Wednesday, 28 April 2021

रचनात्मक भेदभाव

          सुशिक्षित, कर्तबगार मुलगी म्हणजे एक संस्कारसंपन्न सृजनशील व्यक्ती नसून, एक उल्केसारखी वस्तू असते. एकदा चमकली नंतर नाहीशी झाली. म्हणजेच दरवर्षी दहावी - बारावीला Top करणाऱ्या पोरी काॅलेजमध्ये देखील नेहमी अव्वल राहणाऱ्या पोरी नंतर अशा उल्केसारख्या कुठं गायब होतात बरं ?मला अचानक पडलेला प्रश्न, यावर विचार करताना मला काही गोष्टींचा मागोवा घेता आला. 

         आजही या Structural Society मधील मोठ्या प्रमाणातील मुली एक Nominal Degree Complete करून लग्नाच्या बंधनात बांधल्या जातात. त्यांच्याकडे जरी त्यांची ध्येय - स्वप्न काबीज करणारी बुध्दीमत्ता असली,‌ तरी त्या ती करण्यास आपली समर्थता दाखवण्यात हतबल ठरतात. Primary, Highschool ते College पर्यंतच्या मैत्रिणी Degree  पूर्ण होईपर्यंत त्यांची मोठ्या प्रमाणात गळती झालेली असते. 

         पुरुषाला पत्नी म्हणून स्वतंत्र विचारांची नव्हे, तर सुशील स्त्रीच हवी असते. आपल्या परिवाराला सांभाळणारी, आई-बाबांची देखभाल करणारी. नवरा म्हणून आपली काळजी करणारी व आपल्याला सगळं आयतं हातात देणारी. परंपरागत रुढी परंपरेच्या साच्यात बसणारी सुसंस्कृत अशीच बायको त्यालाही हवी असते. 

         मुलींनी नोकरी करावी, पैसे कमवावे इथपर्यंत ठीक आहे. पण त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कुटुंबाशी निष्ठा याच्या आड नोकरी कधीही येता कामा नये. समाजाचा हा विषमतावादी पगडा बाईच्या प्रगतीतील खरा अडथळा ठरतो. या सगळ्यांमुळे बाई मानसिक भार (Mental Load ) च्या Phase मधून वावरत असते. आणि तिच्या मानसिक आजाराविषयी कुणी तिला नखाबरोबरही विचारत नाही. मात्र बाईची सहन क्षमता प्रचंड असते, ती पुरुषांकरवी सर्व बोल पचवून घेत असते. सारी अक्षम्य वागणूक रिचवून घेत असते. एक शब्दही उलट न उगारता. पुरुष वाट्टेल तसं बोलेल, त्याचा पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी मनमर्जी नुसार वागेल, मात्र बाईला काही बोलायचा काडीमात्र अधिकार नाही. नाही तर मग पुन्हा तिच्या संस्कारांवर बोट आलाच समजा. विरोध सहन करणं किंवा त्याविरोधात आवाज उठवणं या दोन्हीमध्ये तिची मानसिक कोंडी अटळ असते. 

          जागतिकीकरणामुळे आपण खूप आधुनिक झालो. आपलं राहणीमान, कपडे, खाद्यपदार्थ, ब्रॅंडेड चीजवस्तू वापरणं, चालणं, फिरणं, झोपणं, बोलणं अगदी सगळ्यांचं पैलूंतून आपण आधुनिक होतोय. मात्र विचारांच्या बाबतीत अजूनही आपला वैचारिक विकास मागासलेलाच आहे. आजही विद्यादानाच्या बाबतीत मुलींचा जीवनपट बहुधा लग्नाच्या उंबरठ्यापर्यंतच येऊन पोहचतो.

