Tuesday, 19 April 2022



सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२ 




सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण

समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक्यांमधील गावे ६ मुख्य स्तंभांवर काम करत आहेत.

१) जलव्यवस्थापन

२) मृदा व जलसंधारण

३) मातीचे आरोग्य

४) पौष्टीक गवताचे संरक्षित कुरणक्षेत्र

५) प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे

६) वृक्ष आणि जंगलांची वाढ


यापैकी स्थानिक पातळीवर 'प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे' या उद्दिष्टावर काम करण्याच्या दृष्टीने पानी फाउंडेशनतर्फे  ३९ तालुक्यांमधील समुदायाला 'फार्मर कप' प्रशिक्षण दिले जात आहे. यातुन शेतकऱ्यांनी एकत्रित येत गटशेतीचा पर्याय अवलंबावा व यातून आपली आर्थिक उन्नती साधावी, हे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. अमुल दुग्ध समुह, सह्याद्री फार्म, यांसारख्या समुहांनी संघटित पध्दतीने एकत्रित येत आपल्या समस्या कशा सोडवल्या, व कसा आपला विकास साधला या उदाहरणांतूनच गटशेतीचा पर्याय शेतकऱ्यांसाठी कसा आमुलाग्र बदल घडवणारा ठरेल हे या प्रशिक्षण माॅड्युल मधुन शिकवले जात आहे. 

पाणी फाउंडेशन च्या तीन दिवसीय निवासी शिबिरात मला समृद्ध शेती विषयी समृद्धपणे जाणून घेता आले शेतीक्षेत्रातील Conceptual understanding मला या शिबिरातून Build up करता आली या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समृद्ध शेती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व शाश्वत शेतीकडे वाटचाल करणे यात आम्हाला गट शेती म्हणजे काय? व तिचे महत्त्व,  बीज प्रक्रिया, बीज परिक्षण, रोपांचं लसीकरण Fungicide, Insecticide, Ribozium ( FIR ), Standard Operating Practices ( SOP ), शेतकऱ्यांच्या समस्या व त्यावरील उपाय, उगवण क्षमता तपासणे, आर्थिक साक्षरता, ( In Farming budgeting context), तसेच मुल्यांकन पध्दत अशा अनेक शेती क्षेत्राशी निगडीत संकल्पना मला जाणून घेता आल्या. समजून घेता आल्या. 

पाणी फाउंडेशन सोबत जोडले जाणं ही खरे तर माझ्यासाठी एक पर्वणीच होती. या प्रशिक्षणामुळे मला माझ्या तालुक्यातील समुदायाशी अधिक जवळिकता साधता आली. व एका संमिश्र वयोगटा सोबत शिकण्याचा अनुभवच अनोखा होता. या प्रशिक्षण कार्यक्रमात १८ वर्षांपासून ते ६०-६५ वय वर्षापर्यंतचे सहभागी देखील होते. यात, साक्षर निरक्षर दोन्ही प्रकारची लोकं होती‌. यात ज्येष्ठ गटातील सहभागींचा उत्साह आणि जिज्ञासा हे दोन्ही खूप उर्जा देणारं होतं. या सर्वांच्या सोबत सहवासात शिकणे व तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस निवासी राहणे हे खूप आनंदाचे व नवीन अनुभवाची शिदोरी होती‌. जी मला व्यक्तिगत रित्या समृद्ध करणारी ठरली. 

गटशेती विषयी मी ऐकुन होते, मात्र कधी Interest घेऊन समजून नाही घेतले. माझ्या Pre assumptions नुसार मला वाटतं होते की, सामुहिक पध्दतीने असं एकत्रित येत शेती करणं हे Idealistic ठीक आहे. मात्र Realistic approach मधून बघितल्यावर शक्य नाही वाटत. कारण गावात आपल्या शेताच्या बांधावरुन ते पाण्यापर्यंत अनेक लढाया, वादविवाद पेटलेले असतात. असे असताना एकत्र येऊन सामुहिक पध्दतीने गटशेती करणे हे मला वास्तववादी ठरेल असं वाटत‌ नव्हतं ‌ किंवा त्यात मला खूप Challenges वाटत होते, मात्र पानी फाउंडेशनच्या या समृद्ध शेती शिबिरात येऊन माझा दृष्टिकोन बदलला. जी बाब मला आव्हानात्मक वाटत होती. त्याची प्रत्यक्ष कार्य क्षेत्रात देखील अंमलबजावणी होऊ शकते तीही अगदी सहजसोप्या वाटेने‌ हा विश्वास मला येथे मिळाला. गटशेती चे फायदे व महत्त्व एका शेतकऱ्याच्या आर्थिक सक्षमतेसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे शास्त्रीयदृष्ट्या शिकुन घेता आले. व आजच्या युवाला शेती क्षेत्रात देखील उत्तम करिअर करण्याच्या नानाविध संधी आहेत याबद्दलचे मार्ग जाणून घेता आले. 

