भारतात सद्यस्थितीला याचा प्रत्यय अधिक जाणवतोय. जनतेची निव्वळ दिशाभूल आज सरकार करत आहे. मग ते कोणाचंही असो. नुसता आश्वासनांचा पाऊस आणि गोड शब्दांचा मारा करुन जनतेची फसगत केली जातेय. 

          सध्या भारतातील धार्मिक असहिष्णुता वाढीस लागली आहे  ही धर्मांधता वाढून समाजात अराजकता माजलीय.जागतिकीकरणात दलित समाजाचा रोजी - रोटीचा प्रश्न उग्र झालेला असताना आणि दुसरीकडे दलितांची हत्याकांडे होत असताना गोहत्येच्या नावाखाली अनेकांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचा छळ केला जातोय, त्यांच्यावर हल्ले केले जातात,  माॅब लिचिंगच्या वाढत्या घटनांनी अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतलाय... 
यामुळे समाजात पराकोटीची सामाजिक विषमता निर्माण झाली, बाबासाहेबांना समतामुलक भारत अभिप्रेत होता. ना की जातीय, धार्मिक आधारावर दुही माजलेला समाज. 

      बाबासाहेब अभिव्यक्ती स्वातंत्र्याला खूप महत्त्व देत. भारत हा कोणामुळे भारत आहे,  तर तो बाबांनी दिलेल्या संविधानामुळे . भारत - पाक एकाच वेळी स्वतंत्र झाले. स्वतंत्र झाले. मात्र, पाकमध्ये धर्माच्या नावाखाली आतंकवाद, लष्कर यांचे पूर्ण थैमान आहे. तर भारत हा लोकशाही मार्गाने चालणारा प्रगतीच्या वाटेवर आहे. समाजात सर्वांना समान संधी, समान हक्क, व समान न्याय मिळावा यासाठी बाबासाहेब लोकशाहीचे बळकटीकरणावर भर देतात. 

      डॉ.बाबासाहेबांचं एक गाजलेलं व तेवढच महत्त्वाचं वाक्य आहे,  " माणुस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे." कोणताही धर्म माणसापेक्षा मोठा नाही. कारण तो माणसाने माणसासाठी निर्माण केलेला असतो. बाबासाहेबांनी आपणांस शिका, संघटीत व्हा, व संघर्ष करा! असा संदेश दिला. प्रत्येकाने अन्याय - अत्याचाराविरोधी आवाज उठवला पाहिजे, आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे. ते मिळवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे बाबासाहेब म्हणतात की, " जर अन्यायाशी लढता लढता तुम्हाला मरण आलं तर, तुमची येणारी पिढी त्याचा जरूर बदला घेईन,  मात्र जर तुम्ही अन्याय, सहन करता करता मरण पावले, तर तुमची येणारी पिढी ही गुलाम होईल" सध्या देशात आभासी आणि प्रलोभनपूर्ण वातावरण राजकीय पक्षांनी निर्माण केलंय.  एखाद्या गोष्टीबद्दल  कोणी व्यक्त होऊ नये अशी आज परिस्थिती निर्माण झालीय. बाबासाहेबांच्या मते, " एखाद शासन टिकण्यापेक्षा लोकांचे अधिकार टिकणे अधिक जरूरी असते." आणि यासाठी आपण सर्वांनी विचारविवेकी असणं जरूरी असतं. 

      बाबासाहेबांचे विचार वास्तव परिस्थितीला धरून व दूरदृष्टीचे होते. म्हणूनच आजही त्यांचे विचार तेवढेच आधुनिक आहेत.  बाबासाहेबांनी सांगितलंय " जेव्हा देवळात जाणार्‍या रांगा ग्रंथालयात जातील तेव्हा भारत जगावर अधिराज्य गाजवेल . ते म्हणतात "पुस्तकाने माणसाचे मस्तक सशक्त होते, आणि सशक्त झालेलं मस्तक कोणाचंही हस्तक होत नाही, आणि हस्तक झालेलं  मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही " याचा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. 

       समाजपरिवर्तनासाठी बाबा तरुणांबाबत आग्रही होते. मात्र आजची पिढी ही स्वार्थवृत्ती अंगिकारताना दिसतेय. वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून, प्रस्थापित भांडवलदार धार्जिण्या, जात्यंध नि धर्मांध पक्षांना मतदान करू लागली आहे. बाबासाहेबांना ज्ञानी, संवेदनशील, निर्भीड व अन्यायाविरुद्ध  परखड टीका करणारा, समाज हवा होता. बाबासाहेबांना भारत जातिनिष्ठ विषमतेपासून,अन्याय अत्याचारापासुन,शोषण आणि उच्च - नीच दर्जापासुन मुक्त करून सुसंघटीत व सामर्थ्यवान करायचा होता.  संविधानाचा गाभा असलेले स्वातंत्रय, समता, बंधुता तसेच सामाजिक व आर्थिक न्याय भारतीयांच्या कृतीत त्यांना अपेक्षित होता. बाबासाहेब आंबेडकरांना अंधश्रद्धा निर्मूलक, विज्ञाननिष्ठ, जातीविरहीत - समतावादी विवेकशील बंधुभाव जोपासणारा,  अन्यायाबद्दल बंड पुकारणारा सजग व एकात्म भारत अभिप्रेत आहे. 

बाबांना मानवी मुल्ये जपणारा,  भेदाभेदविरहीत समतेचा पुरस्कार करणारा भारत अपेक्षित आहे. समाजात सर्वांना समतानिष्ठ दर्जा, समतानिष्ठ अर्थव्यवस्था, स्वोध्दाराची समान संधी असणारा भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातीत होता. बाबासाहेबांची जयंती ही फक्त फटाक्यांच्या आतिषबाजीत व नाचगाण्याच्या जल्लोषात न साजरी करता, बाबासाहेबांना डोक्यावर नाही तर त्यांना डोक्यात घालून त्यांची जयंती साजरी करुया. त्यांचे विचार आचरणात आणून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताला सार्थ ठरवुया. 
                          
   निकिता चंद्रकला दादाभाई 

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...