          चंदन देखील स्वतः झिजून दुसर्यांना सुगंध देते. परंतु त्याच्या रक्षणासाठी हजारो नागांचा फणा असतो. तसेच स्त्रियांचेही असते. "खाउजा" च्या आगमनानंतर व विज्ञान - तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे काळ बदलला. सुधारकांच्या सौजन्याने वातावरणही थोडे बदलले. पुरुषांबरोबर स्त्रिया शिक्षीत होत आहे. त्यांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कर्तब दाखवत आहे. आजची स्त्री मिळवती झाली / कमावती झाली. पण तिने नेमकं काय मिळवलं? घरचे आणि बाहेरचे काम दोन्ही तिच्याच हाती आले. रुढी आणि परंपरा यांच ओझंही कदाचित तसुभर फरक पडता होत तसंच राहिलं. आजच्या काळात जरी खूप काही बदलले असले, तरी स्त्रियांची स्थिती मात्र बदलली नाही. ना सुरक्षित, ना स्वरक्षित अशीच तिची परिस्थिती आजही आहे. 

- निकीता चंद्रकला दादाभाई

Sunday, 25 April 2021

जग कसं बदलावं ?


           जे एक असतं, ते अमूल्य असतं, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं.‌ इथे वन्स मोअर नाही. म्हणून हे अमूल्य आयुष्य आपण कशासाठी वापरणार? याचा ज्याने त्याने अगर यथोचित शोध करून बोध घेतला, तर‌ निश्चितच हे कोडं उलगडण्या वाचून राहणार नाही.

           जग कसं बदलावं? याचे खरेतर अनेक पर्याय आहेत ‌:

           सेवेची कृती, वैज्ञानिक संशोधनांची कृती, निषेधाची कृती, संघटनेची कृती, जागृतीची कृती, पर्यावरण संरक्षणाची कृती अजुन एक सुंदर पर्याय म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक बदलाची कृती. आपलं रोजचं जगणं म्हणजेच संस्कृती; आपण कसं जगतो, यातून जग घडतं. यातून समाज घडतो. 

           इतरांच्या जगण्यासोबत माझं जगणं जोडलं आहे. त्यांच्या अस्तित्वासोबत माझ्यातील स्व जोडलेला आहे.आपण सगळेच एकमेकांशी Connected,आहोत Interlink आहोत. आपल्या जीवनात Competition आणि Consumption आहे. हे सगळं आपल्याला नाकारता येणार नाही. पण यांची जागा जर हळूहळू Connection ने घेतली तर 'सोन्याहून पिवळे' म्हणायला हरकत नाही. 

           आपल्या जीवनात या आयुष्यातून तुम्हाला नेमके काय मिळवायचे आहे? याचा तपास करा. त्यावर बोला आणि कृती देखील अवलंबवा. व्यक्ती आणि समाज यांचा सम्यक समन्वय साधून व्यक्तिविकासास पूर्ण स्वातंत्र्य देऊन समाज सुसंस्कृत बनवणाऱ्या, नैतिकतेची आणि विज्ञाननिष्ठ विचारांची बैठक असणारं जग बदलण्यासाठी तुम्ही कार्यनिष्ठ रहा. तुम्ही शोषित, पीडित, वंचित, दुर्बल, सामाजिक व कायदेशीर न्याय, राजकीय प्रश्न - सामाजिक समस्या मागासलेल्यांचे हक्क - अधिकार , आर्थिक अवकाश, आणि राष्ट्राच्या विकासाविषयी बोलायला सुरुवात करा. आपल्या मानवी व राष्ट्रविषयक कर्तव्यांप्रती दक्ष रहा. व ते व्यवहारात आणा. "मुक्यांना आवाज देऊन, दुबळ्यांना शक्ती द्या." 

           कामं साठवून, कामाचा गुलाम होण्यापेक्षा कामाचा मालक बनून त्यावर स्वार होण्यात फार मोठे मानसिक समाधान लाभते. म्हणून जग बदलण्याच्या दृष्टीने आपले भविष्यवेधी आराखडे तयार करा. नियोजन आखा. आणि तुरंत आपल्या कामाला लागा. आपल्या विचारांचे बीज आपल्या कृतीत पेरा. मग बघा तुमचं हे लुसलुशीत पिकाचं खाद्य तुम्हाला कसं आयुष्य जगताना उपयोगी पडतं ते. आपले प्राधान्यक्रम आणि गतीनियम निश्चित करा. आणि झपाटून कामाला लागा.

