Sunday, 14 November 2021

ग्रामीण बालमजुरी एक विदारक वास्तव

 



 1856 साली जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर, 14 नोव्हेंबर म्हणजे मुलांच्या लाडक्या चाचा नेहरूंचा जन्मदिन हा  राष्ट्रीय बालदिन म्हणून  मुलांचे हक्क, काळजी आणि शिक्षण याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस संपूर्ण भारतभर उत्साहाने व चैतन्याने साजरा केला जातो. या बालदिनी बालकांच्या हक्कांविषयी जाणून घेताना बालहक्काचा एक नवीन पैलू माझ्या नजरेस पडला. 


बालमजुरी प्रत्यक्ष अनुभव व एक थोडक्यात विवेचन - 


कोविड काळापासून ते आजपर्यंत जवळ जवळ या वीस महिन्याच्या कालावधीत आदिवासी पाड्यात व अति ग्रामीण भागात शाळा या तशा बंदच आहे. शाळेच्या खोलीला कुलूप लागल्याने पोरांचं खेळणं बंद, दंगामस्ती - भांडणं बंद, शिकणं बंद, वाचणं बंद. शाळा सुरू असताना निदान ते एक निमित्त तरी असतं पोरांना बालमजुरी पासून वाचण्याचं. शिक्षण हे असं शस्त्र बनून या मुलांना बालमजुरीच्या विळख्यापासून रोखून एक निरागस नाही, पण निदान त्यांच बालपण तरी जगण्यात शाळा, शाळेची वर्ग खोली, शिक्षक, आणि तो आवार हे वातावरण काही प्रमाणात साहाय्यभूत ठरत होतं. मात्र आज तेही बंद आहे.

बालमजुरीचा हा प्रवास तसा सुरू होतो एका आर्थिक विवंचनेतून. पोटाच्या खळगी साठी ही पोरं आपल्या मायबापा सोबत उन्हातान्हात, थंडी वाऱ्यात आपली कोवळी हातपाय हलवत अशी राबराब राबत असतात. कधी या पाटील च्या शेतात तर कधी त्या गुजरच्या मळ्यात. सकाळी आठ पासून ते संध्याकाळी अगदी पाच - सहा पर्यंत ही पोरं रोजंदारीवर मजुरी करत आहेत. दिवसभर राबून संध्याकाळी हाताच्या मुठी 140 ते 150 रुपये मजुरी कमवून अगदी सात - आठ वर्षांच्या वयापासूनच ही पोरं आपला भार स्वतः उचलत आहेत. आपला भारत आत्मनिर्भर व्हावा, मात्र तो इतक्या उच्च पराकोटीचा मुळी नसावा. आधुनिक भारताचे हे  खालील आत्मनिर्भर चित्र या प्रश्नाची उकल समजायला मदतगार ठरतं.



 

जेव्हा मी पहिल्या दिवशी शेतात गेले, आणि ही प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली. तत्क्षणी वाटले ही लहान लहान बालकं आपल्या आई सोबत शेतात आली असावी. मात्र थोड्याच क्षणात कळले की, ही अगदी सहा - सात वर्ष वयातील कोवळी मुलं, त्यांच्या फुलण्या - बहरण्याच्या काळात ती अशी श्रमिक होऊन मजुरी करताना नजरेस पडत आहे. आणि हे प्रमाण नंदुरबार जिल्ह्यासारख्या आदिवासी भागात अगदी सर्वत्र व तेवढ़च सहज आणि सर्वसामान्य आहे. 

मग पालकही घराचा आर्थिक भार हलका व्हावा, म्हणून आपल्या पाल्यांना या बालमजुरीच्या नावेत सहज चढवतात. आणि आपल्या कुटुंबाचा डोलारा चालावा म्हणून या चिमुकल्यांच्या हातात नाव वल्हवण्यासाठी ते शाळेला आणि त्यांच्या कोवळ्या सुमनासम बालपणाला दांडी देतात. पालकांच्या  अगदी पाच - दहा रुपयांच्या  गोळ्या - बिस्किटांच्या आमिषाला भुलून ही मुल शेताचा रस्ता धरताना दिसत आहे. अनेक  अभ्यासांतून व सर्वेक्षणांतून हे सिद्ध झाले आहे की ६० ते ८० टक्के बालमजूर हे ग्रामीण भारतात आहेत. त्यामुळे भारतातही आणि महाराष्ट्रातही खरे बालमजुरीचे आव्हान हे ग्रामीण बालमजुरीचे आहे. 