व्यक्ती-व्यक्तीला, समुदाय-समुदायाला, गावा-गावाला, तालुके-जिल्हे,......आणि असं करत संपूर्ण महाराष्ट्राला एकसंध जोडुन घेण्याचं काम पानी फाउंडेशनच्या या विविध उपक्रम, प्रशिक्षण आणि प्रकल्पांतून साधताना दिसत आहे. समाजाला एकमेकांसोबत जोडण्याचं आणि नाते वृध्दिंगत होताना यातून जाणवलं. वाॅटर कप स्पर्धेच्या वेळी देखील संपूर्ण गाव एकत्रित आलं. आपापसांतील चुरस, वैर, मतभेद विसरून सारे एकजुटीने आलेल्या समस्येशी लढायाला जुंपले. आणि आता पुढचं पाऊल म्हणून समृद्ध शेती करण्याच्यादृष्टीने ही वाटचाल. यात देखील प्रत्येक शेतकरी परिवाराला सामावून घेतले जात आहे. साक्षर असो की निरक्षर, तरुण असो की वयोवृद्ध, महिला असो की पुरुष समाजातील प्रत्येक घटकाला या प्रशिक्षणात सहभागी करून घेतले जात आहे. यात समृद्ध शेतीचे शास्त्रशुध्द पध्दती, आधुनिक तंत्रज्ञानाच्या पध्दती व अंमलबजावणी, तसेच विषमुक्त शेतीचा प्रवास व जैवीकतेकडील वाटचाल असे शाश्वत शेतीचे कमी खर्चातून जास्त उत्पन्न देणारे वेगवेगळे मॉडेल्स यात शिकवले गेले. 

या प्रशिक्षणात सह्याद्री फार्मर प्रोड्युसर समुहाचा जो प्रवास दाखवला तो देखील अतिशय प्रेरणादायी होता. व सर्वांना जाणून घेणं फायदेशीर ठरलं. या Training Module ची रचना अतिशय सुबक होती. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती पर्यंत Design केलेला Content पोहोचवणं हे देखील एक आव्हानच होतं. मात्र या प्रशिक्षणाची रचना अगोदरच भिन्न वयोगट व भिन्न बौध्दिक क्षमता लक्षात घेऊन केलेली असावी, जेणेकरून सर्वांना या प्रशिक्षणात शिकता आले. जे सहभागींच्या प्रत्येक Activity च्या Output मधून दिसत होतं. 

या तीन दिवसीय प्रशिक्षणात सर्व सहभागी अगदी टेंशन न घेता, हसत खेळत शिकले. कुटुंबाचा, घर-परिवाराचा अगदी सर्व ताण ते विसरुन गेले होते. सोबतच या प्रशिक्षणात हे देखील जाणवले की, एका शेतकऱ्याकडे, प्रामाणिकता, अपार कष्ट करण्याची जिद्द आणि तयारी असते तसेच पराकोटीचा संयम व हर घडीला येणाऱ्या समस्यांना तोंड देण्याची चिकाटी ही असते. हे सर्व गुण असताना तो शेतीक्षेत्राच्या आर्थिक जाचातून निघण्यास हतबल ठरतो. कारण काळानुसार शेती पद्धतींमध्ये बदल करण्याचा दृष्टिकोन त्याकडे नसतो. आपल्या Indigenous period पासुन आपण फक्त Self - Consumption साठी शेती करत होतो. मात्र खाउजा च्या आगमनानंतर व वेगवेगळ्या Revolutions ( Green, White, Blue, Red Revolutions ) यांसारख्या विविध क्रांतीनंतर कृषी क्षेत्रात Commercial Farming Approach विकसित व्हायला लागला. लोकसंख्या वाढल्याने आपली अन्नाची गरज देखील वाढली. व उत्पादनाचा अधिक ताण शेती क्षेत्रात वाढला. तसेच विविध आधुनिक तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात क्रांती-प्रतिक्रांती देखील घडवून आणल्या. यातुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले मात्र यासाठी त्यांना रासायनिक खतांचा आधार घ्यावा लागला. पण या रासायनिक विषयुक्त अन्नातुन आपली फक्त अन्नाची गरज पूर्ण होते. मात्र हवी ती शरिरासाठी व आरोग्यासाठी लागणारी पोषकद्रव्ये, जीवनसत्त्वे यातून आपल्याला मिळत नाही, उलट रासायनिक मुलद्रव्य हळूहळू आपल्या शरीरात साम्राज्य निर्माण करतात. आणि आपलं शरिर अनेक व्याधींचं घर बनतं. याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे पंजाब राज्यातील कॅन्सरचे वाढलेले प्रमाण. व या नावाने ओळखली जाणारी 'कॅन्सर ट्रेन' 









या रासायनिक खतांचा मारा करून करून शेतकरी उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नात अधिकच आर्थिक डबघाईला येतो. व त्याचं सर्व आर्थिक नियोजनच कोलमडतं. यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांसाठी आर्थिक साक्षरता या विषयावर एक स्वतंत्र सत्र घेण्यात आले. ज्यात जमीन मशागती पासून, पीक लावणी, काढणी, ते मार्केट मध्ये विक्री पर्यंत या संपूर्ण प्रक्रियेत शेतकरी आर्थिकदृष्ट्या साक्षरतेतून सक्षम कसा होईल, हे त्या सत्राचं उद्दिष्ट होतं.    सर्वांच्या अन्नधान्याची गरज भागवणारा शेतकरी एक वेळ स्वतः च्या कुटुंबाची भुक भागवू शकत नाही. किंवा त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यात असहाय्य ठरतो. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पीक पध्दतीत बदल घडवून आणणे गरजेचं आहे. जेणेकरून तो परिवर्तनाचा वाटसरू ठरु शकेल. व आपल्या समस्या सोडवण्यासाठी स्वावलंबी बनेल. 

 




मनसंधारणातून जलसंधारनाकडे 

ज्ञानसंधारणातून समृद्धी 


#विषमुक्त शेती

#जलसंवर्धन_निसर्गरक्षण 

#शाश्वत शेती

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...