            भूतकाळ आपला कितीही ओबडधोबड, कष्टमय ‌व संघर्षपूर्ण असला तरी भूतकाळ आठवून,‌ त्याचा विचार करून, अथवा त्यात गुंतून काहीही साध्य ‌होत‌ नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही. मग वर्तमान महत्त्वाचा आणि त्या आधारे आपण आपलं सुंदर असं भविष्य घडवू शकतो. आणि या दृष्टीनेच प्रत्येकाचे प्रयास आणि प्रयोजन असले की जग नक्की ‌बदलाच्या, परीवर्तनाच्या‌ दिशेने झेपावेल. 

           आपले प्राक्तन एक आहे हा जागतिकीकरणाचा मंत्र आहे. जगाच्या चांगुलपणावर तुम्ही विश्वास ठेवा; पण तो चांगुलपणा जागा करावा लागतो याचेही भान तुम्ही असु द्या. जसं जग तुला हवं आहे, तसं स्वतः जगायला सुरुवात कर, त्यासाठी अगोदर स्वतः ला घडव. जग बदलण्याच्या दिशेने काम करण्या‌ अगोदर स्वतः वर काम कर. मग बघ तुझ्या मनगटांत आणि बाहुंत नक्कीच ती‌ ताकद स्फुरेल. ज्या बळावर तुझा प्रवास बदलाच्या दिशेने मार्गक्रमण करेल. 

           नुसती श्वासोच्छ्वासांची संख्या वाढवणे गरजेचे म्हणजे जीवन नव्हे! जीवन हे वाहण्यात असते, जीवन रोज नव्याचा शोध घेण्यात असते, जीवन हे रोज अनोळखी मार्गांचा मागोवा घेण्यात असते. तुझ्या जगण्याचे हेतू कुणाच्या तरी समस्या सोडवण्यामध्ये गुंतवून ठेव. म्हणजे या चंगळवादी भौतिक जगात मी कुणासाठी व कशासाठी जगावं ? आणि कशासाठी मरावं ?असले निरर्थक प्रश्न तुझ्या मस्तकात डोकावणार नाही. तुझं जगणं अर्थपूर्ण बनव. सिध्दार्थाने सांगितलेल्या "अत्त दीप भव" च्या उपदेशानुसार स्वयंप्रकाशित हो आणि जग बदलण्याच्या वाटचालीतील मुसाफिर हो. 

- निकीता चंद्रकला दादाभाई



Friday, 23 April 2021

गुजरात नु विकास बहुत सरल छे





लोकशाहीच्या नावाने गळा,

मानवी हक्कांचा लळा, 

आणि वंचितांचा कळवळा। 

      ग्रामीण विकास समजून घेणे त्यामागील कारणे, समस्या व त्यावरील उपाय या सर्व बाबींचा ताळमेळ बसवून निरीक्षणातून उहापोह करणे यासाठी गुजरात येथील ग्रामीण भागात आमचा एक आठ दिवसीय अभ्यास दौरा "शाश्वत ग्रामीण विकास पुनर्निर्माण" या कोर्सच्या माध्यमातून झाला. या अभ्यास दौ-याच्या निमित्ताने खुपशा गोष्टी जवळून समजून घेता आल्या. प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेता आला. विकासाच्या नावामागची सत्यपरिस्थितीचे आकलन करता आले. 