शेतीकाम व इतर स्वरूपाचे मुलांना करावे लागणारे काम ग्रामीण समाजाला बालमजुरी वाटत नाही. कारण बालमजुरी म्हणजे आपणा सर्वां समोर एक टिपिकल फ्रेम उभी राहते, जी आपण आपल्या मनोरंजनाच्या कारखान्यांतुन बघितलेली असते. हातात चहाचा स्ट्रे घेऊन चहा वाटप करणारा व कपबश्या धुणारा राजु, सर्व सामान्यपणे हेच प्रातिनिधिक दृश्य टिव्ही, सिनेमांनी आपल्या दृश्य पटलावर आणि मेंदुत चित्रित करून ठेवले आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करता एक वेगळेच वास्तव निदर्शनास येते. ग्रामीण भागात भांडी घासणारी मुलगी, लहान भावंडांचा सांभाळ करणारी पोरं, शाळा सोडून गुरेचराई करणारी मुले, कापूसवेचणी करणारी मुले यांना बालमजूर समजले जात नाही. तर दारिद्र्यामुळे हे काम आपल्या नशिबीच आहे हेच आपलं गृहीतक मानून उद्याचा उषा:काल बघतात. 

ग्रामीण बालमजुरी वाढण्याचे महत्त्वाचे कारण वंचित, आदिवासी, भटके विमुक्त समूहाच्या वाढत्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागात शेतीकामाला मजूर मिळणे कमी झाले आहे. त्यामुळे ती गरज पूर्ण करण्यासाठी मजुरीचे सरासरी वयोमान घटले आहे. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाला बालमजुरीची काळी किनार आहे. देशात जवळपास ८ कोटी कुटुंबे हंगामी स्थलांतर करतात. हंगामी स्थलांतरामुळे मोठ्या प्रमाणात पोरं शाळेपासून दुरावली जातात. व बालमजूर म्हणून काम करायला तयार होतात. या अशा अवस्थेमुळे पोरांची कायमच शाळेसोबत असणारी नाळ तुटते. व ते बालमजुरीच्या गर्तेत अजुनच खोल फेकले जातात.

कायद्याच्या अज्ञानामुळे व माहितीच्या अभावापायी ग्रामीण बालमजुरीला तोंडच फुटत नाही. निरक्षरतेचे गुणोत्तर मोठ्या प्रमाणात असल्याने या समस्येची तशी दाहकता ही या समुदायाच्या कधी लक्षात येत नाही. याच काही मुलभूत कारणांमुळे सर्रासपणे अगदी सहा ते सात वर्ष वयाची बालकं कापुस वेचणी ला मजुर म्हणून आपलं बालपण कापसाच्या वावरात घालत आहे. 

यावर थोडं विचारमंथन केलं की, लक्षात येतं RTE ची अंमलबजावणी होत असताना, दुर्दैवाने शालाबाह्य़ मुलांची चर्चा होताना, शिक्षण क्षेत्रात बालकामगारांच्या प्रश्नाची जाणीवजागृती खूपच कमी असल्याचं जाणवतं. या प्रश्नांच्या सर्व पैलूंचे पुरेसे जागरण व विश्लेषण अजूनही झाले नाही. त्यामुळेच समाजाच्या सर्व स्तरांत बालमजुरीचा एकमुखी निषेध न होता समर्थनाचीच अज्ञानातून सहानुभूती मिळतेय  ‘काय करणार, गरिबांच्या मुलांना काम करावेच लागणार’ असा सर्वसाधारण दृष्टिकोन आपल्याला सर्वत्र आढळतो. 