       या भेटीदरम्यान मुख्यतः गुजरात राज्यातील भौगोलिकदृष्ट्या सातपुडा पर्वत भागातील काही जिल्ह्यांमध्ये आम्ही वास्तव्यास राहिलो. येथे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना भेटी देणे, तिथे एक - दोन दिवस राहून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणे तेथील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व भौगोलिक परिस्थिती समजून घेणे व त्या समुदायाचा अभ्यास करणे या उद्देशाधारित आमचा हा दौरा नियोजित होता. या आठ दिवसांच्या दौऱ्यातील अनेक बाबी लिहिण्यासारख्या आहेत, बोलण्या‌सारख्या आहे, नोंदवण्याजोग्या आहे. प्रत्येक छोटी बाब उजेडात यावी इतक्या महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक संवेदनशील मानवी मनाला बोचतील, काळजात जाऊन टोचतील असेही ‌काही प्रसंग इथे अनुभवयास आले. आणि खरे गुजरात माॅडेल प्रत्यक्षदर्शी बघता आले. 
            

       गुजरातच्याा नर्मदा जिल्ह्यातील माथावाडी या गावात एक - दोन दिवस मुक्कामी राहिल्यावर तेथील आदिवासी समुदायाला जवळून समजून घेता आले. त्यांचे रोजचे जगण्याचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, मुलभूत हक्कांचे प्रश्न, मानव अधिकारांचे प्रश्न, इ..... असे अनेकविध प्रश्न व समुदायाच्या समस्या जाणून घेण्यात व ओळखण्यास मदत झाली. 

          माथावाडी हे गाव नावाप्रमाणेच अगदी उंच उंच डोंगररांगांच्या माथ्यावर वसलेलं आहे. या‌ गावाजळून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर देशाचे पहिले गृहमंत्री व ऐक्याचे प्रतिक असलेल्या सरदार भाईंचा गगनचुंबी पुतळा विकासाच्या नावाखाली उभा करण्यात आला. व १९७० च्या दशकापासून प्रस्तावित असलेले सरदार सरोवरची निर्मिती करण्यात आली. येथील समुदायातील लोकांशी बोलल्यावर समजले की, ही लोकही पुतळा उभारणीच्या कामात ३०० ते ४०० रुपये मजुरीवर रोजंदारीवर कामाला जात होती. बांबुंच्या साहाय्याने उंचावर जोखीम पत्करून त्यांनी हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मदत केली. मात्र पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यावर या लोकांसाठी तेथे साध्या कर्मचारी ची नोकरीचीही तरतूद नाही. येथे रोजगाराची समस्या ही डोके वर काढत होती. येथे पोट्यापाण्याचा प्रश्न हा शेती या एकच साधनाने सोडवला जातो. रोजगाराच्या शोधार्थ हा समुदाय जवळच्या केवडीया, राजपिपला, नर्मदा या शहरांमध्ये स्थलांतर करतो. उंचच उंच डोंगररांगांवर पारंपरिक पद्धतीने याठिकाणी शेती केली जाते. 
         

        विकासाच्याा बाता ठोकणाऱ्या बडे मंडळींनी समृद्ध अशी जैवविविधता लाभलेल्या या परिसराला व येथील समुदायाचे जनजीवन विकासाच्या नावाखाली अस्ताव्यस्त व विस्कळीत करून सोडले आहे. या विस्थापित झालेल्या समुदायांचा आजही आपल्या मुलभूत हक्कांसाठी व सामान्य सोयी सुविधांसाठी रोजचा लढा व संघर्ष आहे. आपल्या अनेक पिढ्यांपासून या निसर्गाच्या सान्निध्यात या डोंगररांगा, मायमातीला, येथील पशुपक्षी, वन्यजीव, पाणी, या पर्यावरणाला सांभाळत, पर्यावरणाचे संरक्षण करत ही लोकं जीवन जगत होती. मात्र सरदार सरोवरामुळे या भागातील अनेक गावं, वस्त्या व समुदाय यांना विस्थापित व्हावे लागले. आपली शेत जमीन,घरदार, जमीन जुमला, सर्व नर्मदेच्या डोहात बुडवली गेली. अगदी तुकोबांच्या ग्रंथाप्रमाणे. 

         ज्या साधनवस्तुंना त्यांनी जीवानिशी जपले होते, ज्या घरात, ज्या मातीच्या कुशीत ते लहानाचे मोठे झाले, त्यांच्या अनेक पिढ्या वाढल्या ज्या निसर्गाने लाभलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करून ते आपलं पारंपरिक जीवन आपल्या समुदायासोबत आपली संस्कृतीचे जतन करत आपल्या शैलीने जगत होते. हे सर्व जीवनदायी मानणाऱ्या नर्मदा माईच्या पोटात जमा झाले. केवळ विकासाच्या नावाखाली. एवढं सगळं होऊनही शासन थांबत नाही, तर Eco - Sensitive Zone च्या नावाखाली इथल्या जमिनी ठेकेदारांना देऊन नैसर्गिक संपदा नष्ट करून तेथे मोठमोठ्या हाॅटेल्स, रेस्टॉरंट्स‌ उभे करून त्या जागी सिमेंट काॅंक्रिटचे जंगल वाढवण्याचा कार्पोरेटस वाल्यांची विजिगीषाा  आहे. 

        मेधाताई पाटकर व असे असंख्य कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांतून ज्या काही तरतुदी या विस्थापितांसाठी केल्या गेल्या. त्यांचा लाभ लाभार्थ्यांना मिळेपर्यंत त्यांची अख्खी हयात खर्ची पडली. आकाशातून पडणारी गार जमिनीपर्यंत पोहचेपर्यंत जशी लहान होत जाते. तसे या विस्थापितांसाठी असलेल्या तरतुदी व योजनांची गत झाली. 

        या सर्व निरीक्षणांतून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, गुजरातचा विकास खूप छान आहे, मात्र फक्त उच्च वर्गासाठी. सामान्य गरीब व मागासवर्गीय समाजाच्या वाट्याला तोच रोजच्या जगण्याचा संघर्ष आहे. छान छान रस्ते आहेत, महामार्ग आहे. मात्र फक्त शहरांपर्यंत सीमित. गावखेड्यात तेच आपले कच्चे रस्ते. गावांत आजही चांगल्या दर्जाचे शिक्षण, शाळा, अंगणवाडी, वीज, पाणी, दवाखाने या प्राथमिक सोयी-सुविधा आणि संविधानाने आखून दिलेल्या मुलभूत हक्कांसाठी वाणवा आहे. 

       आपण करीत असलेल्या विकासापासून मानवाला आनंद मिळाला पाहिजे. दुःख किंवा लाचारी नव्हे.वरच्या वर्गापासून समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत सर्वांचा एका दिशेने एकसंधपणे विकास व्हावा या दिशेने आपण सर्व एकतेने आग्रही असलो पाहिजे. सरदार सरोवर ज्या उद्देशांना घेऊन बांधले गेले, त्यातील निम्म्याहून कमी उद्देशांची पूर्तता होऊ शकली. एकतेचे प्रतिक म्हणून गुजरात मध्ये सरदार वल्लभभाईंचा भला मोठा पुतळा उभारण्यात आला. मात्र त्यातून कोणता विकास साधता आला? काय निष्पत्ती झाली यातून? तसा तर हा खूपच वादग्रस्त व संवेदनशील सामाजिक विषय आहे. मात्र त्याला राजरोसपणे राजकीय वळण देखील लाभले. 

       विकास म्हणजे केवळ आर्थिक संपन्नता, दळणवळणाची आधुनिक माध्यमे, बाजारपेठ, रुंद रस्ते असे समजले ; तर आपण स्वतःची फसवणूक करून घेऊ.माणसाचे आरोग्य, मन स्वास्थ्य, निसर्गाशी तोल राखुन त्याचा जरुरीपुरता वापर, समाजस्वास्थ्य, माणसाचे परस्परसंबंध, समाजातील विविध धर्मांच्या आणि वंशांच्या लोकांच्या ऐक्य, साहित्य, संगीतकला अशा सर्वसमावेशक प्रगतीमुळे मनास मिळणारा उल्हास. म्हणजेच विकास संबोधता येईल. आणि हीच विकासाची व्याख्या सर्वत्र रूढ व्हावी ही एक प्रामाणिक आशा.


- निकीता चंद्रकला दादाभाई

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...