बालकामगारांचा प्रश्न अजूनही पूर्वीइतकाच तीव्र व दाहक आहे. ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’च्या मते जगात २२ कोटी बालकामगार आहेत. त्यातील एकतृतीयांश बालमजूर भारतात आहेत. हा आकडाच आपल्याला विचार करायला भाग पाडणारा आहे. शिक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्या व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी यांना बालकामगार कायदा व अंमलबजावणी याबाबत प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. तालुका व जिल्हास्तरीय समित्यांनीही यात सक्रिय काम करणं महत्त्वाचं साबित होईल. 

या बालदिनी आपण मुलांप्रती आपल्या धारणा दृढ करुया. मुले ही जगातील सर्वात मौल्यवान निर्मिती आहे. आपण सर्व परीने त्यांचे संरक्षण व मार्गदर्शन करुया. आणि त्यांना प्रेमाचा, मायेचा, पदर देऊया. कारण बालकं ही आपलं उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे. आपला सर्वात मोठा खजिना आहेत. 


या बालदिनी ,

प्रयत्न करुया एखाद्या बालकाला त्याच्या आयुष्याच्या अंधाऱ्या बाजुपासुन वाचवून

उद्याचा धवल प्रकाश बहाल करण्यात....!





Wednesday, 10 November 2021

जय भीम - तिमिरातून तेजाकडे

 



x


वर्ण - जात - अस्पृश्यता यांच्यातील संस्था - संकल्पनात्मक भिन्नत्व लक्षात घेणे गरजेचे आहे. जय भीम हा  फक्त एक चित्रपट नव्हे, ही दर्पोक्ती आहे इथल्या वंचित मुलनिवासिंची ज्यांना आपल्या मुलभूत आणि मानवी हक्कांसाठी लढता लढता आपल्या प्राणांसी मुकावे लागते. ही लढाई आहे सत्य आणि न्यायासाठी लढणाऱ्या व्यथांची ज्या या उच्च कोटीच्या समाजापासून दुर्लक्षित आहे. नाही मुद्दामहूनच त्या वांछील ठेवल्या गेल्या आहेत. 

Real is Rare but in India Casteism is everywhere. ही म्हण भारतातील जातिव्यवस्थेला 100% अपवाद साबित होते. आणि हे भारताचं खूप मोठं भीषण वास्तव आहे. ज्याची मुळं या समाजाच्या खूप खोलवर रुजली आणि जगली आहेत. भारतात जातिव्यवस्थेचे मुळ किती खोलवर पद जमवून बसले आहे हे या चित्रपटातुन प्रकर्षाने समोर येते. त्याचबरोबर जातिअंताचा हा लढा किती संघर्षमय आव्हानात्मक होता आणि आजही आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होते. 

स्वामित्व आणि दास्यत्व घडविण्याची रचना जातिव्यवस्थेत असल्यामुळे तिच्यात गुलामीचे संस्कार अंतर्निहीत असतात. किती असहनीय पीडा, अन्याय आणि विषमतामुलक भेदभाव इथले मुलनिवासी सोसत आले आहे हे इथल्या निद्रित समाजव्यवस्थेला पुन्हा पुन्हा दाखवून देणं गरजेचं आहे. ज्यासाठी दाक्षिणात्य सिनेमे प्रयत्नशील असल्याचे लक्षात येते. 

तामिळनाडूतील भटक्या विमुक्तांवर होणारा हिंसाचार आणि त्यासाठी लढणारा एक संवेदनशील वकील ही या चित्रपटाची प्रमुख थीम आहे. जस्टिस चंद्रु हा बदल घडवणारा वकील आहे. परिवर्तनाचा  बीजाक्ष आहे. जातीव्यवस्थेचा नकाब उतरवत हा सिनेमा येतो हे खरेतर आजच्या मनोरंजनवादी चित्रपटांसमोरील असामान्यत्व साबित होते. आणि दिग्दर्शक सोबतच जय भीम च्या संपूर्ण टीमचं Courageous देखील म्हणावं लागेल. 

न्यायासाठी संगिनीचा चाललेला आकांत, धडपड आणि आपल्याच माणसांवर होत असलेला अन्याय ती प्रचंड पीडा तिच्या टाहो फोडुन सांगणाऱ्या त्या वेदनांतुन ती आणि तो आदिवासी समुदाय धाय मोकलून व्यथा मांडतांना दिसतात. जर सिनेमा समाजाचा आरसा असेल तर आपण खरेच Progressive झालोय का? हा प्रश्न इथे आपसूकच डोकावतो. कोण कुणाचा कसा गुलाम आहे, हे यात सुंदररीत्या दिग्दर्शित केले आहे, या गुलामगिरीच्या पायऱ्यांतुन कसा माणुसच माणसाचा शिरच्छेद करतो. कुटील डाव रचतो आणि आपली नैतिकता माणुसकी कशी गहाण ठेवतो. हे या Casteism च्या व्यापक विळख्यातून सरसपणे घडत जातं‌‌. डॉ. बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव होणे ही स्वातंत्र्याची पहिली पायरी असते. मात्र या सिनेमात दाखवलेल्या चित्रीकरणाप्रमाणे सरपंचाची बायको देखील तिच्या नवऱ्याची गुलाम असते. मात्र दागिने, घर - प्रतिष्ठा, पैसा, प्राॅपर्टीच्या त्या लोभसवाणी दृश्यात तिला आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जाणच नाही. इथल्या जाचक समाज व्यवस्थेत प्रत्येक जण कुणाचा ना कुणाचा कसा गुलाम आहे. हे अगदी स्पष्टपणे यात दर्शविले आहे. 

या सिनेमात दाखवलेलं प्रत्येक Character प्रत्येक शहरी, ग्रामीण आणि  मध्यमवर्गीयाने पाहिले आहे. पण त्यांचं जगणं आणि त्यांच्या समस्या तो Relevant करू शकतो का ? या प्रश्नाची इथे गोची आहेया समुदाया बद्दल कधी आत्मानुभूतीची भावना दिसणं इथल्या Superior वर्गाच्या ठायी दिसणं मुश्किल होतं. आणि इथेच खरा आपल्या समाजव्यवस्थेचा अडथळा आहे. हे वास्तव हा सिनेमा अतिशय चपखलपणे मांडतो. ज्यांना मतदान करता येत नाही. ज्यांच्याकडे राशन  कार्ड नाही. जात प्रमाणपत्र नाही. आणि मुद्दामहूनच त्यांना एक नागरिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यापासून  कसं लांब ठेवण्यात आले आहे. हे अगदी वास्तवाचा आरसा बनून या चित्रपटात भटके - विमुक्त, आदिवासींचा इतिहास जय भीम मध्ये प्रतिबिंबित झाला आहे. सत्य आणि न्यायासाठी लढणाऱ्या जस्टिस चंद्रु प्रमाणे हा सिनेमा मुक्या, दबलेल्या वेदनांचा आवाज झाला आहे. "Voice To Voiceless" या उक्तीची जस्टिस चंद्रुची भुमिका या चित्रपटातुन आपल्याला समोर येते.  

मोर्चा आंदोलन हे फक्त रस्त्यावर उतरून घोषणाबाजी साठी नसतात. तर तो न्यायासाठी लढणारा एक न्याय्य मार्ग आहे. ज्याद्वारे सर्वसामान्य व्यक्ती आपला आवाज बुलंद करतो. आपल्या समस्या निवारणासाठी. हे चंद्रुच्या कार्याने यातुन अधोरेखित केले आहे. जय भीम हा फक्त एक चित्रपट नसून, ही कलेच्या माध्यमातून केलेली अभिव्यक्ती आहे, इथल्या मुलनिवासिंची, हा आक्रोश आहे त्यांच्या वेदनांचा. अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने लढलेला लढा आणि पीडितांचा संघर्ष अतिशय मार्मिकपणे यात टिपलेला आहे. 

हा चित्रपट इथल्या शोषितांच, श्रमिकांच शासनप्रशासन इथल्या मनुवादी विचारांतून कसं शोषण आणि राजकारण करतो. हे यातून प्रदर्शित करतो. 

अंधकारमय अल्पसंख्याक लोक अजूनही आदिवासी वांशिक प्रमाणपत्राच्या नोंदी मिळवू शकत नाहीत, इतर समुदायांकडून त्यांना असमान वागणूक दिली जात आहे. ते पोलिसांद्वारे दाखल केलेल्या खोट्या खटल्यांना बळी पडतात आणि अनेक क्लेश आणि अत्याचार सहन करतात. ही वाक्यं चित्रपटाच्या शेवटी पुन्हा एकदा डोळ्यांसमोर येतात. या चित्रपटातून एक प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे आपल्याला जर न्यायव्यवस्थेवर विश्वास आणि त्याची इत्थभूंत  माहिती असेल तर समोरचा कितीही बलाढ्य असला तरी त्याला त्याच्या कृत्याच्या शिक्षा देण्यात आपण यशस्वी ठरतो. फक्त त्यासाठी कंबर कसून या संघर्षाला तोंड द्यायच आपल्या नसांत धैर्य हवे. 

दक्षिणात्य चित्रपट आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांना , सामाजिक वास्तवाला कसं सुबकरीत्या साकारत आहे , आपल्या अभिनयातून आकारत आहे हे कौतुकास्पदच आहे. ते येथील जनसामान्यांच्या समस्यांना थेट भिडताय. उदाहरण म्हटल्यावर रजनिकांतची मुख्य भूमिका असलेला काला सिनेमा. जातीयता, अस्पृश्यता, भेदाभेद, power पैश्याच्या बळातून  होणारं राजकारण या सर्व बाबी अगदी निरपेक्ष यात रेखांकित केल्या आहेत. त्याच्याच जोडीला 'कर्णन' सिनेमा अभिनेता धनुषची मुख्य भूमिका असणारा चित्रपट, पूर्वापार चालत आलेलं जातीय समीकरण कर्णन' चित्रपटातून समोर आणतो. 

इथल्या वरच्या सत्ताधारी , शिक्षित वर्गाने दुर्बल वंचित समूहाचं शोषण करून त्यांना नेहमी स्वभिमानपूर्वक जीवन जगण्यापासून कसं Intensionally रोखून धरलं. हे या सिनेमांतून अतिशय प्रखरपणे समाजवास्तव आणि जातवास्तवाचे चटके अधोरेखित केले आहे. जय भीम बघताना जर आपले डोळे ओलावत असतील. घसा कोरडा पडत असेल. तर हे सर्व भोगणारे आपलेच बांधव आहेत. याबद्दलची संवेदनशीलता जागरूक होणं महत्वाचं ठरतं. हा सिनेमा पाहताना अंधाराची जाणीव होईल. कुठेतरी बदल घडला पाहिजे याची जाणीव होईल. Reality Check देण्यात हा सिनेमा सपशेल खरा उतरला आहे. ज्यांना आपला खरा इतिहास माहीत नाही, ज्यांनी कधी वाचण्याचे कष्ट घेतले नाही अथवा ज्यांना तो आठवत नाही वा यावरील भाष्यच टाळायचे आहे अशा सर्व बोथट झालेल्या मनांना आणि भावनांना संवेदनशीलतेची झालर बहाल करण्यात हा चित्रपट नक्कीच यशस्वी साबित ठरतो. 

जय भीम चा खरा अर्थ हा सिनेमा दाखवून देतो.

जय भीम फक्त एक शब्द नव्हे, ही चळवळ आहे. मानवतेच्या लढ्याची, बंधुभावनेची, प्रेमाची, स्वाभिमानाने जीवन जगण्याची, सत्य आणि न्याय हक्कांच्या लढ्याची. ही चळवळ आहे माणसाला माणूस म्हणून जगण्याची जगु देण्याची.  

जय भीम !

 

                                                                                                     -   निकिता चंद्रकला दादाभाई 

 

 

 

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण एप्रिल २०२२  सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या चळवळीतील ३९ तालुक...